काव्यपुष्प
--------------------
युवा सुधरवू..…
दुःख नाही ऐसा । कोण जन्मलेला? ।
कोण रडलेला । नाही जगी? ।।
हसणे, रडणे । आहे चालणार ।
कर्म भोगणार । सारे इथे ।।
इथे आहे स्वर्ग । नरक इथेच ।
लागणार ठेच । असुरांना ।।
प्रयत्ने करता । फळ मिळणार ।
नाहीसे होणार । पुढे दुःख ।।
सीमा ओलांडून । वागायचे नाही ।
छळायचे नाही । गरीबांना ।।
पेरू नका काटे । कोणाच्या वाटेत ।
सदा देत, घेत । प्रेम रहा ।।
उद्याचा दिवस । येत नाही आज ।
नका करू माज । श्रीमंतीचा ।।
शक्य आहे इथे । रंक होणे राव ।
संपत्तीचा हाव । बिनकामी ।।
शोधायचे तर । शोधावे आनंद ।
हेचि बरे छंद । जोपासण्या ।।
नाहीच आपले । हक्क ज्यांच्यावर ।
जोडू नका कर । त्यांना कधी ।।
माणूस बनून । माणूस घडवू ।
युवा सुधरवू । अजु म्हणे ।।
शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
----------------------------
भाषा प्रेमाची
रात्री अंधाऱ्या काळोखी
तुझी आठवण झाली
ओल्या मायेच्या स्पर्शाने
भाषा प्रेमाची कळली
आनंदाच्या आसवांनी
प्रीत तुझी झंकारली
तुझ्या माझ्या विरहाने
भाषा प्रेमाची कळली
जीवनाच्या मार्गावर
तुझी सोबत मिळाली
दृढ तुझ्या विश्वासाने
भाषा प्रेमाची कळली
भिजलेल्या नयनांनी
हाक जोरात मारली
तुझ्या मुक्या पावलांनी
भाषा प्रेमाची कळली
माझ्या वेड्या आसक्तीने
इच्छा तुझी विखुरली
तुझ्या मुक्त भावनेने
भाषा प्रेमाची कळली
तुझ्या अबोल प्रेमाने
रात्र काळोखी सरली
स्थिर तुझ्या स्वभावाने
भाषा प्रेमाची कळली
तुझ्या फक्त नसण्याने
माझी स्पंदने वाढली
तुझ्या या सहवासाने
भाषा प्रेमाची कळली
प्रेम उंबरठ्यावर
स्वप्ने सत्यात जागली
तुझ्या सहकार्यामुळे
भाषा प्रेमाची कळली
- नयन धारणकर
--------------------------------------
आजची चारोळी
हो, नाही करत करत
एखदाच्या सुरु झाल्या शाळा
सरस्वतीच्या प्रांगणात
भरला आनंदमेळा
सौ. हेमा जाधव, सातारा
-----------------------------------
आदतों में होती
आज तुम होते तो बात कुछ और होती।
तुम ख़ुदसे ज़्यादा मेरी आँखों में होती।
मेरी कविता में तेरा नाम होता काग़ज़
पर तेरी खुश्बुओं की धीमी बारिशें होती।
बे-वक़्त ख़यालो में तेरा आना जाना
रहता क़दम क़दम पर तेरी आहटे होती।
इन लबों पर तेरे नाम की धून सवार
होती दिनतो क्या रातभी ख़ुशनुमा होती।
ख़ुदा को ये बात मंजूर होती तो आज
तुम मेरी आदतों में भी शामिल होती।
नीक राजपूत
9898693535
-------------------------
ओला दुष्काळ
किती दिवस चालेल
देवा तुझी रे करणी
पाया पडतो करतो
तुझी कान उघाडणी
स्थिती बघता बाहेर
आलो दारी न राहून
बहरल्या शेतीची रे
गेली ना पिके वाहून
बिथरला मायबाप
बघ चिंताग्रस्त झाला
पडणाऱ्या पावसाचा
सारा कोंडमारा झाला
तोंड देऊ कसा सांग
माझा राजा उत्तरला
निराशेच्या अवस्थेत
टाहो जोराने फोडला
खूप आक्रोश करत
एक हुंदका फुटला
रूसवेला रडवेला
बाप मनाने खचला
झाली यातना मनाची
भोगायची किती काळ
चाललेला असा ओला
सोसवेना हा दुष्काळ
- नयन धारणकर
---------------------------
" पितृ देवो भव "
पितृ देवो भव
हा भाव जपावा
कृतज्ञतेचा हा
द्यायचा पुरावा
आपले जीवन
घडविण्यासाठी
केली असे त्यांनी
नित्य आटाआटी
आई वाढविते
करि खूप प्रेम
बाप घडवतो
कुटुंबाचे क्षेम
प्रसंगी कठोर
वडिल होतात
म्हणून बाळाला
संस्कार देतात
शिल्पकार असे
पिता जीवनाचा
वार्धक्यात त्यांना
आधार द्यायचा
पितृ देवो भव
फक्त घोकू नका
त्यांना यथोचित
मान द्या बरं का!
सुनिता सुरेश महाबळ
बालेवाडी , पुणे
--------------------------------------
नवरात्री
नऊ रंग नऊ रूपे,
उत्सव नवरात्रींचा.
घटस्थापना देवीची,
रास दांडिया नृत्याचा.
सुवासिनीच्या ओटीचा,
नवरात्रीला मोठा मान.
करुनी वंदन मातेला,
सौभाग्याच घेती वरदान.
गावो गावी देवी भवानीचा,
उत्सव असतो मोठा.
भक्तांच्या भक्ती भावाला,
आनंदा नसे जराही तोटा.
आश्विन शुद्ध प्रतिपदेला,
थाटात होते आगमन.
व्याघ्र मयुरावर आरूढ माता,
राक्षस दुष्टांचे करी हनन.
जशी माहूरची रेणुकामाता,
तशी सप्तशृंगी नाशिकची
कोल्हापूर ची अंबाबाई अन्
आई भवानी तुळजापूरची
उदो उदो वाचे बोला,
आंबा बाई माऊलीचा.
भक्ती भावे पुजिती तवं,
जागर करिती आईचा.
अनेक नाना रूपे तुझी,
जणू गौरव स्त्री शक्तीचा .
देऊनी मान स्त्री जातीला
जागर करू तव भक्तीचा
योगेश गजानन शेट्ये..
-------------------------------------
एक motivational कविता :
Busy Busy काय करता
वेळ काढा थोडा
आयुष्यभर चालूच असतो
संसाराचा गाडा
खूप काम, रजा नाही
मिटिंग, टार्गेट,फाईल
अरे वेड्या यातच तुझं
आयुष्य संपून जाईल
नम्रपणे म्हण साहेबांना
दोन दिस रजेवर जातो
फॉरेन टूर राहिला निदान
जवळ फिरून येतो
आज पर्यंत ऑफिससाठी
किती किती राबलास
खरं सांग कधी तरी तू
मनाप्रमाणे जगलास ?
मस्त पैकी पाऊस झालाय
धबधबे झालेत सुरू
हिरव्यागार जंगला मध्ये
दोस्ता सोबत फिरू
बायकोलाही म्हण थोडं
चल येऊ फिरून
पुन्हा होऊ तरुण
पंजाबी घाल, प्लाझो घाल
लाऊ द्या लाल लिपस्टिक
बायकोला शब्द द्यावा
करणार नाही किटकीट
पोळ्या झाल्या की भाकरी
अन भाकरी झाली की भाजी
स्वयंपाक करता करताच
बायको होईल आजी
गुडघे लागतील दुखायला
तडकून जातील वाट्या
दोघांच्याही हातात येतील
म्हातारपणाच्या काठ्या
जोरजोरात बोलावं लागेल
होशील ठार बहिरा
मसणात गवऱ्या गेल्यावर
आणतो का तिला गजरा ?
तोंडात कवळी बसवल्यावर
कणीस खाता येईल का ?
चालतांना दम लागल्यावर
डोंगर चढता येईल का ?
अरे बाबा जागा हो
टाक दोन दिवस रजा
हसीमजाक करत करत
मस्तपैकी जगा
दाल-बाटी,भेळपुरी
आईस्क्रीम सुद्धा खा
आरोग्य उत्तम राहण्यासाठी
शहरा बाहेर फिरायला जा
Busy Busy काय करता
वेळ काढा थोडा
आयुष्यभर चालूच असतो
संसाराचा गाडा....
आयुष्यभर चालूच असतो
संसाराचा गाडा....
वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ,
We are 40+
सो व्हॉट???
अब्दुल कलाम सांगून गेले,
'स्वप्न पहा मोठी'..
स्वप्ननगरीत जागा ठेवा
माधुरी दीक्षित साठी..!
सकाळी जॉगिंगला जाताना
पी टी उषा मनात ठेवा,
वय विसरून बॅडमिंटन खेळा,
'सिंधूलाही' वाटेल हेवा..!
मनोमनी 'सचिन' होऊन ,
ठोकावा एक षटकार ,
घ्यावी एखादी सुंदर तान,
काळजात रुतावी कट्यार..!
मन कधीही थकत नसते,
थकते ते केवळ शरीर असते,
मनात फुलवा बाग बगीचा,
मनाला वयाचे बंधन नसते...!
फेस उसळू द्या चैतन्याचा,
फुलपात्र भरू द्या काठोकाठ,
द्या बंधन झुगारून वयाचे,
वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ...!
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा