Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

उद्योगपती हेच राज्याचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’- मुख्यमंत्री


उद्योगपती हेच राज्याचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’- मुख्यमंत्री

अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे सूतोवाच ; औद्योगिक नकाशा तयार करण्याचीही घोषणा

मुंबई : राज्यातील प्रादेशिक वैशिष्टय़े व साधनसंपत्ती लक्षात घेऊन राज्याचा औद्योगिक नकाशा तयार करण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’मध्ये अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे सूतोवाच केले. महाराष्ट्राला आपला समजून गुंतवणूक करणारा प्रत्येक उद्योजक हा देशात व जगभरात या राज्याचा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्यासाठी राज्याच्या औद्योगिक-पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ गुरुवारी पार पडली. त्याचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, ‘सीआयआय’चे अध्यक्ष टी. व्ही. नरेंद्रन या वेळी उपस्थित होते. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक केले.

करोनानंतरच्या काळात रोजीरोटीचा प्रश्न महत्त्वाचा असून तो न सुटल्यास लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल. त्यामुळे पुढील काळात उद्योगांचे अर्थचक्र गतिमान करण्यासाठी आणि आपली कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्राला आणखी समृद्ध करण्यासाठी सरकार-उद्योगांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. राज्य सरकार गुंतवणूकदारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि भविष्यातही त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

करोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याने निर्बंध शिथिल केले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वीचा हा कालावधी अर्थचक्राला पुन्हा गती देण्यासाठी धोरण ठरवण्यासाठी वापरायचा आहे. महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी आपलेपणाची भावना घेऊन पुढे आला आहे. हे राज्य आपली कर्मभूमी आहे. या कर्मभूमीची सुबत्ता वाढवण्याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. सध्या महाराष्ट्रात उद्योग करणाऱ्या उद्योजकांना पुन्हा महाराष्ट्रात विस्तार करावा, असे वाटावे यासाठी राज्य सरकार काम करेल. महाराष्ट्राला आपले समजून गुंतवणूक करणाऱ्यांकडे पाहूनच इतर गुंतवणूकदार महाराष्ट्रात येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राज्यातील प्रादेशिक वैशिष्टय़े, साधनसंपत्तीची उपलब्धता आणि स्थानिक पर्यावरण लक्षात घेऊन कोणत्या विभागात कोणते उद्योग सुरू करता येतील, हे निश्चित करण्यासाठी राज्याचा विभागनिहाय औद्योगिक नकाशा तयार करण्यात येईल. तो नकाशा तयार झाला की उद्योगांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या माध्यमातून स्थानिकांसाठीच्या रोजगार संधीचा मार्गही प्रशस्त केला जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

करोनामुळे गेली दीड -अडीच वर्षे उद्योग क्षेत्रासाठी आव्हानात्मक होती. मात्र, दुसऱ्या लाटेत उद्योग हे एकमेव क्षेत्र कार्यरत होते. काही काळाने तर ते जवळपास करोनापूर्व काळाइतके पूर्वपदावर आले. देशाला अभिमान वाटावा असे औद्योगिक गुंतवणुकीचे एक लाख ३० हजार कोटींचे करार या काळात महाराष्ट्राने केले. देशातील उद्योगांशीच नाही तर अमेरिका, सिंगापूर, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया अशा अनेक देशांनी महाराष्ट्रावर विश्वास दाखवला, असे उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वागत एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गिस यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी के ले.

एअरबसच्या गुंतवणुकीसाठी चर्चा प्रगतिपथावर : सुभाष देसाई

विमान निर्मितीत जगात बलाढय़ अशा ‘एअरबस’ या कंपनीशी गुंतवणुकीबाबतची चर्चा अत्यंत प्रगत अवस्थेत असून, नागपूरच्या मिहान येथे ‘एअरबस’चा प्रकल्प उभा राहावा, यासाठी दैनंदिन पाठपुरावा सुरू असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. याचबरोबर ‘टाटा समूहा’तर्फे ‘सेमी कंडक्टर’चा उद्योग राज्यात उभा राहावा, यासाठी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. देशामध्ये हा प्रकल्प ‘टाटा समूहा’तर्फे होणार असेल तर महाराष्ट्र तुमचे स्वागत करेल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, टाटा समूहाचे एन. चंद्रशेखरन यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे देसाई यांनी सांगितले. याशिवाय डाटा सेंटरचे नवे दालन महाराष्ट्रात उद्योगाच्या रूपाने खुलावे, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

सुमारे ६० कंपन्यांनी राज्यात दीड लाख कोटींचे गुंतवणुकीचे करार केले आहेत. हे करार के वळ कागदावर नाहीत. यापैकी ७० टक्के करारांमध्ये भूखंडाचे वाटप झाल्याची माहिती त्यांनी दिली. करोनाकाळात जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा महाराष्ट्राचा प्रयत्न आहे. त्यासाठी रोजगार निर्मितीवर राज्याचा भर राहील. राज्यातील ६० टक्के नागरिक हे ३५ वर्षांखालील आहेत. त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. यासाठी ‘महाजॉब पोर्टल’सारख्या माध्यमातून रोजगारासाठी सहकार्य करण्यात येते. राज्य हे खऱ्या अर्थाने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

नव्याने आलेल्या जुन्या विषाणूचा बंदोबस्त..

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी सध्या सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात भाजपसह राणेंवर शाब्दिक प्रहार केले. करोनाबरोबरच इतरही काही जुने विषाणू नव्याने येत असून त्यांचाही बंदोबस्त करायचा आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राणेंना नाव न घेता लगावला.

करोना कमी होत असला तरी करोनाच्या विषाणूंबरोबर आणखीही काही जुने विषाणू नव्याने येत आहेत. त्यांचेही काही दुष्परिणाम राज्यावर होत असून, करोनासोबत त्यांचाही बंदोबस्त करावा लागेल, असे ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर राज्यात पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिल्याचे सांगताना काही लोक राजकीय पर्यटनच जास्त करतात. इकडून तिकडे व तिकडून आणखी तिसरीकडे जातात, असाही चिमटा ठाकरे यांनी राणेंच्या पक्षांतरांबाबत काढला. अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही, या राणेंच्या विधानावरूनही मुख्यमंत्र्यांनी त्यांना लक्ष्य केले. तुम्ही जर सामान्य नाही तर मला काय उपयोग तुझ्या मोठेपणाचा, असा सवाल करोनामुळे रोजीरोटीच्या प्रश्नाशी झगडत असलेले लोक विचारतील, अशी टिप्पणी ठाकरे यांनी केली.

उद्योगधडाका

’मिहानमध्ये ‘एअरबस’ उत्सुक

’‘ओटीटी’ चित्रीकरणासाठी ‘एमआयडीसी’चे स्टुडिओ

’सेमीकंडक्टर निर्मितीत टाटा कंपनीची गुंतवणूक

’माहिती तंत्रज्ञान उद्योग धोरण महिन्याभरात

..................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा