Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

उत्सवी उलाढाल यंदाही ठप्प


उत्सवी उलाढाल यंदाही ठप्प

गणेश मंडळांच्या मंदिरामध्ये किंवा छोटेखानी मंडपात करण्यात येणारी गणरायाची प्रतिष्ठापना आणि प्रशासनाच्या निर्बंधांनुसार गर्दी टाळण्यावर पुणेकरांचा भर असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सवाच्या अर्थकारणामध्ये यंदाही बदल होण्याची शक्यता दिसत नाही. उत्तम देखावे साकारून गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेणारे कलाकार आणि त्यांच्यासमवेत काम करणारे सुतार, रंगारी, हलत्या देखाव्यांसाठी मूर्ती साकारणारे कारागीर आणि विद्युत रोषणाईची कामे करणारे वीजतंत्री अशा सर्वांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.

गणेशमूर्ती विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील किमान चार लाख घरांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. प्रत्येक घरात गणेशमूर्ती, पूजा-प्रसाद व अन्य खर्च मिळून किमान दीड हजार रुपये खर्च केले जातात. लहान आकाराच्या गणेशमूर्तीची किंमत हीच सरासरी तीनशे ते सातशे रुपयांच्या घरात आहे. यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या शासनाच्या आवाहनाला शहरातील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

साडेचार हजार नोंदणीकृत मंडळे, तितकीच नोंदणी नसलेली मंडळे, विविध संस्था आणि गृहनिर्माण संस्थांसह जवळपास २५ हजार ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. गणरायाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त निघणारी आणि विसर्जनाची मिरवणूक नाही. मंदिर असलेल्या मंडळांना मंडप उभारणीचा खर्च नाही. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी मंडळांनी देखावे आणि नयनरम्य विद्युत रोषणाई करावयाची नाही, या सर्व गोष्टींमुळे अर्थकारण ठप्प होणार आहे, असे पुण्यातील गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ यांनी सांगितले.

विघ्नहर्ता, बुद्धीची देवता असलेल्या गणरायाच्या घरगुती उत्सवामध्ये खर्चाला मागे-पुढे पाहिले जात नाही. प्रतिष्ठापनेनिमित्त निघणारी आणि विसर्जन मिरवणूक नसल्यामुळे तसेच देखावे नसल्यामुळे गेल्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये खर्च जवळपास ७५ टक्के कमी झाला होता. साधेपणाने उत्सव साजरा करण्यामुळे यंदाही ‘रुपयात चार आणे’ असेच चित्र असेल. करोनाचे निवळलेले वातावरण, बाजारपेठेमध्ये काही प्रमाणात सुधारलेली अवस्था आणि आगामी महापालिका निवडणुका ध्यानात घेता इच्छुक उमेदवारांकडून आपापल्या भागांतील, विशेषत: लहान मंडळांना होणाऱ्या ‘अर्थपूर्ण’ सहकार्यामुळे या वर्षीच्या उत्सव खर्चामध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे यंदाच्या उत्सवाचे सर्वसाधारण चित्र असेल.

मातीच्या लाखो मूर्ती पडून…

सलग दुसऱ्या वर्षी पेणचे गणेश मूर्तिकार आर्थिक संकटात सापडले आहेत. करोनाचा तसेच गणेशमूर्तींबाबत शासनाच्या धोरणलकव्याचा फटका राज्यभरच्या मूर्तिकारांना बसला; पण मूर्तींचे आगर समजल्या जाणाऱ्या पेणला अर्थातच अधिक. या शहराला गणेशमूर्ती कलेचा १५० वर्षांचा इतिहास लाभला आहे. गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय आता पेण शहर आणि आसपासच्या परिसरांत मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. आज पेण शहरात गणेशमूर्ती बनवणारे १५० मूर्तिकार कार्यरत आहेत, तर जोहे, हमरापूर, वडखळ आणि कामार्ले परिसरात गणेशमूर्ती बनवणाऱ्या ४५०हून अधिक कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी जवळपास ३५ लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात. ज्या देशविदेशातही पाठवल्या जातात.

ज्या मूर्तिकला व्यवसायातून एरवी दरवर्षी २५० कोटींची उलाढाल व्हायची, त्या या व्यवसायाला गेल्या वर्षी करोना आणि टाळेबंदीचा मोठा फटका बसला होता. यंदा करोनासंकट ओसरत असताना भर पडली आहे, ती मूर्ती मातीच्या की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या, याविषयीचे धोरणच न ठरल्याची. मातीच्या गणेशमूर्तींना उठाव नसल्याने अशा लाखो मूर्ती पेणमध्ये पडून आहेत. आता या अतिरिक्त मूर्तींचे करायचे तरी काय?

केंद्रीय पर्यावरण विभागाने दोन वर्षांपूर्वी प्लास्टर ऑफ ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी घातली होती. गणेश मूर्तिकारांच्या मागणीनंतर ही बंदी शिथिल करण्यात आली. या वर्षीही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असाव्या की नसाव्या याबाबत स्पष्ट निर्देश नव्हते. त्यामुळे शाडूची माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस अशा दोन्ही प्रकारच्या गणेशमूर्ती पेणमध्ये तयार करण्यात आल्या. मात्र यंदा मातीच्या गणेशमूर्ती करण्यावर मूर्तिकारांनी जास्त भर दिला होता. मात्र आजही प्लास्टरच्याच मूर्तींना मागणी आहे. याउलट, ग्राहक मिळत नाहीत म्हणून मातीच्या ४० टक्के मूर्ती पडून आहेत. राज्य सरकारने २९ जून रोजीच्या आदेशानुसार, घरगुती गणेशमूर्तीसाठी दोन फुटांची तर सार्वजनिक मंडळांसाठी ४ फुटांची गणेशमूर्ती असावी अशी अट घातली आहे. यामुळे मोठ्या गणेशमूर्तीही पडून आहेत.

पेण परिसरात गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षभर सुरू असते. यासाठी मूर्तिकार व्यावसायिक राष्ट्र्रीयीकृत बँका, सहकारी बँका आणि पतसंस्थांकडून कर्ज उचलत असतात. या कर्जांची परतफेड गणेशोत्सवानंतर केली जात असते. मात्र या वर्षी मोठ्या प्रमाणात मातीच्या मूर्ती शिल्लक राहिल्याने या कर्जांची परतफेड वेळेत कशी करायची, हा प्रश्न भेडसावत असल्याचे मूर्तिकार सांगतात.

मातीच्या गणेशमूर्तींची किंमत जास्त; त्या वजनाला जड आणि नाजूक. याउलट प्लास्टरच्या मूर्ती वजनाला हलक्या, मजबूत आणि रेखीव असतात. प्लास्टर ऑफ पॅरिसची जैव-अपघटन क्षमता फार कमी असल्यामुळे पर्यावरणाची हानी होत असूनही ग्राहकांचा (भक्तांचा) कल प्लास्टरकडेच. त्यामुळे गणेशमूर्तींबाबत शासनाने आता ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मूर्तिकारांनी केली आहे.

गाजावाजा नाही, खर्चही नाही!

मोठ्या गणेशोत्सव मंडळांना कार्पोरेट कंपन्यांकडून त्यांच्या जाहिरातीच्या मोबदल्यात मिळणारी देणगी, त्यात वर्गणीचा लागणारा हातभार यातून गणेशोत्सवाचा होणारा ‘इव्हेन्ट’ यंदा फक्त औपचारिकता म्हणून साजरा होण्याची शक्यता आहे. एरवी एका मंडळाचा गणेशोत्सवावर २० ते २५ लाख रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंत होणारा खर्च आता काही हजारांपुरता मर्यादित झाला आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात करोनाचा प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ही स्थिती उद्भवली आहे.

राज्याची उपराजधानी म्हणजेच नागपूर शहरात सुमारे १२०० मंडळे आहेत. त्यातील महालचा राजा, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू मार्गावरील श्री संती गणेशोत्सव मंडळ यासारख्या मंडळांनी परंपरा जपण्यासोबतच त्याला मोठे स्वरूप दिले. ११ ते १५ फुटांपर्यंतची गणेश मूर्ती, त्यासोबत दहा ते बारा ढोल-ताशा पथके, भव्य मंडप, सजावट, यावरही लाखोंचा खर्च होत होता. अनेक मंडळांमध्ये विविध देखावे साकारण्यासाठी परराज्यातून कलावंत येत होते. तो खर्चदेखील लाखांच्या आसपास होता. त्यासाठी मंडळांना देणगी मिळावी म्हणून पुणे, मुंबई शहरांपर्यंत कार्पोरेट कं पन्यांकडे प्रस्ताव पाठवले जात होते. लोकांची वर्दळ व त्याचा कं पनीला कसा फायदा होईल यावरून देणगी दिली जात होती.

हे अर्थकारणाचे चक्र  असले तरीही काम करताना एक वेगळाच उत्साह असायचा. आता करोनामुळे देणगी हा मुद्दाच गौण ठरला!  सततच्या टाळेबंदीमुळे देणगीदारांचे आर्थिक गणित कोलमडले. गेल्या वर्षीपासून गर्दीही ओसरली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. लोकमान्य टिळकांनी सुरू के लेली परंपरा जपणे ही एकमेव औपचारिकता आता बाकी राहिली आहे. मात्र, ‘लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल,’ असे ६३ वर्षांची परंपरा असलेल्या श्री संती गणेशोत्सव मंडळाचे संजय चिंचोळे यांनी सांगितले.

उपराजधानीतील एकूणच गणेशोत्सवातील खर्च आता करोनामुळे २० टक्क्यांवर आला आहे. सर्वाधिक उंचीच्या गणेशमूर्ती आणि त्यानुसार वाढत जाणारी किं मत हा चितारओळीतील मूर्तिकारांचा मोठा आर्थिक स्राोत होता. मूर्तीच्या उंचीवर निर्बंध आणल्याने ५० हजार रुपयांची मूर्ती आता आठ ते दहा हजार रुपयांवर आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मूर्तिकारांच्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या मेहनतीला दोन कोटी रुपयांच्या कमाईचे कोंदण लागत होते. अशा मूर्तिकारांची हीच कमाई आता फार तर पाच वा दहा लाखांवर आली आहे, असे मूर्तिकार दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले. मंडप आणि सजावटीचा व्यवसाय जवळपास थंड बस्त्यात गेला आहे. पुण्यामुंबईची ढोल-ताशा संस्कृती गेल्या दशकभरात नागपुरातही रुजायला लागली होती. बाहेरच्या राज्यांतूनही इथल्या ढोल-ताशांचा निनाद गर्जत होता. प्रतितास वादनाकरिता ४० हजार रुपयांपासून पुढे आकारले जात होते. दोन वर्षांपासून वादनच नाही. आता ते सुरू करायचे म्हटले तरी ढोल बाहेर काढावे लागतील आणि आधी त्याची दुरुस्ती करावी लागेल. त्यासाठी किमान चार ते पाच लाख रुपयांचा खर्च आहे, असे शिवसंस्कृ ती पथकाचे प्रसाद मांजरखेडे यांनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे मेडिकल महाविद्यालयाचा गणेशोत्सव संपूर्ण विदर्भाचे लक्ष वेधणारा. देशभरातून आलेले विद्यार्थी इथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. स्थापनेपासून विसर्जनापर्यंत लाखो रुपयांची उधळण होते. दहाही दिवस जेवणावळी असतात. लाखो रुपयांचे फटाके  वाजतात. विद्यार्थ्यांचे आईवडील खास गणेशोत्सवासाठी येतात आणि त्यांच्या निवासासाठी हॉटेलांच्या पूर्वनोंदणीवरही हजारो रुपयांचा खर्च होतो. केवळ विसर्जन मिरवणुकीवरच १५ ते २० लाख रुपये खर्च के ले जातात. या साऱ्याच उलाढालीला करोनामुळे ‘ब्रेक’ लागला आहे.

महापुराचाही फटका

गणेशोत्सव आणि शिमगा हे कोकणातील दोन सर्वांत महत्त्वाचे, धूमधडाक्यात साजरे होणारे सण-उत्सव! करोनाच्या ‘दुसऱ्या लाटे’मुळे शिमगोत्सवावर जितके निर्बंध यंदा होते, तितके कडक ते गणेशोत्सव काळात नाहीत. पण गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात या उत्सवाचे रंग फिके झाले आहेत.

धुवांधार पाऊस आणि त्यासोबत येणारे पूर या प्रदेशात नवीन नाहीत. पण पूर्वीचे सर्व उच्चांक मोडीत काढत गेल्या महिन्यात सर्वत्र महापुरामुळे हाहा:कार माजला. जिल्ह्यात राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड या पाच प्रमुख बाजारपेठांपैकी रत्नागिरी वगळता इतर चारही पेठांत पुराचे पाणी भरल्याने तेथील व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला.

अर्जुना आणि कोदवली या दोन नद्यांच्या किनाऱ्यांवर वसलेल्या राजापुरातील बाजारपेठेचे आर्थिक गणित यंदाच्या मोसमात या दोन्ही नद्यांना तब्बल चार वेळा आलेल्या पुरांमुळे कोलमडून गेले आहे. करोनाविषयक निर्बंधांत शिथिलता आणून शासनाने सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने येथील बाजारपेठ पूर्वपदावर आली असली तरी आर्थिक व्यवहारांमध्ये दरवर्षी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिसणारी तेजी अद्याप अदृश्यच आहे. फळा-फुलांच्या विक्रेत्यांसह गणेशोत्सवासाठी सजावट व अन्य साहित्याने भरलेली दुकाने व्यापाऱ्यांनी थाटली असली तरी तेथे ग्राहकांची म्हणावी अशी वर्दळ दिसत नाही. बरी बाब म्हणजे, नवीन महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हा उत्सव येत असल्याने येत्या काही दिवसांत सकारात्मक प्रतिसाद मिळून आर्थिक गाडा रुळावर येण्याची व्यापाऱ्यांना आशा आहे. मात्र करोनाच्या काळात कामधंदा बंद राहिल्याने पैशाअभावी लोक पिचलेले आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम आर्थिक उलाढालीवर झाला आहे.

महापुराचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या चिपळूणमध्ये सुमारे ७० टक्के व्यावसायिकांची पाण्याखाली होती. तरीसुद्धा गणेशोत्सव तोंडावर असल्यामुळे एका बाजूला दुकानांची दुरुस्ती, तर दुसऱ्या बाजूला नवीन साहित्य आणून त्याची विक्री सुरू आहे. शांत बसून राहण्यापेक्षा या उत्सवानिमित्त आलेली संधी साधण्याकडे व्यावसायिकांचा कल दिसत आहे. गणपतीभोवतीची सजावट, आरास आणि इतर साहित्य चिपळूणच्याही बाजारपेठेत अनेक ठिकाणी दिसू लागले आहे. यातही दुकानांपेक्षा तात्पुरत्या प्रदर्शन-विक्रीवर भर अधिक आणि लहान आणि कमी गुंतवणूक करणाऱ्या व्यावसायिकांचा पुढाकार जास्त. काही ठिकाणी नेहमीचे दुकान दुरुस्तीसाठी बंद आणि त्याच्या पुढील मोकळ्या जागेत व्यवसाय मांडलेला, असेही दिसते. पुरातून वाचलेला माल कमी किमतीत विकण्याचा मार्ग येथील व्यापाऱ्यांनी यापूर्वीच अवलंबला आहे. किराणा दुकानांतही खराब झालेला माल वगळता प्लास्टिकबंद साहित्य आणि पाणी न लागलेल्या वस्तूंची न फेकता पुनर्विक्री केली जात आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाजारपेठ दीर्घकाळ बंद राहिली. आता निर्बंध शिथिल झाले असले तरी दुकानांत फारसे चलनवलन नाही. बाजारपेठ चालू राहिली तर संसर्ग वाढतो, हा निष्कर्ष चुकीचा असल्याचे सध्या घटलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भविष्यकाळात शासनाने हा बडगा उगारला नाही तरच चांगली उलाढाल होऊ शकेल. – निखिल देसाई,  रत्नागिरी तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष

अस्थिरतेचे सावट आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परिस्थिती बरी असली तरी ती चांगली नक्कीच नाही. शासनाने गणेशमूर्तींबाबत ठोस धोरण आखले पाहिजे. वर्षभर गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते, त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर काही निर्णय घेतल्यास त्याचा थेट फटका मूर्तिकारांना बसतो. – श्रीकांत देवधर (अध्यक्ष, गणेश मूर्तिकार संघटना- पेण)

...................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा