Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या “आजी-माजी-भावी” विधानामागचा अर्थ काय? संजय राऊत म्हणतात…Shiv Sena MP Sanjay Raut statement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या “आजी-माजी-भावी” विधानामागचा अर्थ काय? संजय राऊत म्हणतात…


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'आजी-माजी-भावी' विधानावरून उलट-सुलट चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी त्याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानावरून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. व्यासपीठावर बसलेले रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याकडे बघून त्यांनी “आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख केल्यानंतर शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपाकडून देखील मुख्यमंत्र्यांच्या हाकेला ओ देत असल्याच्या प्रतिक्रिया येत असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या त्या विधानामागचा नेमका अर्थ कोणता? याविषयी भाष्य केलं आहे. तसेच, “ज्यांना पतंग उडवायचीये, त्यांनी उडवावी. कुणाची पतंग कधी कापायची, हे आम्हाला समजतं”, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

५ वर्षांची कमिटमेंट…

“सरकार ५ वर्ष चालवायची कमिटमेंट आहे. शिवसेना शब्दांची पक्की असते. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही, शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही. शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे. आम्ही सगळे त्याच मार्गाने चालतो. हे सरकार पडेल, या भ्रमात कुणी राहू नये. कुणाला पतंग उडवायची असेल तर त्यांनी जरूर उडवावी. तो पतंग कधी कापायचा आम्हाला माहिती आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

कुणीतरी तिकडे आहे…

“मुख्यमंत्री ठाकरे यांची एक भाषण करण्याची स्टाईल आहे. त्या पद्धतीने त्यांनी हे भाषण केलं आहे. त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की नवीन आघाडी होईल, आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ज्यांना भावी सहकारी व्हायचंय, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. राजकारणात ज्या हालचाली दिसत आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले की आम्हाला माजी म्हणून नका, त्या याचबाबतच्या हालचाली आहेत. कुणीतरी तिकडे आहेत, ज्यांना इकडे यायचंय. त्यांच्यासाठी उद्धवजींनी संकेत दिलेत की तुम्ही या”, असं संजय राऊत म्हणाले.

..अशा पक्षाशी हातमिळवणी कशी करू?

“ज्या पक्षातल्या लोकांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द काढतात, कानाखाली मारण्याची भाषा करतात, ही जी नवीन संस्कृती समोर आली आहे, अशा पक्षांशी आम्ही हातमिळवणी कशी करू शकतो?”, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

“आम्ही झुकणार नाही”

“एमआयएमसारख्या पक्षांना रोखण्यासाठी महाविकासआघाडी समर्थ आहोत. तसं नसतं, तर दोन वर्ष सरकार सुरळीत चाललंच नसतं. तिन्ही पक्षांमध्ये सरकार चालवण्याविषयी कोणतेही मतभेद नाहीत. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालवलं जातंय. पुढची तीन वर्ष गतिमान पद्धतीने सरकार चालेल याविषयी विरोधी पक्षांनी खात्री बाळगावी. ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही गुडघे टेकून सरेंडर होऊ, त्यांना हवं ते करू, हा कचरा जर कुणाच्या डोक्यात असेल, तर तो कचरा तसाच ठेवा, आम्ही झुकणार नाही”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.

काय घडलं औरंगाबादमध्ये?

मुख्यमंत्र्यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारत उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे “आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”,, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे त्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना मागे वळून व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींकडे पाहिलं. यावेळी व्यासपीठावर रावसाहेब दानवे आणि भागवत कराड हे देखील उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या विधानामधून शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याचेच तर संकेत द्यायचे नव्हते ना? याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे.

......................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा