Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; करोना विघ्न दूर करण्यासाठी गणरायाकडे साकडं


Ganpati


गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; करोना विघ्न दूर करण्यासाठी गणरायाकडे साकडंकरोनाच्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेले निर्बंध, नियम आणि करोना विघ्न यासारख्या गोष्टींमध्येही आपल्या भक्तांच्या हाकेला ओ देत गणराय आजपासून दहा दिवसांच्या मुक्कासाठी आले आहेत. राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे स्वागत करण्यात येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर नियम लागू केलेले असले तरी गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. अनेक ठिकाणी करोनासंदर्भातील नियमांची काळजी घेत भक्तांनी गणरायांची प्रतिष्ठापना केलीय. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘एक… दोन.. तीन… चार… गणपतीचा जयजयकार’, ‘मोरया रे बाप्पा मोरया रे…’ यासारख्या घोषणांनी वातावरण मंगलमय झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

महाराष्ट्राबरोबरच देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात गणरायाचं स्वागत केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. गेल्या वर्षी करोनाभयाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा झाला. यंदा मात्र गणेशभक्तांच्या उत्साहाला भरते आले आहे. गुरुवारी मुंबईसह सर्व उपनगरांतील बाजारपेठा खरेदीसाठी गजबजल्याचं चित्र दिसून आलं. सजावटीच्या वस्तूंपासून ते फळे-भाज्या-फुले खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र दिसत होते. हाच उत्साह आता पुढील १० दिवस कायम राहणार असून करोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर अशीच प्रार्थना सर्व गणेशभक्त लाडक्या गणपती बाप्पाकडे करत आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, बोरिवली, विरार यासारख्या मुंबईच्या लगतच्या उपगरांमध्ये आज सकाळपासूनच आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच लगबग दिसून आली. मुंबईमधील प्रमुख गणपती मंदिरांमध्ये पुजारी आणि मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त गणेश पुजा पार पडली. पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणेश मंदिरामध्येही आज मोठ्या उत्साहामध्ये गणरायाची आरती पार पडली. त्याचप्रमाणे नागपूरमधील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात सकाळी मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये गणरायाची आरती करण्यात आली.

मुंबईतील बाजारपेठांमध्ये गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गर्दीच गर्दी…

मुंबईतील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त होत असतानाही गुरुवारी, गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मुंबईतील प्रमुख बाजारपेठांत गर्दीला उधाण आले होते. उत्सवादरम्यान गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस-पालिका उपाययोजना करत असताना बाजारांत मात्र, पूजा साहित्य तसेच अन्य वस्तूंच्या खरेदीकरिता नागरिकांची झुंबड उडाली होती. गेले काही दिवस ग्राहकांच्या वर्दळीवाचून ओस झालेली बाजारपेठ गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी गजबजून गेली. दादर, लालबाग, फोर्ट परिसरातील बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. दुपारनंतर गर्दी अधिक वाढली. लोकल प्रवासास बंदी असल्याने वैयक्तिक वाहने घेऊन नागरिक खरेदीसाठी आले होते. परिणामी सायंकाळी चारच्या सुमारास दादरमध्ये प्रचंड वाहतूककोंडी झाली. हीच अवस्था लालबागसह मुंबईतील स्थानिक बाजारपेठांची होती.

एकच दिवस कमाईचा असल्याने विक्रेत्यांनी रस्त्यावरही दुकाने थाटली होती. गणपतीचे शेले, कंठय़ा, दागिने, गृहसजावटीच्या वस्तू, रांगोळ्या, शोभेची फुले, सुका प्रसाद, पूजेचे साहित्य, फुले-फळे यांनी रास्ते व्यापून गेले होते. ग्राहकांची विक्रेत्याबरोबर चालणारी घासाघीस, गणेशाच्या येण्याची आतुरता, मनासारखी विक्री होत असल्याने विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान यामुळे बाजारपेठेत उत्सवी वातावरण होते.

फुल बाजारात नियमांचे उल्लंघन

इतर खरेदीपेक्षा फुले खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. दादर स्थानकाबाहेरील किरकोळ फुल बाजारात गर्दी इतकी वाढली की, नागरिकांना चालण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती. एकाही विक्रेत्याच्या नाकातोंडावर मुखपट्टी नव्हती. अंतरनियमही पाळले जात नव्हते.

पोलिसांची कारवाई

दादरमधील गर्दी वाढत गेल्याने पोलिसांना अखेर कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. दुकानांव्यतिरिक्त असलेले ठेले, फूल विक्रेते यांना हटवण्यात आले. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर विक्रीस बसलेल्या विक्रेत्यांनाही पोलिसांनी समज दिली. ‘रस्ते अरुंद, फेरीवाले अधिक त्यात मुंबईभरातील नागरिक खरेदीसाठी जमल्याने वाहतूककोंडी झाली. परंतु दुपारी गर्दीचे वातावरण दिसताच आम्ही कारवाई सुरू केली,’ असे दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी सांगितले.

महागाईचे विघ्न

इंधन दरवाढीने काकुळतीला आलेले सर्वसामान्य नागरिक गणरायाला साकडे घालण्याची तयारी करत असताना अन्य गोष्टींच्या महागाईचे विघ्न पुढे ठाकले आहे.  गणेशोत्सवात महत्त्वाच्या असलेल्या नारळाचा भाव आठ ते पंधरा रुपयांपर्यंत वाढलेला आहे. आठवडाभरापूर्वी २५ ते ३० रुपयांना मिळणारे नारळ आता ३५ ते ४५ रुपयांना विकले जात आहेत.  पूजेच्या साहित्यात असलेली विडय़ाची पाने, केळीचे पान, सुपाऱ्या आणि इतर साहित्याच्या दरातही वाढ झाली आहे. पूजेसाठी आवश्यक असलेले तयार हार आणि सुटय़ा फुलांच्या किमती गेल्या आठवडय़ापेक्षा गुरुवारी अधिक होत्या.  गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणारे बहुतांश साहित्य गेल्या वर्षीच्या तुलनेत महागले आहे. विघनटशील प्लास्टिक, फायबरपासून तयार करण्यात आलेल्या रंगबिरंगी झालरी, तोरण, माळा यांच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली आहे.

..................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा