Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

🟡“मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेनं दिला?”

 “देशात फक्त भाजपावालेच रोज गंगास्नान करतात व उर्वरित लोक गटारस्नान करतात असे काही आहे काय?,” असा सवाल करत शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीनंतर भाजपा नेत्यांनी टीकाटिप्पणी केली होती. भाजपा नेत्यांनी केलेल्या विधानांचा समाचार घेत शिवसेनेनं भाजपावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.


राज्यात ईडीच्या नोटीशीवरून राजकारण पेटताना दिसत आहे. खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीनंतर शिवसेना आक्रमक झाली असून, भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या टीकांना शिवसेनेनं सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे. “सध्या महाराष्ट्रात ‘ईडी’ प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्रातून भाजपाची इडा-पीडा गेल्यापासून हे ‘ईडी’ प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपाविरोधकांना नमविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. याच वातावरणाचा लाभ घेत ईडीस घाबरून भाजपाच्या कळपात शिरलेल्या एका ‘महात्म्या’ने ‘ठाकरे सरकार’ पडण्याचा नवा मुहूर्त दिला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार! हा मुहूर्त यांनी ‘ईडी पिडी’च्या पंचांगातून काढला की त्यांना झोपेत दृष्टांत झाला? एक मात्र खरे, महाराष्ट्रातील भाजपावाले सत्ता स्थापनेसाठी त्या ईडीवर फारच विसंबून राहिले आहेत,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.


देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर


“देवेंद्र फडणवीस म्हणतात तेदेखील बरोबरच आहे, कर नाही त्यास डर कशाला? हे त्यांचे सांगणे अगदी बरोबर आहे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपाविरोधकांनाच का येत आहेत, हा प्रश्न आहे. देशात फक्त भाजपावालेच रोज गंगास्नान करतात व उर्वरित लोक गटारस्नान करतात असे काही आहे काय? शिवसेनेच्या बाबतीत सांगायचे तर कर नाही तर डर नाही वगैरे ठीकच, पण करून सवरून नामानिराळे राहणाऱ्यांची आमची अवलाद नाही. जे केले त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबरीचा विध्वंस! तेथे रणातून पळून गेले ते कर आणि डरचे दाखले देत आहेत. हा विनोदच म्हणावा लागेल,” असं म्हणत शिवसेनेनं फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.


राज्यपालांवर साधला निशाणा


“भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता घटनेचा प्रश्न उपस्थित करीत सांगितले की, ‘ईडी वगैरे संस्था या बिगर राजकीय असून त्या घटनेशी बांधील आहेत. त्यामुळे संजय राऊत वगैरे लोकांना घटना मान्य नाही का? ‘पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून लागून राहिली? तुम्हाला घटना मान्य नाही काय, हा प्रश्न त्यांनी राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा व त्यावर आपले राज्यपाल महोदय काय सांगतात ते महाराष्ट्राच्या जनतेला कळवायला हवे. घटनेची सगळ्यात जास्त पायमल्ली सध्या कुठे होत असेल तर ती घटनेच्या तथाकथित रखवालदाराकडून. मागच्या जून महिन्यात राज्यपालनियुक्त 12 जागा रिकाम्या झाल्या. त्या जागांची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने केली. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशी मान्य करणे हे राज्यपालांना बंधनकारक असल्याचे आपली घटनाच सांगते. मग इतके महिने उलटून गेले तरी राज्यपालनियुक्त जागा रिकाम्या का ठेवल्या? राज्यपालांनी या जागा लगेच भरायलाच हव्यात असे घटना सांगते. 2020 चे ठाकरे सरकार पडण्याचे सर्व मुहूर्त, प्रयोग फसले आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या मनातले सरकार येत्या पाच-पंचवीस वर्षांत तरी महाराष्ट्रात येण्याची लक्षणे दिसत नाहीत. मग वाट कसली पाहताय? ‘ईडी’च्या बाबतीत ज्यांना ‘घटना’ आठवते त्यांनी राज्यपाल नियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे. सध्या एक संवाद सर्वत्र गाजतो आहे तो म्हणजे, ‘त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता?’ त्यातलाच हा प्रकार! ‘ईडी’ वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे,” असं म्हणत शिवसेनेनं राज्यपालांवरही निशाणा साधला आहे.


“पार्श्वभागात घुसलेला बाण! हेच तुमचे भविष्य!”


“सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अधःपतन सध्या जोरात सुरू आहे; पण यावर भाजपचे म्हणणे असे की, काँग्रेसच्या काळात ईडीचा गैरवापर झाला नाही काय? व्वा! काय म्हणायचे या अक्कलशून्य मंडळींना! काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच ते म्हणतात. मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच बदलून तुम्ही ईडी कार्यालयात बसून नवी घटना लिहून काढलीत? हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की, मेंदूत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजप! भाजपच्या ‘नव्या घटना समिती’चा विजय असो! डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण! हेच तुमचे भविष्य!,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र डागले आहे.

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment