
महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का
बेळगाव महापालिका स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समितीची अबाधित असणारी सत्ता सोमवारी संपुष्टात आली. भाजपने ३५ जागा मिळवत प्रथमच महापालिकेवर अन्य पक्षाचा झेंडा लावला आहे. तर आजवर सत्तेत राहणाऱ्या एकीकरण समितीचे या वेळी अवघे चार उमेदवार निवडून आले आहेत.
यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीसह भाजप, काँग्रेस, आप, धर्मनिरपेक्ष जनता दल, एमआयएम यासारखे प्रमुख पक्ष उतरले असल्याने निकाल कसा राहणार याचे कुतूहल होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपाठोपाठ भाजपने बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत यशाची परंपरा कायम राखली. दरम्यान बेळगाव महापालिकेत आजवर कायम सत्ताधारी राहिलेल्या एकीकरण समितीला या वेळी अवघ्या चार जागांवर यश मिळाले आहे. समितीची आजवरची ही सर्वात वाईट कामगिरी आहे. समिती यंदा सर्व ५८ प्रभागांत आपले उमेदवारही देऊ शकली नाही. त्यांनी केवळ २१ प्रभागांत अधिकृत उमेदवार दिले होते. अन्यत्र मैत्रीपूर्ण लढती करण्याची मुभा होती. यामुळे मराठी भाषक मतदारांमध्ये एकवाक्यता दिसली नाही. दुसरीकडे काँग्रेसला दहा, अपक्षांना आठ जागा मिळाल्या तर एक जागा जिंकत ‘एमआयएम’ने चंचुप्रवेश केला आहे.
समितीला धक्का मात्र मराठी भाषिकांची सत्ता
बेळगाव महापालिका स्थापन झाल्यापासून अपवाद वगळता सातत्याने एकीकरण समितीचे महापौर झाले आहेत. एकीकरण समितीला आजवर मिळालेल्या या सर्वात कमी जागा आहेत. दरम्यान बेळगावमधील एकीकरण समितीची सत्ता संपुष्टात येत असली तरी महापालिकेवर विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये मराठी भाषिक मोठय़ा संख्येने आहेत. एक प्रकारे एकीकरण समितीला धक्का मिळाला असला तरी बेळगाव महापालिकेवरील मराठी भाषिकांची सत्ता कायम असल्याचे दिसून येत आहे.
हुबळी-धारवाडमध्ये भाजप तर, कलबुर्गीत काँग्रेसला सर्वाधिक जागा
बंगळूरु : हुबळी-धारवाड महापालिकेत भाजपने ८२ पैकी सर्वाधिक ३९ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला ३३ एआयएमआयएमला ३ तर अपक्षांना ६ व धर्मनिरपेक्ष जनता दलाला एक जागा मिळाली आहे. येथे अपक्षांच्या मदतीने भाजप महापौर निवडेल असे संकेत पक्षाच्या नेत्यांनी दिले. कलबुर्गी महापालिकेत काँग्रेसला बहुमतासाठी एक जागा कमी आहे. तेथे ५५ पैकी काँग्रेसला २७, भाजपला २३ धर्मनिरपेक्ष जनता दलाला ४ तर अपक्षाला एक जागा मिळाली आहे. तिन्ही महापालिकांमध्ये भाजपचाच महापौर होईल असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला आहे. जनमताच्या चाचणीत यशस्वी झालो आहोत अशी प्रतिक्रिया एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे घेतलेल्या बोम्मई यांनी दिली आहे.
मराठी भाषक उमेदवार आजवर एकीकरण समितीतून निवडून येत असत पण या वेळी प्रथमच ते राष्ट्रीय पक्षातून निवडून आले आहेत; हा लक्षणीय बदल आहे. यामुळे पालिकेत एकीकरण समितीचे सदस्य नसले तरी राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून मराठी भाषकच सत्तेत आहेत.
– दीपक दळवी , बेळगाव शहर अध्यक्ष, महाराष्ट्र एकीकरण समिती
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा