
मनोरुग्णालयात शेकडो पदे रिक्त!
आरोग्य विभागाच्या उपक्रमांनाच ‘मानसिक आधाराची’ गरज
मुंबई : राज्यातील चारही मनोरुग्णालय तसेच आरोग्य विभागाच्या मानसिक आजारविषयक विविध उपक्रमांना पुरेशा मनुष्यबळाअभावी मनोरुग्णांना परिणामकारक उपचार मिळू शकत नाहीत. आरोग्य विभागाच्या मानसिक आरोग्य कार्यक्रमात मनोविकारतज्ज्ञ व चिकित्सकांसह हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याची बाब उघडकीस आली आहे.
टाळेबंदीच्या काळात मनोविकारतज्ज्ञांची गरज ठळकपणे समोर आली. राज्यातील ठाणे, पुणे, नागपूर व रत्नागिरी या चारही मनोरुग्णालयांच्या नवनिर्माणासाठी पंधराशे कोटी रुपयांच्या खर्चाला शासनाने मान्यता दिली आहे. मात्र त्याच वेळी मनोविकारतज्ज्ञांपासून ते मानसिक आजारासाठी प्रशिक्षित परिचारिकांपर्यंत आवश्यक असलेली हजारभर रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून कोणताही ठोस प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही.
याबाबत नाव जाहीर न करण्याच्या अटीवर आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पुणे मनोरुग्णालयात मंजूर ९५४ पदांपैकी ३२६ पदे भरलेली नाहीत. ठाणे मनोरुग्णालयातील ७२३ मंजूर पदांपैकी २१६ पदे रिक्त आहेत. नागपूर येथे ३७५ पदांपैकी १५९ रिक्त, तर रत्नागिरी मनोरुग्णालयातील १४४ पदांपैकी ६२ पदे भरलेली नाहीत. गंभीर बाब म्हणजे ऑगस्ट २००७च्या मंजूर झालेल्या पदांच्या संख्येनुसार ही रिक्त पदे आहेत. २०२१चा विचार करता मानसिक आरोग्य कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी किमान सध्या मंजूर असलेल्या २१९६ पदांऐवजी ३५०० पदांची आवश्यकता आहे.
परिणाम इतरत्रही
२०१५ मध्ये आरोग्य विभागाने १४ आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्ह्यांमध्ये ‘प्रेरणा’ प्रकल्प राबविला होता. ‘प्रेरणा’ प्रकल्पात २०१६-१७ मध्ये ५६ लाख ६२ हजार शेतकरी व कुटुंबीयांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात आली होती, तर तीन लाख ३६ हजार ६९३ लोकांना दाखल करून उपचार करण्यात आले होते. हीच आकडेवारी २०१९-२० म्हणजे करोनापूर्व काळात कमालीची घसरली. ३५ लाख २३ हजार शेतकरी व कुटुंबीयांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात आली. याशिवाय १०४ क्रमांकावर दूरध्वनी करून मानसिक आजारविषयक सल्ला देण्यात येतो. या उपक्रमालाही गेल्या काही वर्षांत उतरती कळा लागल्याचे दिसून येते. मानसिक आजाराचा सामना करण्यासाठी पुरेसे डॉक्टर व आवश्यक कर्मचारी यांची भरती न केल्यामुळे आरोग्य विभागाची मनोरुग्णालये व मानसिक आजाराच्या कार्यक्रमांनाच ‘मानसिक आधाराची’ आता गरज असल्याचे राज्याचे माजी आरोग्य संचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले.
आरोग्य विभागातील सर्वच रिक्त पदांचा आम्ही आढावा घेतला असून पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मानसिक आरोग्य कार्यक्रमाला माझे विशेष प्राधान्य असून या उपक्रमातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील. – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा