Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

शिवसेनेला डिवचण्यासाठी नवे निमित्तशिवसेनेला डिवचण्यासाठी नवे निमित्त


रत्नागिरी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चालवलेले शरसंधान म्हणजे त्यांच्या ठरलेल्या अजेंड्यानुसार शिवसेनेला डिवचण्यासाठी शोधलेले आणखी एक नवे निमित्त आहे.

चिपी विमानतळाचे ७ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार असल्याचे शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी राणेंनी धावपळ करून केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांच्या हस्ते हे उद्घाटन ९ ऑक्टोबरला होईल, असे जाहीर करत नवीन वादंगाला तोंड फोडले. तसे करताना त्यांनी नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले आहे. यावर स्वाभाविकपणे सेना नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला असून उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे नक्की कोण, याबाबत उलटसुलट दावे सुरू झाले आहेत.

राणेंनी अशा प्रकारे सेनेशी नवनवीन वाद उकरत राहणे हा त्यांच्या गेल्या सुमारे १५ वर्षांच्या कार्यक्रमाचा भाग आहे. भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या आक्रमकतेला आणखी धार चढली आहे. कारण भाजपाचे या राज्यात काँग्रेसपेक्षाही जास्त हितसंबंध गुंतलेले आहेत. शिवाय, मागील विधानसभा निवडणुकीनंतर विश्वासघाताचा आरोप करत शिवसेनेने धोबीपछाड दिल्यामुळे भाजपाचे केंद्रीय नेतृत्व कमालीचे दुखावलेले आहे. त्याचा वचपा काढण्यासाठीच राणेंना पक्षात घेऊन मंत्रिपदाचा मोबदला देण्यात आला आहे आणि यांचेही सेनेला या ना त्या कारणाने डिवचत श्रेष्ठींनी सोपवलेली जबाबदारी इमानेइतबारे पार पाडत आहेत.

या सगळ्या वादंगात नोंद घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भाजपाचे राज्य पातळीवरील नेते मात्र थोडे हातचे राखून राणेंच्या या कुरघोड्यांना पाठिंबा देत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या गोंधळलेपणावर राणेंनी दिलेली प्रतिक्रिया बरीच गाजली. त्यांना त्या कारणावरून अटकही झाली. पण विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, त्यांच्या त्या टिप्पणीला स्पष्ट शब्दात असहमती दर्शवली. आत्ताही, विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री ठाकरे आले नाहीत तरी चालेल, असे राणे म्हणाले. पण भाजपाचे वजनदार नेते आशीष शेलार यांनी त्याबाबत वेगळी भूमिका घेतली आहे. याचे कारण स्पष्ट आहे की, भाजपा व सेनेमधील अंतर वाढत राहणे राणेंना राजकीयदृष्ट्या फायद्याचे असले तरी भाजपाचे राज्यातील नेते शिवसेनेशी अजूनही टोकाचे वितुष्ट घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. शिवाय, ठाकरेंशी त्यांचे व्यक्तिगत पातळीवर चांगले संबंध आहेत. त्यामुळे या प्रकारच्या वादात राणेंपासून अंतर राखण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले आहे.

या संदर्भातील थोडा रंजक इतिहास असा की, राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार असताना तत्कालीन गृहराज्यमंत्रीदीपक केसरकर यांनी १२ सप्टेबर २०१८ रोजी मुंबईहून विमानाने गणेशमूर्ती आणून या विमानतळाची चाचणी केली होती. त्यानंतर नियमित विमानसेवा मात्र सुरू झाली नाही. त्यामुळे सिंधुदुर्गवासीय आणि चाकरमान्यांची निराशा झाली. त्यानंतर या विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन ५ मार्च २०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर इत्यादींच्या उपस्थितीत झाले तेव्हा राणे त्यांनीच स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आणि माजी मुख्यमंत्री या नात्याने उपस्थित होते.

त्यावेळी त्यांनी, सर्वांचे डोळे विमान प्रत्यक्षात कधी उतरेल आणि प्रवास कधी करता येईल याकडे लागले आहे, असा टोमणा मारला होता. त्यावर पालकमंत्री केसरकर यांनी, आम्ही नुसती उद्घाटने करत नाही, तर कामे करून दाखवतो, असे प्रत्युत्तर दिले होते, तर राणे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प पालकमंत्र्यांनी केला आहे. त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे, अशी फडणवीस यांनी मल्लिनाथी केली होती. आता मात्र सगळेच राजकीय नातेसंबंध बदलले आहेत. या विमानतळावरून येत्या दोन महिन्यांमध्ये विमान उड्डाण होईल, असे प्रभू यांनी त्या कार्यक्रमात जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र त्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागली आहेत.

युतीच्या काळात कामाला वेग

चिपी विमानतळाला मंजुरी २००९ मध्ये मिळाली. पण २७४ हेक्टर क्षेत्रापलीकडील जमिनीवरील सातबारावर पेन्सिल नोंद करण्यात आली. त्यामुळे आंदोलन, संघर्ष सुरू झाला. विमानतळाच्या कामाला २०१३ मध्ये सुरुवात झाली. राज्यात भाजप-सेनेची सत्ता आल्यानंतर या कामाला वेग आला. माजी पालकमंत्री, आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांनी त्यामध्ये विशेष लक्ष घातले.

पुन्हा शुभारंभाची चर्चा

संसदेचे मागील अधिवेशन चालू असताना नागरी हवाई वाहतूक प्राधिकरण समितीने राजीव प्रताप रूडी यांच्या नेतृत्वाखाली भेट दिली. या समितीने विमानसेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक अहवाल दिला. पण विमानतळाची धावपट्टी अतिवृष्टीमुळे खराब झाल्याने उद्घाटन झाले नाही. त्यानंतर धावपट्टीची दुरुस्ती झाली आणि पुन्हा एकदा चिपी विमानतळाच्या शुभारंभाची चर्चा सुरू झाली.

..................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा