Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कडवई ग्रा. पं. निवडणुकीतील चुरस वाढणार

 संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासूनच येथील राजकीय हालचालींना सुरवात झाली आहे. यात शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीसाठी सुरवतीपाससूनच आघाडीवर होते. मात्र अद्यापही महाविकासआघाडीचे तळ्यात मळ्यात असल्याचे पहायला मिळत आहे. आता यामध्ये मनसेने उडी घेतली असून भाजपही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढणार आहे. 

          कडवई गाव हा तालुक्यातील संवेदनशील गाव म्हणून ओळखला जातो. मागील काही निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील निवडणुकीवेळच्या कलहातून हाणामारीच्या घटना घडल्यामुळे पोलीस स्थानकात दोन्ही बाजूकडून रीतसर तक्रारी दाखल झाल्याने हे वाद कोर्टामध्ये चालू होते. अशा घटना प्रत्येक निवडणुकीत घडल्याने हा गाव शासनदरबारी संवेदनशील म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्यामुळे ही निवडणूक तालुक्याचे लक्ष वेधणारीच होत असते. 

          मात्र यावेळी दोन्ही कट्टर शत्रू असणारे पक्ष हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याच्या प्रयत्नात असल्याने यावेळचे चित्र थोडे वेगळे असल्याचे पहायला मिळत आहे. निवडणूका जाहीर झाल्यापासून शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संतोष  थेराडे यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडी करण्यासाठी दोन्ही बाजूने जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. एकूण पाच प्रभाग असणाऱ्या पंधरा सदस्यांच्या या ग्रामपंचायतीवर गेली पंचवीस वर्षे शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. मागील काही निवडणुकीत सदस्य पळवण्यासारख्या घटनाही येथे घडल्या आहेत.

               मात्र काही करून सत्ता राखण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. यावेळी शेखर निकम यांच्या रुपात या भागाला अनेक वर्षानंतर आमदार मिळाल्याने राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य आहे. मात्र वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना आल्याने राष्ट्रवादीची चांगलीच गळचेपी झाल्याचे बोलले जात आहे. शेखर निकमांसारखा हुकमी एक्का असताना नाईलाजाने शिवसेनेसोबत आघाडी करणे हा एकमेव पर्याय राष्ट्रवादीसमोर आहे. आमदार जरी राष्ट्रवादीचे असले तरी शिवसेना मात्र जागावाटपात राष्ट्रवादीला झुकते माप देण्यास तयार असल्याचे दिसून येत नाही.  शिवसेनेतील अंतर्गत कलह व राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांना विरोध यामुळे जागांची अदलाबदल करत राष्ट्रवादीला चार तर सेनेने आपल्यालाजवळ अकरा जागा कायम ठेवत आघाडीची मोट बांधली आहे. 

                यातच सेनेकडून गेली दहा वर्षे सरपंच असणाऱ्या वसंत उजगावकर यांना यावेळी डावलल्याने शिवसेनेत प्रचंड नाराजी असल्याचे चित्र समोर येत आहे. वसंत उजगावकर यांना मानणारा मोठा वर्ग सर्वच प्रभागात असल्याने शिवसेनेसमोर बंडखोरांचे मोठे आव्हान असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार असून मागील निवडणुकीत मनसेचा एक उमेदवार निवडून आला असून दोन उमेदवार किरकोळ मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे मनसे यावेळी सर्वच प्रभागात उमेदवार उभे करणार असल्याचे समजते. मनसेने या भागात केलेली समजपयोगी कामे अनेक यशस्वी आंदोलने तसेच कडवई रेल्वे स्थानकासाठी केलेले प्रयत्न यामुळे मनसेची ताकद काही प्रमाणात वाढली आहे. शिवसेनेतील नाराजांना आपल्याकडे खेचण्यात मनसे यशस्वी झाली तर मात्र ही निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. माजी बांधकाम सभापती राजन कापडी यांनी नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला असल्याने भाजपचा फारसा प्रभाव इथे नसला तरी कापडीच्या समर्थकांसह भाजपही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडी पहाता यावेळी कडवई ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही.

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment