Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

पेगॅससच्या निमित्ताने महाभारतातील हेरगिरी
पेगॅससच्या निमित्ताने महाभारतातील हेरगिरी

                                                                                                    (लेखक: राजा पटवर्धन, जानशी, राजापूर)

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

इस्राईलमध्ये कुणाच्याही भ्रमणध्वनी यंत्रात घुसता येईलअसे तंत्रज्ञान(मालवेअर) विकसित करण्यात आले आहे.त्याची नियंत्रित पद्धतीने विक्रीही केली गेली.भारतातील अनेक महत्वाच्या (मुख्यतः विरोधी पक्षांच्या व सरकारवर टीका करणाऱ्या)अनेक व्यक्तींच्या मोबाईल मधे एक हेर, मालकाच्या नकळत बसवून ठेवलेला आहे हे उघड झाले आहे.हे काहूर दीर्घकाळ चालेलच कारण ते फार गंभीर प्रकरण आहे.गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गृहखाते अशी  यंत्रणा राबवते. हे सर्वश्रुत आहे.भारतातला गदारोळ हा मुख्यतः पेगॅससला हे काम कुणी करायला दिले,कधी दिले,किती रकमेचा हा व्यवहार आहे इ.बाबत सुरु आहे.महाभारतात अशा हेरगिरीची उदाहरणे आढळतात का ? या बद्दल मी विचार करायला लागलो.मला अनेक प्रसंग आठवले."व्यासोच्छिष्टम् जगत् सर्वम् (त्रयम्) !असे वचन लगेच आठवते.

भीष्माचे हेर

°°°°°°°°°°°°

काशीराजाच्या तीन कन्यांचे  एकाचदिवशी स्वयंवर आयोजित झाले होते.भीष्मांच्या हेरांकडून ही बातमी भीष्माला समजली होती. हस्तिनापूरचा सत्यवती-शंतनु पुत्र विचित्रवीर्य जरी राजपुत्र असला तरी कार्यकारी राजा भीष्मच होता.काशीराजाने हस्तिनापूरला स्वयंवराचे निमंत्रणच पाठवले नाही.भीष्माला हा आपला घोर अपमान वाटला.हेरांकडून भीष्माला असेही समजले की काशीराजाजाने पराक्रमी राजांच्या यादीतून विचित्रवीर्याला चक्क वगळले आहे.हस्तिनापूरच्या पराक्रमी भीष्माला हे जणू युद्धाचे आव्हानच वाटले.भीष्मअनाहूतपणे स्वयंवर मंडपात पोहोचला.राजपुत्रांच्या रांगेत  स्वयंवरासाठी भीष्म स्वतः उभा राहिलेला  पाहून सगळेआश्चर्यचकित झाले.,स्वयंवरात भीष्म थट्टेचा विषय झाला.  सुरकुत्या पडलेली त्वचा व रुपेरी केस, त्यात आजन्म ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा अशी कुजबुजही भीष्माच्या कानी आली.हाती वरमाला घेतलेल्या तीन  राजकन्या भीष्माला ओलांडून चक्क पुढे गेल्या.भीष्म जणू बेदखल झाला.एकीनेही भीष्माकडे पाहिले नाही.निमिषार्धात  भीष्माने तिघींची एकदम उचलबांगडी करून त्यांना आपल्या रथात कोंबले."मी क्षत्रीयाला साजेशा पराक्रमाने या तीनही कन्यांचे हरण केले आहे.हिंमत असेल तर युद्धाला तयार व्हा! "भीष्माचा रथ हस्तिनापूराकडे निघालाही.

स्वयंवराला एकदम युद्धभूमीचे स्वरुप आले.भांबावलेले राजपुत्र कसेबसे सावरले.अनेकांनी भीष्माचा पाठलागही सुरु केला.भीष्म युद्ध न शत्रू सन्मुख होऊन लढू लागला.बहुतेक सर्व राजपुत्र पराभूत होऊन पळून गेले.भीष्माचा दिव्यरथ पुन्हा हस्तिनापूरकडे वेगाने निघाला."भीष्मा पळू नकोस ,मी शाल्वराजा तुझ्याशी लढायला तयार आहे"भीष्माने ही वीर गर्जना स्पष्टपणे ऐकली.तो पुन्हा युद्ध सन्मुख झाला.रथात कोंबलेल्या काशीकन्या थरथर कापत होत्या.धायमोकलून रडत होत्या.अंबेने शाल्वराजाचा आवाज ओळखला.ती त्यालाच वरणार होती.पण भीष्माच्या रुद्रावताराने तिची पाचावर धारण बसली होती.घसा कोरडा पडलेला.तोंडातून दब्दच फुटू शकला नाही,पण जिवात जीव आणून तिने कसेबसे  डोळे तरी उघडले.शाल्वराजाच्या रथाचे घोडे मारले जाताना तिने पाहिले.पुढच्याच बाणाने सारथी ही कोसळलेला अंबेने पाहिला.आता शाल्वाचा...तिने डोळे पुन्हा घट्ट मिटून घेतले."शाल्वा!कन्या प्राप्तीच्या इच्छेने तू आला होतास म्हणून तुला सोडतोय,जीवदान देतोय.युद्धविन्मुख हो,माघारी फीर"शाल्वराजाने तोंड फिरवले.अंबेने  हे भीष्म वचन स्पष्टपणे ऐकले.पळणाऱ्याला भीष्माने सोडून दिले होते.शाल्वराजा पळून गेलेला अंबेने पाहिला.तो जिवंत सही सलामत आहे याची अंबेला खात्री पटली.भीष्माचा रथ वायू वेगाने हस्तिनापूरला निघाला.घोड्यांना जणू पंखच फुटले होते.(पेगॅसस .ग्रीक पुराणातील पंखवाल्या घोड्यांची कथा)काशीकन्यांचे आक्रंदन भीष्माच्या कानात शिरणेच शक्य नव्हते.त्याच्या कानात शिरणारा वारा वीरश्रीने भारलेला होता.तीनही राजकन्यांना भीष्माने सत्यवती समोर नेऊन  ठेवल्या."विचीत्रवीर्या साठी "!०

अंबेने‌ धाडस केले" मी व शाल्वराजाने एकमेकांना मनाने वरले आहे.मला मुक्त करा"ही दुखावलेली नागीण घरात नकोच म्हणून सत्यवतीने भीष्माच्यासंमतीने तिला रथातून शाल्वराजाकडे रवाना केली.भीष्माचे हेर पाठीमागून गेले होतेच.ही नागीण वेळ आल्यावर दंशकरील अशी भीष्माला खात्री होती.ही ब्याद तूर्तास टळली होती इतकेच.

पित्याकडे जायचे नाही याबद्दल आंबा ठाम होती.भीष्माची आज्ञा पित्याकडे सोडण्याची होती.अंबेने शाल्वराजाकडे रथ वळवायला सांगितले."तुला भीष्माने स्पर्श केला.तू त्यांच्या घरी राहून आलीस.यास्तव तू दुसऱ्याची झालीस.मी तुझा स्विकार करू शकत नाही" अंबेवर आकाश कोसळले.भीष्माचा रथ कधीच निघून गेलेला होता.तिने वनाचा रस्ता धरला.श्वापदांनी खाऊन टाकले तरी चालेल पण पित्याकडे जायचे नाही !आंबा मनाशी पुटपुटत होती.शेवटी एका आश्रमात शिरली.ऋषींनी तिला आश्रय दिला.पुरुषांनी भरलेल्या या आश्रमात तू राहू नयेत असे तिला समजावले.अंबेने आपली सर्व कर्मकहाणी कथन केली."तुझ्यामते "दोषी कोण? शाल्वराजा की भीष्म?""भीष्म.भीष्म भीष्म"!दैव योगाने हा आश्रम अंबेच्या आईच्या पित्याचा  होता."माझा सखाआजवाड्यात जमदग्निपुत्र पर्शुराम उद्या इथेच येणार आहे.भीष्माचा तो गुरु आहे.यातून तोच काही मार्ग काढू शकेल."भीष्माच्या कानावर ही वार्ताही हेरांमार्फत  गेली.ब्राह्मण गुरू पर्शुराम काय करील याचा  अंबा आश्रमात तर भीष्म हस्तिनापूरला राजवाड्यात विचार करीत होते."हे काशीराजकन्ये मी शाल्वराजाला आज्ञा करून तुझा स्विकार करायला लावतो.माझ्या आज्ञेचे तो पालन करील.हे तुला मान्य नसेल तर भीष्माला तुझ्याशी विवाह करायला लावतो.कन्ये तुला कोणता पर्याय मान्य आहे ते  सांग."हे भृगुकुलनंदना! माझा काहीही दोष नसताना शाल्वराजाने मी भीष्मस्पर्शित झाले म्हणूनअपवित्र ठरवून  मला हाकलून दिले आहे.पित्याच्यादृष्टीने स्वयंवरात कन्येचे हरण एका महापराक्रमी क्षत्रियाने केलेले आहे.हे त्यांच्या दृष्टीने धर्म मान्यच आहे.मी माहेरी परतूच शकत नाही.माझे सर्व दरवाजे बंद झालेत.आश्रमात ऋषी मला  ठेऊ इच्छित नाहीत.अग्निभक्षणाशिवाय मला कोणताचअन्य मार्ग उरलेला नाही.अंबा मूर्छित झाली.पर्शुराम निश्चयाने उठले ."भीष्माने एकतर अंबेशी विवाह करावा न पेक्षा माझ्या हातून द्वंद्वात मरण पत्करावे"

कुरूक्षेत्रावर भीष्म पर्शुराम समोरा समोर ठाकले.विवाहाचा प्रस्ताव भीष्माच्या प्रतिज्ञेमुळे शक्यच नव्हता.दुसरा पर्याय फक्त युद्धाचा.गुरूआज्ञेने पहिला प्रहार भीष्माकडून .दीर्घकाळ हे युद्ध सुरु राहिले.युद्धभूमीवर येऊन भीष्माला माता गंगने तर पर्शुरामाला साक्षात देवांनी समजावले.अंबा हतबुद्ध होऊन हे युद्ध पहात होती.युद्ध संपले.पर्शुराम अंबे कडे गेला."काशी कन्ये मी पराक्रमाची शर्त केली पण माझ्या शिष्याकडूनच पराभूत झालो.तुला न्याय देऊ शकत नाही.तुला योग्य वाटेल तसे कर"

भीष्माचे हेर अंबेच्या मागावर होतेच.तिने वनात चिता प्रज्वलित केली."भीष्म वध.भीष्म वध" म्हणत तिने अग्निप्रवेश केला. भीष्माचे हेर आता काय करणार?अंबेची तर त्यांच्या डोळ्यांदेखत राख रांगोळी झालेली त्यांनी पाहिली होती.

भीष्मांना दैदीप्यमान गुरुपरंपरा लाभली होती.स्वर्गातले देवच नव्हे तर देवगुरू बृहस्पतींकडूनही त्याने अनेक विद्यांचे अध्ययन केले होते.पर्शुरामाकडून धनुर्वेद व युद्धशास्त्र शिकले होते.गंगामातेनेविद्या-व्यासंगाने परिपूर्ण प्रशिक्षित केलेला युवकपुत्र शंतुनूकडे सोपवून गंगा आपला शापकाळ संपवून स्वर्गात परतली होती.अशा भीष्माला आपल्यावधासाठीच पुनर्जन्म घेऊ इच्छिणाऱ्या अंबेचाशोध घ्यायचा होता.भीष्म हा स्वतःच महासव्यसाची होता.हस्तिनापूरची भूमी सोडून कुणतीही दुसऱ्याची भूमी त्याला नको होती.सोळाहजार एकशे स्त्रियांना बंदिवासात ठेवणाऱ्या प्राग्जोतिषपुरच्या(आसाम) नरकासुराशी त्याने लढाई केली नाही.मगध नरेश(आजचे बिहार मधील पाटणा) नरमेध यज्ञ करु इच्छितो हेही भीष्माला ज्ञात होते.तो जरासंध ही भीष्माच्या वाटेला गेला नाही.आपण चक्रवर्ती राजा व्हावे असे कधी भीष्माला वाटले नाही.तरीही कुणीच भीष्माची परीक्षा घेऊ धजला नाही. अंबेच्या पुनर्जन्माबद्दल त्याला काहीच अंदाज येत नव्हता.सर्व राज्यात त्याचे हेर बातम्या काढीत होते.कुठे खुट्ट झाले तरी त्याचे हेर त्याला सतर्क करायचे.असेच एक दिवस त्याला  समजले की साक्षात भगवान शंकराचे वरदान द्रुपदाला प्राप्त झाले आहे.भीष्माच्या हेरांनी पांचाल देश पोखरुन -पिंजून काढला (आजचा बरेली जवळचा उत्तर प्रदेश).वरदान पुत्रप्राप्तीचे हेही गुपीत राहिले नाही.भीष्माच्या हेरगिरीला आत्तासारख्या  'पेगॅसिस 'सारखी सखोल  भेद शक्तीची गरज होती.द्रुपदाची राणी गर्भवती आहे हे सर्वतोमुखी झाले होते.पु्त्रप्राप्तीचे खास प्रयोजन काय?द्रुपद राणी प्रिशतीच्या दासीने भीष्माच्या हेराकडे ती वार्ता दिलीच.द्रुपदाला भीष्माचा पराभव करणारा पुत्र हवा होता.स्वत: द्रुपदाला भीष्माचा पराभव करणे शक्य नव्हते.राणी प्रसूत झाली तरी घरात अपेक्षित आनंदोत्सव दिसत नाही.दासी दाया दबक्या आवाजात कुजबुजू लागल्या.द्रुपदराजा चिंतातूर होऊन फेऱ्यामारू लागला.देवघरात घुटमळू लागला.नोकराचाकरांना हाकामारू लागला.कुणाच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात नाही.द्रुपदाने थेट प्रसूतीघर गाठले.राणी प्रशतीने जन्मलेले गोंडसमूल राजाच्या हाती दिले."ही तर मुलगी आहे." द्रपद जोराने किंचाळला.राणीने त्याच्या तोंडावर हात ठेवला." शंकराच्या आशीर्वादावर माझा पूर्ण विश्वास आहे.हा मुलगाच आहे.मी त्याचे नावही निश्चित केले आहे." "कोणाचे नाव?"" आपल्या पुत्राचे नाव" "काय नाव तू ठरवले आहेस?"राणीने गर्जनाच केली "शिखंडी"

पुत्रप्राप्तीच्या सुवार्तेने नगरात घरोघरी गोडाधोडाचे  भोजन झाले.आनंदोत्सव साजरा झाला.ब्राह्मणांना दक्षिणा मिळाल्या.गोरगरिबांना दान.शुभदिवशीच्या सुमुहूर्तावरच राजाला पुत्र झाल्याचे राज पुरोहितांनी जाहीर केले.मिरवणुका काढून हत्तीवरुन दवंडी पिटून राजपुत्र शिखंडीच्या जन्माची अधिकृत घोषणा झाली.राणीचा हट्ट पुरवला गेला.तिच्या जावेला मुलगा झाला होता ,मलाही पहिला मुलगाच हवा.आणि तो झाला.असे तिने मनाशी ठरवूनच टाकले होते.महादेव शंकराचा आशिर्वाद खराच ठरणार .शिखंडिनी हा शिखंडीच आहे.द्रुपदाचे मन वळवण्यात पांचाल राणी यशस्वी झाली !

भीष्माला सभोवतीची सर्व रहस्ये माहीत असायची.स्त्री म्हणून जन्मलेली ही द्रुपद कन्या आपला "काळ "म्हणूनच जन्मलेली आहे.हे त्याला माहित होते. यज्ञसेनाच्या (द्रुपदाची आणखी एक ओळख)खास  यज्ञातून जन्म पावलेला 

धृष्टद्युम्न हा द्रोणवधासाठीच प्राप्त झालेला आहे हेही भीष्माला ज्ञात होते.कुमारी कुंतीला झालेला  पुत्र कर्ण तसेच पांडूच्या पाचही पुत्रांचे जन्म रहस्य भीष्माला माहित होते.हस्तनापूरच्या रक्षणासाठी संबंधित सर्वांची इत्थंभूत  माहिती  त्याच्या खास "पेगॅसिस" यंत्रणेमार्फत त्याला होत असे. द्रुपदाने शिखंडीचा विवाह दशार्ण देशाच्या राजकन्येशी जुळवलेला आहे,याकडे भीष्माचे खास लक्ष्य होते.शिखंडी हा पुरुष नसून स्त्री आहे हे विवाहानंतर जगजाहीर झाले.दोन्ही देशाचे सैन्य सीमेवर तैनात होण्यास सुरवातही झाली.शिखंडिनी वनात गेली.तिने चिता पेटवली.एका यक्षाने तिची अवस्था पाहून आपले पौरुषत्व शिखंडिनीकडे सुपूर्द केले.तो यक्ष स्वत: स्त्री झाला.संपूर्ण पुरुष झालेला शिखंडी आत्मनाशाचा मार्गसोडून घरी परतला.द्रुपदाने दशार्ण राजाला शिखंडीची शारीरिक तपासणी करण्याला संमती दिली.सीमेवरचे सैन्य दूर झाले. युद्ध टळले. महाभारत युद्धात कौरवांचे सेनापती पद दुर्योधनाने भीष्मांकडे सोपवले.त्या आधी एक नाट्य घडले होते.अज्ञातवासात गेलेले पांडव शोधून काढणे दुर्योधनाला कधीच कठीण वाटले नव्हते.भीष्माची पेगॅसस वारसाहक्काने दुर्योधनाकडे आली होती.एका वर्षांचा काळ होत आला तरी पांडवांचा ठावठिकाणा लागत नसल्याने दुर्योधन अस्वस्थ होता.शेवटी भीष्माचे  पाय धरणे भाग पडले."पितामह,पांडवांना शोधण्यात माझे हेरखाते निष्फळ ठरले आहे.उपाय सांगा" "साधी गोष्ट आहे.जिथे धर्मराजा युधिष्ठिर आहे तिथे सुखशांती नांदणार.प्रजा सुखी असणार.दुष्काळ दिसणार नाही.गुण्यागोविंदाने प्रजा नांदत असेल तर समज की पांडव तिथेच आहेत."या उत्तराने दुर्योधनाला काहीच बोध झाला नाही.कर्णाने तर भीष्म तुझी दिशाभूल करतोय असेच सुचवले. दुर्योधनाच्या हेरांनी एक बातमी आणली .अगदी ब्रेकिंग न्यूज.कीचकाचा गंधर्वानी घरात घुसून वध केला."भीमाचा पत्ता लागला ,भीमाचा पत्ता लागला" दुर्योधन उड्या मारून आनंद व्यक्त करीत होता.कीचक हा विराटराजाचा सेनापती (विराटाचे राज्य.आचच्या उत्तर राजस्थानात)आता विलंब कसला? विराटावर हल्ला करण्याचा निर्णयच झाला.दुर्योधन दु:शासन शकुनी आणि कर्ण युद्धाचा निर्णय भीष्मांच्चा कानावर घालायला गेले.भीष्म काहीतरी गणित मांडून बसले होते.अज्ञातवासाचे किती दिवस उरले? विराट नगरात साक्षात अर्जूनच प्रकट झाला.तोही बृहन्नलेच्या वेषात.त्याने कौरवांना व्यूह रचायच्याआतच मोहिनी -संमोहन अस्त्राने निद्रेच्या हवाली केले होते.पराभूत कौरव हस्तिनापूरला परतले(आजच्या उत्तर प्रदेशचा मेरठचा भाग)

भारतीय युद्ध सुरु होण्यापूर्वीची रात्र . भीष्मांनी सेनापतीपद सशर्त स्विकारले."मी पांडुपुत्रांना मारणार नाही.शरण आलेल्याला व युद्धभूमी सोडून पळणाऱ्याला मारणार नाही." मान्य !तुमच्या सर्व अटी मान्य" दुर्योधनाने खूष होऊन सांगितले.भीष्म म्हणाले माझी आणखी एक अट आहे."स्त्री आणि स्त्री म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीशी मी लढणार नाही. "भीष्मांनीअप्रत्क्षपणे स्पष्ट केले की जर शिखंडी समोर आला तर मी शस्त्र चालवणार नाही".दुर्योधनाने सर्व वीरांना बजावले ."भीष्म सिंह आहे,कोल्हा(शिखंडी) सिंहासमोर कधीही जाणार नाही याची दक्षता घ्या."दहाव्या दिवशी नेमके तेच घडले.शिखंडी हा भगवत् गीतेत उल्लेखलेला महावीर आहे.अर्जुन रक्षित कुणालाही तुम्ही मारू शकणार नाही हे द्रोण वचन खरे ठरले. शिखंडी भीष्मासमोर उभा ठाकलाच, तो अर्जुन रक्षित होता. त्याच दिवशी भीष्म पतन झाले. नियतीसमोर हेरगिरी निष्फळच ठरली. मग ते मानवी हेर असोत वा पेगॅसिस. महर्षी व्यसांचेही नियती समोर काही चालले नाही. पेगॅसिसचे काय घेऊन बसलात?

(लेखक:-राजा पटवर्धन.)

(संपर्क:-०९८२००७१९७५) ........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment