संस्कारक्षम पुस्तक 'माझा अभिमन्यू'
मुलांना वाढवताना पालकांचीच कसोटी लागते. पूर्वी मुलांवर घरातूनच संस्कार व्हायचे, पण आता मुलांवर टीव्ही मोबाईल इत्यादींचाही परिणाम होत आहे. मुलांवर बाह्य माध्यमांचा पगडा पडत आहे. त्यातून मुलांची सुटका कशी करायची? हा आजच्या पालकां समोरील गहन प्रश्न आहे. 'माझा अभिमन्यू ' या पुस्तकातून पालकांनी मूल वाढवताना होणाऱ्या द्विधा मन:स्थितीतून बाहेर कसे पडावे, याचे मार्गदर्शन लेखिकेने केले आहे. या पुस्तकाच्या लेखिका सौ. अश्विनी बिहाणी या आहेत. पुस्तकात एकूण ४४ प्रकरणे आहेत. प्रकरणे छोटी असून त्यातून मुलांवर संस्कार करताना कोणती काळजी घ्यायची हे सांगितले आहे. 'नको आग्रह विशिष्ट भाषेचाच', ' कशाला हवी ट्यूशनची बेडी' , ' घर आहे की रोबो बनवणारा कारखाना ' , या छोट्या डॉनच काय करू? ', ' अशी ओळखा मुलांची विचारशैली ', ' नाहीला नाही म्हणा ' , असेल मनमोकळा संवाद, मग का होईल वाद', ' 'सवय नकार ऐकण्याची', 'किंमत पैशाची आणि त्यामागच्या कष्टांची', 'रस्ता जीवनाचा चढउतारानी भरलेला' ही प्रकरणे उल्लेखनीय वाटतात. मुलांना वाढवताना पालकांचा होणारा गोंधळ दूर करण्याचे काम हे पुस्तक निश्चितच करेल. तसेच मुलांवर होणारे नैतिक दुष्परिणाम टाळण्यासाठी मदत होईल. पुस्तकाचे नाव : माझा अभिमन्यू .लेखिका : सौ. अश्विनी बिहानी. प्रकाशक : गीता परिवार, पुणे. पृष्ठे : १८३. मूल्य : रू.१००/-. रवींद्र जांभळे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा