Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

शुल्क न भरल्यामुळे १३ विद्यार्थ्यांना शाळेतून काढले

 


शुल्क न भरल्यामुळे १३ विद्यार्थ्यांना शाळेतून काढले

शुल्क न भरल्यामुळे १३ विद्यार्थ्यांना शाळेतून काढले 


नारायणा विद्यालयाचा कारभार; टीसी घरी पाठवल्याने पालक संतप्त


चंद्रपूर : येथील नारायणा विद्यालयाने तुघलकी निर्णय घेत शैक्षणिक शुल्क न भरल्याने शाळेतील १३ विद्यार्थ्यांच्या घरी रजिस्टर्ड पोस्टाने शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टी. सी.) पाठविल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेकडो पालकांनी नारायणा विद्यालयाच्या व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी पत्रपरिषदेत केली.

शाळेच्या शुल्कात दरवर्षी करण्यात येणारी वाढ, करोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू असूनही शुल्कात भरमसाठ वाढ, सर्व शाळांनी शुल्क कमी करूनही या शाळेने यासंदर्भात घेतलेली ताठर भूमिका असे अनेक आक्षेप पालकांनी घेतले असून वेळोवेळी आपला विरोध शाळेला लिखित स्वरूपात कळवला आहे. नारायणा शाळा व्यवस्थापनाने यावर्षीही पालकांकडून शिक्षक पालक संघाच्या स्थापनेबद्दल विचारणा केली होती. मात्र, पालकांनी रुची दाखवल्यानंतरही काही विशिष्ट धनदांडग्या पालकांच्या सहमतीने बेकायदेशीररित्या शिक्षक-पालक संघाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी इतर पालकांना शाळेत येण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. एवढेच नाही तर त्यावेळी पालकांना धमकावण्यात आले व जबरदस्तीने शाळेबाहेर काढून मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. तरीही पालक ताटकळत उभे असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले, असा आरोप पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात केला आहे.

एवढेच नव्हे तर शाळेने मनमानीपणाचा कळस गाठत शासनाच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा पालकांशी कुठलीही चर्चा न करता त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी कुठलेही गैरवर्तन केले नसतानाही शाळेने १३ विद्यार्थ्यांना शाळेतून थेट काढून टाकले असून त्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र रजिस्टर्ड पोस्टाने थेट विद्यार्थ्यांच्या घरी पाठवले आहेत. तसेच पालकांनी शाळेत येऊ नये अशी सूचना शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली आहे. जर ते पालक शाळेत आले तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी धमकी शाळा व्यवस्थापनाने दिली आहे.

आमच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्रे व पदके शाळेत असून ते आणण्यास गेल्यास आमच्यावर गुन्हे दाखल करणार का, असा सवाल पीडित पालकांनी केला आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी यासंदर्भात शाळेची भूमिका बेकायदेशीर असल्याचे मान्य केले.

मात्र, मागील वर्षी शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयात सदर शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे सांगितले.  मात्र एवढा मोठा प्रकार घडूनही शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शाळेवर कोणती कारवाई होणार यावर मौन बाळगले असून त्यांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. पालकांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी उपशिक्षणाधिकारी पूनम मस्के यांनी पालकांना शाळेने पाठवलेल्या टी.सी. च्या प्रती मागितल्या आहेत. आपण स्वत: शाळेत जाऊन व्यवस्थापनासोबत चर्चा करणार असल्याचे मान्य केल्यानंतर पालकांनी समाधान व्यक्त केले. शाळेवर कठोर कारवाई करून सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेश देऊन त्यांचे शिक्षण सुरळीत सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही पालकांनी सांगितले. याप्रकरणी अधिक माहितीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका बॅनर्जी यांचे भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता बंद होता.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

1 टिप्पणी(ण्या) :

  1. अशा शाळांची मान्यता रद्दबातल ठरवली पाहिजे. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत न जाता शाळेच्या अधिक्रुत व्यक्तीला जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात बोलावून हजाम पट्टी केली पाहिजे.

    उत्तर द्याहटवा