Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

लखलखत्या तेजस्विनी..

 

लखलखत्या तेजस्विनी..


भारतीय बुद्धिबळ संघात कोनेरु हम्पी आणि पद्मिनी राऊत या दोघी अधिक मानांकित खेळाडू नव्हत्या.

आयपीएलच्या धामधुमीतही भारतीय क्रीडारसिकांचे लक्ष ज्या दोन स्पर्धा किंवा मालिकांनी वेधून घेतले त्या म्हणजे भारत-ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट मालिका आणि जागतिक महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धा. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना अजून सुरू आहे, त्याचा निकाल काहीही लागला तरी सांगलीकर स्मृती मानधनाच्या ऐतिहासिक शतकाने जगभरातील क्रिकेटरसिकांना प्रभावित केले. वास्तविक गुलाबी चेंडूचे क्रिकेट खेळण्यासाठी सराव असणे महत्त्वाचे असते. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही क्रिकेट संघांनी – पुरुष आणि महिला – या प्रकारात बऱ्यापैकी कौशल्य आत्मसात केले आहे. इतर संघ अजूनही त्याला स्थिरावत आहेत. तरीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना आणि शफाली वर्मा कमालीच्या आत्मविश्वासाने उतरल्या आणि त्यांनी वर्चस्वही गाजवायला सुरुवात केली. स्मृतीच्या प्रतिआक्रमणासमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजच नवख्यांसारख्या चाचपडू लागल्या. ती अपेक्षा खरे तर भारतीय संघाकडून बाळगली जात होती. त्यामुळेच भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले, पण स्मृती मानधनाने यजमानांवरच बाजी उलटवली. हा आत्मविश्वास आला कोठून? पुरुष संघाच्या पूर्णपणे विपरीत, महिला संघ प्रदीर्घ अवधीनंतर आंतरराष्ट्रीय मालिका खेळतो आहे. परंतु तयारी वा सरावाचा अभाव या खेळाडूंमध्ये फारसा आढळून आलाच नाही.

महिला बुद्धिबळपटूंची कामगिरी तर अधिकच लखलखती. स्पेनमधील जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम फेरीत भारतीय महिला बलाढय़ रशियाकडून पराभूत झाल्या. रशियाच्या जवळपास प्रत्येक बुद्धिबळपटूचे एलो मानांकन किंवा दर्जा-क्षमता २५०० गुणांपेक्षा अधिक. भारताची केवळ हरिका द्रोणवल्ली २५०० पेक्षा जरा अधिक, बाकीच्या २३००-२४०० या टप्प्यातल्या. तरीही रशियाला विजयासाठी झगडावे लागले. हरिकाने अव्वल बोर्डावर तिच्यापेक्षा जवळपास १०० गुणांनी वरचढ असलेल्या अलेक्सांड्रा गोर्याचकिनाला काळ्या मोहऱ्यांनिशी हरवले. तिच्या इतर सहकाऱ्यांनीही चांगली लढत दिली, तरी अखेरीस रशियन संघाचा अनुभव निर्णायक ठरला. परंतु उपान्त्य फेरीत या संघाने रशियाइतक्याच प्रतिभावान अशा जॉर्जियाच्या संघाविरुद्ध मिळवलेला विजय संस्मरणीयच. या विजयाची तुलना भारतीय महिला हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या सनसनाटी विजयाशीच करता येईल. भारतीय बुद्धिबळ संघात कोनेरु हम्पी आणि पद्मिनी राऊत या दोघी अधिक मानांकित खेळाडू नव्हत्या. म्हणजे हा संघ पूर्ण ताकदीनिशी उतरला नव्हता. तरीही या संघाने इथवर मजल मारली, याचे श्रेय निसंशय प्रत्यक्ष संघातील बुद्धिबळपटू आणि प्रशिक्षक-कर्णधार अभिजित कुंटे यांचे. काही वर्षांपूर्वी भारतीय पुरुषांच्याही आधी महिला संघाने ऑलिम्पियाडमध्ये कांस्यपदक मिळवून दाखवले होते. विश्वनाथन आनंद, कृष्णन शशीकिरण, पेंटाल्या हरिकृष्ण, विदिथ गुजराती, भास्करन अधिबान, सूर्यशेखर गांगुली यांच्या पुरुष संघाप्रमाणेच कोनेरु हम्पी, हरिका द्रोणवल्ली, तान्या सचदेव, सौम्या स्वामिनाथन, पद्मिनी राऊत, मेरी आन गोम्स, भक्ती कुलकर्णी यांच्या संघाचाही बुद्धिबळविश्वात दबदबा निर्माण झाला होता. कोविड-१९मुळे प्रथमच ऑनलाइन खेळवल्या गेलेल्या दोन पाठोपाठच्या ऑलिम्पियाडमध्ये भारताने अनुक्रमे संयुक्त सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले, त्या यशातही महिला बुद्धिबळपटूंचे योगदान लक्षणीयच. तरीही या खेळाडूंना अर्जुन आणि तत्सम पुरस्कारांपासून वर्षांनुवर्षे वंचित राहावे लागते, हा आपला करंटेपणा. मध्यंतरी द्रोणाचार्य विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांनी ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून या व्यथेकडे लक्ष वेधलेच आहे. सलग तीन स्पर्धामध्ये कधी पुरुषांच्या बरोबरीने, कधी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कामगिरी करणाऱ्या या महिला बुद्धिबळपटूंच्या कर्तृत्वाला न्याय देण्यासाठी निव्वळ कौतुकाचे बोल पुरेसे नाहीत. तो सहजमार्ग असला, तरी जबाबदारी टाळून मोकळे होण्याचा बेदरकारपणा त्यात दिसतो. अधूनमधून तोंडदेखलेपणाने आपण ज्या महिला क्रीडापटूंचे (सामाजिक भान वगैरे दाखवण्याच्या मिषाने!) फुटकळ शब्दांत कौतुक करतो, त्या प्रत्येक उपलब्धीमागे कित्येक वर्षांची तपश्चर्या, त्याग आणि अपयशांची मालिका दडलेली असते. महिला हॉकी संघ, क्रिकेट संघ किंवा बुद्धिबळ संघ अचानक उभे राहिलेले नाहीत. स्वयंस्फूर्ती हा त्यामागील प्रथमस्रोत. ईशान्येकडील राज्यांमध्ये मेरीकोम, मीराबाई किंवा लवलिना अशा कित्येकजणी कुटुंब, समाज, व्यवस्था अशा विविध स्तरांतील प्रवाहाविरोधात पोहून पुढे येतात. एखादी विनेश फोगट किंवा मनिका बात्रा तरीही प्रस्थापित व्यवस्थेशी टक्कर घेत खेळात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करते. या सर्वजणी भारताचे सामर्थ्य आहेत. येत्या आठवडय़ात स्त्रीशक्तीला पूजनीय मानणारा नवरात्रोत्सव सुरू होतोय. त्या उत्सवाइतकेच प्रेम आणि भक्ती ‘या’ तेजस्विनींवरही दाखवली जावी. कारण मदत आणि अपेक्षांविनाही या सगळ्याजणी आपल्याला भरभरून देताहेत, देणार आहेत.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा