Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

“ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून…”; भाजपावर शिवसेनेचा हल्लाबोल

 

BJP vs Shivsena


“ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून…”; भाजपावर शिवसेनेचा हल्लाबोल


“कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता. निवडणुकांच्या आखाडय़ात हे व्हायचेच.”

राज्यात मागील काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या विरुद्ध ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असा संघर्ष सुरु असून कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी याच प्रकरणावरुन सोमय्या यांना सोमवारी आयोजित केलेला कोल्हापूर दौरा रद्द करावा लागल्यानंतर सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सोमवारी पहायला मिळाल्या. मात्र आता या वादामध्ये शिवसेनेनेही उडी घेतली असून त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच महाराष्ट्र भाजपावर निशाणा साधलाय.

” ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या खिशातच आहेत व त्यांच्या जोरावर आपण राजकीय विरोधकांना धमक्या देऊ शकतो, असे महाराष्ट्रातील भाजपा पुढाऱ्यांना वाटत आहे व तसे धमकीसत्र त्यांनी चालवले आहेच. काही झाले की, हे लोक फक्त ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’च्याच नावाने धमक्या देतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ‘‘ईडी’शी लढताना तोंडाला फेस येईल.’’ पाटील यांना ‘ईडी’चा इतका अनुभव कधीपासून आला?”, असा प्रश्न शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून विचारलाय.

पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता

“हसन मुश्रीफ यांच्यावर माजी खासदार सोमय्या यांनी काही आरोप केले आहेत. हे आरोप चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने केले असावेत अशी मुश्रीफ यांना खात्री आहे, कारण आरोप करणाऱ्या दोघांच्याही तोंडी ‘ईडी’चे नाव आहे. मुश्रीफ हे मंत्री आहेत व कोल्हापुरात त्यांचे राजकीय वजन आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपाचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता. निवडणुकांच्या आखाडय़ात हे व्हायचेच. प्रश्न तो नसून केंद्रीय तपास पथकांच्या राजकीय गैरवापराचा आहे,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांना लेखातून चिमटा काढण्यात आलाय.

आता कोथळा काढायची भाषा केली जाते

“‘ईडी’शी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. ‘‘आमची ‘वर’ सत्ता आहे, आम्ही काहीही करू शकतो,’’ अशी भाषा पाटील यांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. ‘‘केंद्रीय तपास यंत्रणांची हत्यारे चालवून आम्ही विरोधकांचे कोथळे काढू, बेजार करू’’ ही त्यांची नियत आहे व महाराष्ट्राच्या परंपरेला हा अहंकार शोभणारा नाही. शरद पवार यांनी मृणालताई गोरे दालनाच्या उद्घाटनप्रसंगी नेमकी तीच खंत व्यक्त केली आहे. पवार एकदम भूतकाळात गेले व म्हणाले, ‘‘त्या काळात अनेकदा वाद झाले मृणालताई असताना सदनामध्ये अनेकदा वाद व्हायचे, पण ते राज्याच्या हिताचे असायचे. एक सुसंवाद असलेला पाहायला मिळायचा. तो सुसंवाद आज पाहायला मिळत नाही. आता कोथळा काढायची भाषा केली जाते.’’ पवार यांची ही खंत योग्यच आहे. सुसंवाद संपला आहे व राजकारण द्वेषाचे व अहंकाराचे झाले आहे,” असं लेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारला शत्रू मानून वागत आहे

“महाराष्ट्रातील भाजपाचे लोक संसदीय लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवत आहेत,” असा आरोपही या लेखामधून करण्यात आलाय. “राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा, प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवून थेट दिल्लीच्या कानात बोटे घालीत आहेत. राज्यपालांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत प्रत्येक जण महाराष्ट्र सरकारला शत्रू मानून वागत आहे. राज्य खिळखिळे करायचे, राज्याची गती रोखायची, बेबंद आरोप करून खळबळ माजवायची हेच त्यांचे धोरण आहे. एखाद्या मंत्र्याने वा घटनात्मक पदावरील व्यक्तीने काही चुकीचे काम केले असेल तर राज्यात त्याबाबत कायदेशीर दखल घेणारी यंत्रणा आहे. पोलीस, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, आर्थिक गुन्हे शाखा, लोकायुक्त त्यासाठी आहेत; पण विरोधी पक्ष थेट ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्याच बाता मारतात,” असं म्हणत भाजपावर टीका केलीय.

हा केंद्रीय तपास यंत्रणांचा हा दुरुपयोग नाही, तर काय?

“चंद्रकांतदादा हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत याचे भान तरी त्यांनी ठेवावे, पण चंद्रकांतदादांचे वागणे, बोलणे व फुकाचे डोलणे राज्यात कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या मुखातून भाजपाची लक्तरेच लोंबत असतात. एकतर ते ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या संस्थांना बदनाम करीत आहेत. या संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडेल असे त्यांचे वर्तन आहे. दुसरे एक गंभीर विधान पाटलांनी केले. सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचेसुद्धा स्किल नाही. पाटील म्हणतात तसे हे स्किल माजी मंत्री म्हणून त्यांच्याकडे आहे व याबाबतची ‘पीएच.डी.’ त्यांनी केली असावी. त्यामुळे ‘ईडी’ने पाटील व इतर माजी मंत्र्यांच्या पैसे खाण्याचा हिशेब एकदा घ्यायला हवा व आधीच्या सरकारातील मंत्र्यांच्या तोंडास फेस आणायला हवा. स्वतः फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्याचे प्रशासन त्यांना माहीत आहे. ज्या प्रशासनाकडून त्यांनी कारभार केला तेच प्रशासन आजही आहे. पुन्हा प्रशासनातले अधिकारी विरोधी पक्षनेत्यांना गोपनीय रीतीने भेटत असतात हा स्फोट त्यांनीच केला आहे. मग ऊठसूट ‘ईडी’, ‘सीबीआय’च्या धमक्या का देता? केंद्रीय तपास यंत्रणांचा हा दुरुपयोग नाही, तर काय?”, असा प्रश्न लेखातून विचारण्यात आलाय.

“…एकदा तसे जाहीर करा म्हणजे झाले”

“महाराष्ट्रातील मंत्र्यांवर, सरकारवर आरोप करणाऱ्याला केंद्र सरकार लगेच ‘झेड’ दर्जाची केंद्रीय सुरक्षा पुरवून स्वतःचेच हसे करून घेते. सत्य असे आहे की, ‘ईडी’मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे. भाजपाचे माजी खासदार सोमय्या यांचे आरोप व बाता या नागपूरच्या गोटमारीसारख्याच आहेत. ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यातील अनेकांनी त्यांना कोर्टात खेचले आहे. कोल्हापूरचा पहेलवान गडी मुश्रीफ तर कुणाला ऐकणार नाही. सोमय्या कोल्हापुरात पोहोचले असते तर कोल्हापूरकरांच्या दैवतांवरही त्यांनी आरोप केले असते. ते उठता बसता, जागेपणी, झोपेतही आरोप करतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था व पोलिसांवर ताण वाढतो. मुंबईत दहशतवाद्यांचे नेटवर्क पकडण्यात आले आहे. मुंबई लोकलमध्ये विषारी वायू सोडण्याचा अतिरेक्यांचा कट होता. पोलीस त्या तपासात गुंतले असतानाच विरोधी पक्ष राज्यात भलतेच प्रश्न निर्माण करून पोलिसांवरील ताण वाढवीत आहे. विरोधकांनी निर्माण केलेल्या दुर्गंधीमुळेही जनजीवन विस्कळीत होऊ शकेल. विरोधकांना राज्यातील जनतेच्या जिवाशी खेळायचे आहे काय? एकदा तसे जाहीर करा म्हणजे झाले,” अशा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आलाय.

................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा