Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

 


 

                            


शब्द लहरी

--------------------------------------------------------------
 
चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व

माझ्या विभागात माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहयोगी प्राध्यापिकेचा आठ वर्षांचा चुणचुणीत मुलगा.. काळानुरूप नव्या मॅक्डोनाल्ड आणि पिझ्झा-हट संस्कृतीचा प्रतिनिधी. ‘दिवाळीच्या सुट्टीत काय किल्ला वगैरे करणार का?’ या माझ्या बाळबोध प्रश्नाला, ‘नाही अंकल, मी पर्सनॅलिटी बिल्डिंगच्या क्रॅश कोर्सला जाणार आहे,’ असे उत्तर देता झाला आणि मला धक्काच बसला. 

आमच्या लहानपणी आम्ही विटा, गोणपाट, माती, चिखल यांनी किल्ले बांधायचो. त्यावर छानसे अळीव पेरायचो. मावळे आणि महाराजांचे पुतळे आणायचो. किल्ल्याच्या पायथ्याशी रस्ता असायचा. त्यात आमच्या इम्पाला, फोर्ड अशा जुन्या गाडय़ांची पुन: पुन्हा रंगवलेली खेळण्यातली मॉडेल्स ठेवायचो. ‘महाराजांच्या काळात इम्पाला कशी?’ असले ऐतिहासिक प्रश्न आम्हाला पडायचे नाहीत. पण किल्ला बांधणे हा दिवाळीच्या सुट्टीतला सर्वात आनंददायी कार्यक्रम होता, हे खरे! 

आता हा आठ वर्षांचा आतिश पर्सनॅलिटी बांधून काढण्याच्या कोर्सला जाऊन आपली दिवाळी सत्कारणी लावणार होता. खूप फरक जाणवला मला त्या क्षणी दोन काळांत., दोन बालपणांत. 

आमचे बालपण आमच्या हातात अदृश्य वज्रमुठी घालत होते. आता रिस्ट-बॅण्डचा जमाना होता. आमच्या आई-वडिलांना पर्सनॅलिटीत गम्य नव्हते; पण आपल्या मुलांची जडणघडण चिरेबंदी चारित्र्याची व्हावी, त्याच्या ठायी अक्षय मूल्यांची पायाभरणी व्हावी यासाठी किल्ला, चिरोटे, फराळ, धन्वंतरी- पूजन या साऱ्या गोष्टींचा आग्रह होता. या गोष्टींनी आमचे बालपण समृद्ध केले. चारित्र्य हे असे कळत-नकळत घडत गेले. पर्सनॅलिटी फार नंतर अवतरली.

"चारित्र्य" आणि "व्यक्तिमत्त्व" या नाण्याच्या दोन बाजू. छापा आणि काटा एकमेकांपासून जितके वेगळे, तितक्याच निराळ्या या बाजूही. पण नाणं पूर्ण व्हायचं असेल आणि त्याला ‘चलनी’ म्हणून व्यवहारात चालवायचे असेल तर दोन्ही आवश्यक. मग त्या दोन बाबींत नेमका फरक तो कोणता? 

चारित्र्य दिसत नाही; ते असते. व्यक्तिमत्त्व दिसते, त्याची छाप पडते. चारित्र्य हा अस्तित्वाचा गाभा असतो, तर व्यक्तिमत्त्व हा अस्तित्वाचा एक भाग असतो. चारित्र्य उजळते, व्यक्तिमत्त्व झळाळते. चारित्र्य म्हणजे माजघरात किंवा देवघरात तेवणाऱ्या नंदादीपाची ज्योत. व्यक्तिमत्त्व म्हणजे उघडझाप करणारी इलेक्ट्रिकची चायनीज माळ. चारित्र्य उघडय़ा दारातून आत येते, व्यक्तिमत्त्व खिडकीतून डोकावते. चारित्र्य टिकाऊ असते, तर व्यक्तिमत्त्व दिखाऊ असते. व्यक्तिमत्त्व म्हणजे वड, तर चारित्र्य म्हणजे चंदन. वडाच्या पारंब्यांनी जसा त्याचा संभार पसरतो, तद्वतच व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे अनुयायांची मांदियाळी वाढते. चंदनाच्या अस्तित्वाची साक्ष पटविण्यासाठी त्याला पारंब्यांची गरज नाही, तर त्याचा गंधच रानोमाळी त्याची महती सांगतो. थाळीत टाकलेला भाकरीचा तुकडा तोंडाला लावण्यापूर्वी डोळ्यांतून निष्ठा, भक्ती, कृतज्ञता आणि स्नेहबंध यांची पोचपावती देणाऱ्या घरातल्या श्वानासारखे चारित्र्य हे नि:शब्द बोलते. तर मालकाला मिळो- ना मिळो; मला माझे दूध कमी पडता कामा नये; आणि पडलेच, तर ओटय़ावरच्या भांडय़ाला पंजा मारायला मागे-पुढे न पाहणाऱ्या मन्यासारखे व्यक्तिमत्त्व हे मतलबी, आत्मकेंद्रित आणि स्वत:पुरते असते. चारित्र्य घडते ते संस्कारांतून, शिकवणीतून आणि अनुकरणातून. व्यक्तिमत्त्व घडविले जाते ते आकारातून, अंधानुकरणातून आणि प्रसंगी अविचारातून.

पण मग आज व्यक्तिमत्त्वाचाच बोलबाला का? त्याच्या संपादनासाठी पदरमोड करून क्लासेस कशासाठी? उत्तर सोपे आहे. व्यक्तिमत्त्व विकले जाते. त्याची बोली लागते. चारित्र्य विकावू नसतेच मुळी. आणि त्याची किंमत जगाच्या बाजारात सहजासहजी ठरविता येत नाही. व्यक्तिमत्त्वाचा व्यवहार होतो आणि म्हणूनच आजच्या देवाणघेवाणीच्या जगात त्याची चलती आहे. त्याच्यासाठीच सारे काही.. कोणते कपडे घालायचे? कोणत्या जिममध्ये जायचे? पर्सनल ट्रेनर ठेवायचा की एरोबिक्स इन्स्ट्रक्टरला बोलवायचे? कोणते अन्नपदार्थ खायचे? काय टाळायचे म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसेल? याचीच सर्वत्र चर्चा.

या विचारांच्या आवर्तनात सापडलो असताना काही वर्षांपूर्वी नायर रुग्णालयात घडलेला एक प्रसंग आठवला. 

एके दिवशी डीन ऑफिसात दरवाजाखालून एक चिठ्ठी आत आली- ‘सर, द्वितीय वर्षांतला सतीश दिवसातून फक्त एकदाच जेवतो. त्याच्या घरी अडचण आहे. त्याला दुसऱ्या वेळच्या जेवणाची सोय करू शकाल का?’ शंभर मुला-मुलींमधून सतीशला शोधणे फारसे कठीण नव्हते. अपुऱ्या अन्नग्रहणाच्या खाणाखुणा अंगावर वागवीत हा काळासावळा, नम्र मुलगा मला भेटला. त्याच्या डोळ्यांत मला विनम्रता, सलज्जता, थोडीशी असहायता या साऱ्या भावभावनांचे दर्शन झाले. कँटीनवाल्याला सांगून मी त्याची रात्रीच्या थाळीची सोय केली. झाला प्रसंग मी विसरूनही गेलो.
साडेतीन महिन्यांनंतर सतीश परत कार्यालयात हजर. खाणे थोडेफार अंगी लागले होते. माझ्या कपाळावर कळत-नकळत आठी. ‘आता काय आणखी?’ असे भाव. 

सतीश नमस्कार करून बोलता झाला- ‘सर, घरचा प्रश्न थोडा मार्गी लागला. मला वडील पैसे पाठवू शकतात. आता मी माझे बिल भरेन. आपले आभार मानायला आलो आहे.’

" चारित्र्य" आणि "व्यक्तिमत्त्व" यांतला माझ्या मनातला गुंता तत्क्षणी सुटला.

-डॉ.संजय ओक
--------------------------------------------------------------
  
निसर्ग

पर्यावरण आणि निसर्ग बचावासाठी अनेक सामाजिक आणि सरकारी संस्था कार्यरत आहेत. तयांना सढळ हाताने आर्थिक मदत करा.गरज असल्यास श्रमदान करा.वृक्षतोड विरोधात मोहीम राबवा.असंख्य झाडे लावा, त्यांना जगवा. तेव्हाच एक मानवजातीचे उज्ज्वल भविष्य पुढच्या पिढ्यांसाठी आपण निर्माण करू शकतो.

सौ.प्रतिमा अरुण काळे

निगडी प्राधिकरण पुणे,४४


--------------------------------------------------------------

लघु कथा..

"नशीब..."
 
  एक सारोले नावाचे गाव होते. तिथे राकेश नावाचा मुलगा आपल्या आजी बरोबर राहायचा. अगदी मध्यम वर्गीय असा.ते वाड्यात राहायचे तिथेच तो लहानाचा मोठा झाला. त्याचे वडील शहरात नोकरी करत होते.  त्याला आई नव्हती. आजी च त्याचा सांभाळ करायची;  आजी शी त्याचे पटायचे नाही तिच्याशी तो वाद घालायचा. खुप भांडायचा.
             वडील सुट्टी मिळाली की गावी येत. पुढे त्यांच्या वाड्याचे रूपांतर मोठ्या बंगल्यात झाले त्याच्या वडिलांनी तो बांधून घेतला होता. गावात शेती घेऊन ती चालवण्या साठी माणसे लावली. राकेश हा मोठा होत होता आईची माया मिळाली नसल्याने तो त्याच्या मित्रांन कडून दुखावला गेला होता. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. वडील सुट्टी ला यायचे तेव्हा हा घरात थांबायचं नाही. काही तरी कारण देऊन घराबाहेर राहायचा. अभ्यासात मागे असायचा. हमखास महत्त्वाच्या विष् यात नापास होत होता. तसेच आजी तो एकटा आईविना वाढलेला त्या मुळे त्याचे लाड करायची त्यामुळे त्याला वाईट संगत लागली दारू पिणे, सिगरेट ओढणं असे चालू झाले. त्याच्या या सवयी मुळे आता आजीला त्रास होऊ लागला. त्याच्या खास मित्राला सांगून राकेश ची ही सवय सोडता येईल का या साठी आजी चे प्रयत्न चालू झाले. त्याच्या वडिलांनाही थोडी फार कल्पना आली, त्यामुळे त्यांनी राकेशला कॉलेज शिक्षणासाठी आपल्या बरोबरच न्यायचे ठरविले.
      त्यांनी राकेश ची कॉलेज साठी शहरात अड्डमिशन घेतली व त्याला आपल्या बरोबर शिकायला ठेवले राकेश या शहरी जीवनात रमायला लागला कॉलेज पण छान सुरू झाले तिथे त्याचा मित्र मैत्रिणी चा ग्रुप तयार झाला. त्याच्या अंगात ल्या कलाना कॉलेज मध्ये वाव मिळाला तो कविता करत असे त्यातून त्याच्या भावना व्यक्त होत असतं. त्याचे शहरात येणे त्याला, व वडिलांना देखील मानवले होते. कॉलेज शिक्षण घेत असताना त्याने अर्ध वेळ नोकरी धरली त्याने वडिलांना आजीला शहरात आणुया असे सांगितले. तो आजी शिवाय जास्त राहु शकत नव्हता. लहान पणी आईची माया आजीनीच तर दिली होती.
       राकेश ला चुलत भाऊ पण होते पण आजी चा जीव राकेश वर खूप होता. तिने आपले मृत्युपत्र तयार केले होते त्या मध्ये या गावातले त्यांचे रहाते घर तसेच १०_१२ लाख आजीचे शेतीतून आलेले स्व कष्टाचे रक्कम राकेश च्या नावावर केली होती. हे सर्व तो मोठा झाल्यावर त्याला मिळणार होते. ह्या मृतुपत्रा बाबतची माहिती कुणालाही नव्हती. 
      तर राकेश चे वडील त्यांच्या आईला घेऊन शहरात त्यांच्या कडे आले ती थकली होती तिला राकेश चे लग्न व्हावे असे वाटत होते. रीतसर शिक्षण पूर्ण झाल्यावर राकेश ने पुर्ण वेळ ची नोकरी धरली त्यात त्याचा पगार १००००_१२००० इतका होता. शहरात लग्ना नंतर इतका पगार पुरणार नाही असे त्याला वाटायला लागले व आपण गावाकडे जाऊन परत शेती करू असे त्याला वाटले. पण आजी व वडिलांनी त्याला समजावले त्यामुळे तो शहरात च राहु लागला यथावकाश त्याचे लग्न झाले त्याची बायको छान होती सर्वांशी मिळून मिसळून राही. स्वतः कमवत नव्हती पण तिचा छान दिसण्या कडे कल होता त्यामुळे पार्लर साठी तिचे खुप पैसे खर्च होत, उधळी होती, ती घरी आजीची काळजी घेई आजी आता खूपच थकली होती. कालांतराने राकेश ला मुले झाली त्यांचे शिक्षण सुरू झाले, तसेच बायकोच्या पण पैसे योग्य ठिकाणी खर्च न करण्याच्या स्वभावाने पैसे कमी पडू लागले. त्या मुळे घरात भांडण वाद होऊ लागले, बायको माहेरी निघून गेली, त्या साठी राकेश ला त्याच्या आजी ने समजावले नात सुनेच्या माहेरी देखील ती जाऊन आली सुनेला समजाऊन परत तिला घेऊन आली. तो परत त्याच्या वाईट सवयी कडे वळतो की काय असे आजीला वाटू लागले. परिस्थिती बेताचीच असल्या मुळे तो दुसरी नोकरी बघू लागला. पहिल्या नोकरीच्या अनुभवावर त्याला चांगल्या नावाजलेल्या कंपनीत वरच्या दर्जाची पोस्ट मिळाली पगार पण मनासारखं मिळू लागला हळूहळू त्याच्या घरची परिस्थिती बदलू लागली. पैसे चांगले मिळू लागले. तसेच नात सुनेने देखील बालवाडीत नोकरी धरली त्यामुळे तिचा देखील वेळ छान जाऊ लागला. काही पैसे स्वतः घर खर्चा साठी शिल्ल्लक ठेऊ लागली. पुनः नात वाचा सुखाचा सुरु झालेला संसार आजी पाहू लागली व तिच्या मनाला एक प्रकारे समाधान झाले. आता ती खूप थकली होती, तिचे कशात ही लक्ष लागेनासे झाले. म्हातारी होत होती, म्हातारे पान कधी तरी गळायचे.
        यथावकाश  राकेश च्या आजीचे म्हातारं पणाने निधन झाले. त्या नंतर काही दिवसांनी राकेश ला कंपनीच्या कामा निमित्त वकिलांशी बोलण्या साठी त्याच्या गावाला जावे लागले तेव्हा त्याला त्याच्या आजीने केलेल्या तिच्या मृत्युपत्रा बाबत माहिती मिळाली. 
       त्याने वकीला मार्फत ते मृत्युपत्र वाचले व तो आश्चर्य चकित झाला आजीने त्याला तिचे सर्व मालमत्ता संपत्ती दिली होती. ज्या आजीने त्याला वाढवले, सांभाळले त्याच आजी ने सर्व काही त्याच्या नावावर केले होते. ते पाहून त्यालाच असे वाटले की खरंच ....आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे, मी काहीही न मागता आजीने सर्व दान त्याच्या पदरात टाकले होते. राकेशला खूप रडू आले. आपण याच आजी शी लहान पणी कसे वागलो ते आठवले त्या बद्दल त्याने देवा जवळ शमा मागितली खरंच त्याच्या आजीने त्याला भरभरून दिले होते न मागता.....
        आंधळा मागतो ए क डोळा देव देतो दोन डोळे या म्हणी प्रमाणे....
काहीच हातात नसताना भरपूर मिळणे. तसेच  राकेश ला मिळाले. आजीची सर्व मालमत्ता मिळाली होती अनपेक्षित पणें... राकेश ला आजी ने भरभरून दिले होते.

✍️सौ मधुरा कर्वे.( भावगंधा )

--------------------------------------------------------------

 ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने

       येथ  हे  वाचूनि  काही  ।आणिक  सर्वथा  सुखाचे  नाही।
ऐसे  अर्जुना  बोलती  पाही ।
दुर्बुद्धी  ते ।।

        देखे  कामना  अभिभूत  होऊनि  कर्मे  आचरित  । ते  केवळ  भोगी  चित्त  ।देऊनिया ।।

       परी  एकचि  कुडे   करिती  ।
जे  स्वर्गुकामु  मनी  धरिती । 
यज्ञ पुरूषा  चुकती  ।  भोक्ता जो।।


       हे  अर्जुना  दुर्बोध  लोक  नेहमी  असे  म्हणतात  की  या
लोकांत  जीवाला   स्वर्ग सुखा वाचून  प्राप्त  करून  घेण्याच्या
साधनाष्ठुना वाचून  दुसरे  कर्तव्यच  नाही . व त्या वाचून
 दुसरे  सुखच  नाही . 

      असे  दुर्बुद्ध  लोक  कामनासक्त  होऊन  फलाभिलाष
भाराने   दडपून   जाऊन  व केवळ  भोगजन्य  सुखावर  द्रुष्टी
ठेऊन  कर्मे  करीत  असतात.

       परंतु  अर्जुना  ते  एकच  गोष्ट  फार  वाईट  करतात   की  ते। मनामध्ये  स्वर्गाची  इच्छा  धारण  करतात . आणि  यश  भोक्ता  जो  ईश्वर  त्याला  विसरतात .


        
सौ.  शैलजा  जाधव (पाटील)

           चांदवड   नासिक
--------------------------------------------------------------

विचारधारा

एखादी व्यक्ती, खूप श्रीमंत असतांना घमंड ठेवून जगत असेल...तर त्याला श्रीमंत म्हणत नाही.आणि त्याच्यातील एखादी दुसरी गरीब व्यक्ती, दिवसरात्र कष्ट करून आपल्या गरीबीला कमी न,लेकता आपल्या मनात सदैव समाधान ठेवून आनंदाने जगत असेल...तर त्याच्या सारखा  जगात कुणीही दुसरा श्रीमंत माणूस नाही. खरच ह्या, दोन व्यक्तींमध्ये किती, फरक आहे नाही.का?  म्हणूनच एक गोष्ट खास करून लक्षात असू द्यावे.कुणाचीही, श्रीमंती जन्मभर कधीच टिकून राहत नाही.  आणि तसच गरीबीचे दिवस जायला जास्त वेळ, लागत नाही. त्यासाठी, आपल्या कडे सर्व काही असेल... तेव्हा, कुणावरती हसू नये. व, आपल्या पाशी काहीही नसेल... तर,.. रडत बसू नये. 

सौ. संगीता संतोष ठलाल

मु. कुरखेडा जि. गडचिरोली

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा