Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

काव्यपुष्प

 


   काव्यपुष्प

---------------------------------

 उत्सव नवरात्रीचा

सुख शांती वैभवासाठी, 
घेतला ठाव मनीचा
उदो उदो भवानीचा, 
आला उत्सव नवरात्रीचा ||ध्रु||

सिंहासनावर आरूढ होऊनी, 
दिधला दृष्टांत भक्तांना 
तलवार रुपी भेट देऊनी, 
कृतकृत्य केले राजांना
आदिमाया आदिशक्ती, 
भुज शृंगार वर्तनाचा ||१||

महिषासुराचा वध करुनी, 
केले उपकार जगतावर 
वर्षातुन तीन वेळेस असते, 
निद्रा स्थान पलंगावर
महिषासुरमर्दिनी म्हणुनी, 
होतो उल्लेख नावाचा ||२||

काकड शेज आरती समयी, 
वाजतो मृदंग टाळ
शिवरायांनी अर्पिलेली, 
आईला अलंकारात माळ
विजयादशमीला होतो, 
जल्लोष सीमोल्लंघनाचा ||३||

गीतकार : नयन धारणकर, नाशिक
------------------------------------------

शीर्षक:- भूक

वेचूनी कागद कचरा
गावातला सारा
पोटाला भूक ती मोठी
आम्हां पोरांना तेव्हा मिळे रोटी

हट्ट नाही,हौस नाही
खेळणे आम्हां माहीत नाही
सपने आमची छोटी
फक्त पोटाला मिळो रोटी

इवुले इवुले आमचे हात
भूकेसाठी पसरतात
मागत नसतो भीक
ती असती आमची भूक
भावना असता मूक
त्यात आम्हां लेकरांची काय चूक

अंगावर कपडा नाही
राहायला छप्पर नाही
तरी गुजारा होतो
पण पोटात नसला दाणा
पाहून त्या फेकलेल्या तुकड्या कडे
जीव मात्र तिळतळ तुटतो

रोज असते पुढ्यात प्रश्न भूकेचा
दोन घास मिळेल की नाही
भूक आमची शमेल की नाही
रोज असतो हा फेरा "जगण्या-मरण्याचा"

उठतात लाखोंनी पंगती
भूक नसूनसुद्धा खातात
अन्न जाते वाया
आणि एकीकडे 
भुकेने जीव मरतात 
भुकेने जीव मरतात


 विनोद नंदू इखणकर
 नाशिक (शब्दप्रेम)
  ७३५०९७०२०१
--------------------------------

शीर्षक :- "माझी लेक"

जीव लावते सर्वांना
माया असते लेकीला
तिचा वावर घरा-दारात
आई समान वाटे बापाला

किती गुणगान गाऊ
लेक माझी लाडाची
म्हणतात सारे मला
पेटी असते धनाची

तळ हाताच्या फोडासम
जपले मी तिला
फुला सारखं वाढविले
माझ्या लाडाच्या लेकीला

लेक माझी वंशाचा दिवा
माझ्या साठी तीच मुलगा
मुलगा वा मुलगी एकच
हाच मंत्र ठेवून वागा

बाप करितो कन्यादान
लाडाची लेक ,जाते सासरी
बापाचे काळीज आहेस तू 
तशीच नांद सासरी

देवाला एकच मागेन
सुखी ठेव माझ्या लेकीला
होवो इच्छा पूर्ण तिच्या
सुखाचे क्षण येवो भेटीला

 विनोद नंदू इखणकर
   (शब्दप्रेम) नाशिक
  ७३५०९७०२०१
---------------------------------------

   शीर्षक :- “बाप...”

माय पुसता - पुसता
बाप कधी पुसताच आला नाही मले
कष्टाचा गाडा एकट्यानेच ओढला
एक चाक होताच आलं नाही मले

आते बापावर लिहीन म्हणतो
बाप समद्यासनी सांगीन म्हणतो
मह्या नावा संगे त्याचे नावं
त्याच्यास नावाले चकाकी देईन म्हणतो

व्हता अडाणी त्यो
मले लिहिता वाचता केला
रक्ताचे केले पाणी त्यानं
मले स्वतःच्या पायावर उभा केला

घामात सारा भिजून जायचा
उसवलेला सदरा शिवून घाले
कबाड - कष्टाच्या जगात त्याच्या
आम्हावाली जिंदगानी सुखात चाले

काय सांगू तुम्हांसनी?
मह्या बाप काय हाये?
त्यो म्हणूनसंग म्या हाये
मह्या “बाप” मह्या “देव” हाये


   विनोद नंदू इखणकर
   (शब्दप्रेम)नाशिक
      ९१ ७३५०९७०२०१
--------------------------------------------

      आजची चारोळी

  वंशाच्या दिव्यापेक्षाही वाटते
  चिमुकली माझी भारी
  तिच्या सोनपावलांनी
  सुख आले माझ्या दारी.

  सौ. हेमा जाधव, सातारा

--------------------------------------------
अहंकार आणि संस्कार
  या दोन्हीत असतं महदंतर
अहंकार झुकायला लावतो
 स्वत:लाच झुकवितो संस्कार

सुनिता सुरेश महाबळ

-------------------------------------------
 
पर्यावरण
जागर करण्यास
मनीचा ध्यास

प्रदूषणाचा 
विळखा हा सर्वत्र
कार्य पवित्र

पशुपक्ष्यांना
आधार जंगलांचा
प्रश्न जिवांचा

सौ उषा राऊत
------------------------

न्याय दान करताना 
खोट्या चा प्रतिकार होई 
आरोपाचे खंडन करून
सत्य समोर आणले जाई

सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )
पुणे.
----------------------------------------
 आईचा गोंधळ 

अंधार दाटला वैराग्याचा
भवानी आई, गोंधळाला ये 
जोगवा मांडतो कोल्हापूरा
अंबाबाई, जागरणाला ये || ध्रु || 

संबळ वाजवीत हे अंबे
दास तुझ्या चरणासी आले 
मुख दर्शनी बघताक्षणी
आमचे अंतर्मन भावले
पदर पसरतो ओटीला 
चंडिके पुन्हा अवतार घे ||१|| 

अस्तित्वासाठी झटणाऱ्या
आई या मुलींस वाचव 
सांभाळ करत लेकरांचा 
दुष्कृत्यांचा स्वैर थांबव
हात जोडीतो सद्भवाने
जगदंबे क्रमवचन घे ||2|| 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे
पाहवत ही नाही हाल 
शेतीच्या संरक्षणापोटी
पाठराखीण झाली बेहाल
उत्तम कार्यात टिकण्यास 
हाती चामुंडे आत्मबळ दे ||३|| 

गीतकार : नयन धारणकर, नाशिक
-------------------------------------------------
मंजुघोषा
गालगागा×४

हस्तरेषा दाखवू मी का कुणाला
कष्ट घेते अन् घडवते मी स्वत:ला

प्रश्न केले बोचणारे काल ज्यांनी
उत्तरे मी द्यायची त्यांना कशाला 

हा कसा बाजार आहे थाटलेला 
चेहरा पाहून आहे भाव झाला 

रूप मायावी मृगाचे घेत आला
मोह झाला जानकीचा रावणाला  

लाभले यश जे हवे ते लेकराला
कोणती पुण्ये अशी आली फळाला 

संथ होती चाल स्पर्धेतील त्याची 
जिंकणे जमले तरीही  कासवाला

जन्मभर या वेदनेचा अंत नाही
सांगते मी वाहणाऱ्या आसवाला

रेखा कुलकर्णी
चिंचवड पुणे
---------------------------------

 शारदेस

 देवी     शारदे........
 नमितो आम्ही तुझीया पायी
 कृपा करी माते......
  देवी शारदे......१
अजाण आम्ही तुझ्या कन्यका
 तव करूणेची मिळू दे छाया
तुफानातूनी जीवननौका 
 नेई पैल तटाते.......
    देवी शारदे......
 निर्मळ आमुचे बनू दे जीवन
मनी घुमू दे विणा गुंजन
 जगी उद्धरण्या कुलशीलाते
 मनी मांगल्य् भरू दे.....
    देवी शारदे..........

  शैलजा  जाधव
----------------------------------
           
       आदिशक्तीचा गोंधळ

        आदिशक्ती रुप तेज्योमय
        दुर्गामाता देवी शक्तीवानं
        महिषासुर राक्षसाचा वध
  ‌       त्या मातेचं पुजूया चरण.....।।१।।

         नवरात्रीला करूया जागर
         आदिशक्तीचा गोंधळ मांडूनं
         देवांचा हि जमला हो मेळा
          करू आईचं हो जागरणं......।।२।।

  ‌‌‌      महिमा महिषासुरमर्दिनीचा
        मांडीला गोंधळं हो भक्तानं
        दे शक्ती तू आई भावानी
        भक्तांच्या हाकेला ये धावूनं......।।३।।

         दैत्यावरती करूनीया मात
         संकट केले दुर आदिमातेनं
         अष्टभुजाची  देवी अवतारी
         विष्णू भगवानांचे वरदानं......।।४

         महिषासुरमर्दिनी आदिशक्ती
         दुर्गा,अंबा,आई भवानी ठाणं
        रणचंडी ,दैत्या़ंचा कर्दनकाळ
    ‌     घालू गोंधळ देवीच्या नावानं.....।।५।।

          कवी सरकार इंगळी ता हातकणंगले
      
           

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment