
मुंबईसह राज्यात भाडय़ाच्या घरांच्या मागणीत वाढ
भाडेदरांत घट, सर्वेक्षणातील माहिती
करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईत भाडय़ाच्या घरांच्या मागणीत चांगलीच वाढ झाली असून करोनापूर्वी लागू असलेल्या भाडय़ात मात्र घट झाल्याचे दिसून येत आहे. ही घट दहा टक्के इतकी असल्याचे तसेच भाडेतत्त्वावरील कार्यालयांची मागणीही वाढत चालल्याचे ‘अॅनारॉक’ कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात नमूद आहे.
करोनापूर्वीही भाडय़ाच्या घरांना मागणी होती. घराच्या भाडय़ांचे दर हे साधारणत: ५० ते ७५ रुपये प्रति चौरस फूट तर आलिशान घरांचे दर ९० रुपयांपासून दोनशे ते चारशे रुपयांपर्यंत होते. वांद्रे पश्चिम, खार, सांताक्रूझ, पार्ले येथील दरात कधीच चढउतार होत नव्हते. तीच बाब दक्षिण व दक्षिण मध्य मुंबईतील भाडय़ाच्या घरांबाबत होती. अंधेरी ते बोरिवलीपर्यंतच्या भाडय़ाच्या घरांचे दर हे परिसरानुसार कमी-जास्त असतात. मात्र करोनानंतर भाडय़ाची असंख्य घरे रिक्त झाली. भाडीही थकल्याने अनेकांनी घरे रिकामी केली. दुसऱ्या लाटेने कहर केला आणि भाडेकरू मिळणेही कठीण होऊ लागले. दुसरी लाट ओसरल्यानंतर भाडय़ाच्या घरांना पुन्हा मागणी येऊ लागली. मात्र पूर्वीप्रमाणे भाडे मिळेनासे झाले. करोनामुळे रिक्त राहिलेल्या घरांपोटी नुकसान सोसावे लागलेल्या अनेकांनी दहा टक्के भाडे कमी केले. पुन्हा नव्याने भाडय़ाने घर घेऊ पाहणाऱ्या भाडेकरूंनीही पूर्वीप्रमाणे भाडे देण्यास असमर्थता दर्शविली. अखेरीस त्याचमुळे भाडेदरात घट झाल्याचे काही इस्टेट एजंटांनी सांगितले. मुंबईत आजही भाडय़ाची घरे बऱ्यापैकी रिक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या मुद्रांक महानिरीक्षक कार्यालयातील नोंदीनुसार..
’ यंदा ऑगस्ट महिन्याअखेरीस राज्यात भाडेतत्त्वरील घर तसेच कार्यालयांसाठी ७९ हजार ७६१ तर मुंबईत २३ हजार २३० करारनाम्यांची नोंद झाली.
’ गेल्या ऑगस्ट महिन्यात राज्यात ५२ हजार ५५३ तर मुंबईत १६ हजार १०० इतकी होती. २०१९ च्या ऑगस्ट महिन्यात भाडेतत्त्वावरील घरे व कार्यालयांच्या करारनाम्यांची संख्या राज्यात ६६ हजार ९८९ तर मुंबईत २० हजार ८३९ इतकी होती.
’ या आकडेवारीवर नजर टाकली तर यंदा ऑगस्ट महिन्यात राज्यात व मुंबईत भाडेतत्त्वावरील घरे व कार्यालयांची मागणी चांगलीच वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याच वेळी भाडय़ात घट झाली असून त्यामुळेच ही मागणी वाढल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा