शब्द लहरी
आज छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्मले तर
गेल्या साडे तीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास बघितला तर राजांच्या प्रत्येक चपखल युद्धानितीचे दर्शन आपल्याला होते. राजांचे शौर्य, राजांचा कर्तबगार, खंबीरपणा आपल्याला जीवनाशी संघर्ष करण्यास उत्स्फूर्त करतो. राजांच्या शौर्याकडे बघून आपल्याही नसानसात युक्तिवादी, तसेच शक्तिवर्धक उर्मी संचारते.
आज जगात चाललेल्या घडामोडींमुळे, राज्यात चाललेल्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष घटनांमुळे तुम्हाला असे वाटते ना स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्यात पाहिजे होते. त्यांचा आदर्श आज जरी आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे उभा आहे तरी त्यांच्यासारखे नेतृत्व आपण नाही गाजवू शकत. किंवा ते पूर्वीचे स्वराज्य आज पुन्हा नाही उभे राहू शकत. म्हणूनच तुमच्या मताशी मी सहमत आहे की आज राजे आपल्यात पाहिजे होते. त्यांच्या पावलांचा स्पर्श या मातीला खूप हवाहवासा वाटतो.
राजे यदाकदाचित जर आपल्यात आले ना राज्यात चालणारे जनतेचे हाल, स्त्रियांवरील अत्याचार, मुलींवर वा अल्पवयीन मुलींवर अमानुषपणे केला जाणारा बलात्कार, हत्याकांड या सर्वांना आळा बसेल. पोलिस, आर्मी, राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान या सर्व राजकीय नेते मंडळींची काही आवश्यकता राहणार नाही. महाराज तेव्हा ज्या पद्धतीने न्याय निवाडा करत असत त्याच प्रकारे न्याय निवाडा आजही होईल.
याउलट शेतकऱ्यांना सुद्धा एक दिलासा मिळेल. त्यांची काळजी करणार एक हक्काचं कोणीतरी मिळेल. शेतकऱ्यांची सर्व कर्ज, शेतसारा माफ होईल. शेतकरी लोक नव्या उत्साहात शेतीच्या कामाला लागतील.
परंतू या राज्यात चाललेला जातीयवाद, विटंबना, परस्परविरोधी भांडणे, वादविवाद हे सर्व राजांना मुळीच आवडणार नाही. ज्या पद्धतीने लोक एकमेकांशी वैर धरून गैरव्यवहार करतात ते आमच्या राजांना या पूर्वीही कधी मान्य नव्हते आणि आजही मान्य होणार नाही. त्यांच्या राज्यात सर्वधर्म समभाव, सर्व जाती एकसमान असे नियम लागू असतात. त्यामुळे राजे जरी पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीत अवतरले तरी या सगळ्याला त्यांच्या राज्यात स्थान नसेल.
जो माणूस परकियांचे धोरण स्वीकारून आपल्याच माणसाशी पैशासाठी, संपत्तीसाठी दुश्मनी करतो त्या माणसाला राजांनी कधीही त्यांच्या नजरेसमोरही उभे केले नाही. आणि आज आपण स्वतःच्या स्वार्थासाठी, संपत्तीसाठी, एकमेकांची गच्ची पकडतो. एकमेकांच्या जाती धर्माच्या नावाने बोलावून त्यांचा अहंकार जागा करतो. हे राजांच्या स्वराज्याच्या नियमाबाहेर आहे.
आणि राजांच्या बाबतीत दुसरी गोष्ट सांगायची झाली तर चूक झालेल्या माणसाला नेहमी स्वराज्याच्या नियमाप्रमाणे शिक्षा होत असे. परस्त्रियांवर हात टाकणाऱ्या लोकांचे तर डोळे काढून घेतले जात असत.
ही अशी गुलामशाही पुन्हा एकदा अस्तित्वात आली तर मला वाटते महाराष्ट्र पुन्हा घडेल वारंवार चुका करणारे लोक चूक करणार नाहीत.
पण शिवाजी महाराजांसारखे शूरवीर निष्ठावंत, कीर्तीवंत, धनवंत, गुणवंत, प्रजापती, अश्र्वपती, श्रीमंत युगपुरुष राजा पुन्हा महाराष्ट्राच्या जन्माला येईल असे मला वाटत नाही. परंतु तरी देखील कुठेतरी वाटते की राजे कुठेही गेलेले नाहीत ते आपल्यात आहेत. प्रत्येक माणसाच्या कणाकणात, रगारगात वसले आहेत. त्यामुळेच आपले सर्वांचे मराठी रक्त सळसळत असते. आणि ते कायम सळसळत राहायला पाहिजे. जिथे जिथे आपण आवाज देऊ महाराष्ट्रातील प्रत्येक गड किल्ल्यावर ठिकठिकाणी राजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. जर आपण सर्व खरे शिवभक्त असाल तर ती जाणीव प्रत्येक मराठी माणसाला व्हायलाच हवी.
जर तुम्हाला सर्वांना वाटत असेल राजे पुन्हा आपल्यात यावे तर पहिले स्वतः सुधारा, मग इतरांना सुधरवा. राजांचे गुण आत्मसात करा. स्वतः मध्ये असलेला अहंकार, व्याधी, इतरांविषयी असलेली तुच्छता, आणि आपल्यापेक्षा दुसऱ्याला कमी लेखणे हे सर्व प्रथम बंद करा. अहो साधा भगवा हातात घेण्याची लायकी नाही आपली आणि आपण शिवाजी महाराज पुन्हा जन्मावे म्हणून इच्छा बाळगतो. राजांचे मावळे बघा शरीराने दानशूर, मनाने खंबीर, आणि जीव गेला तरी बेहत्तर पण स्वराज्य हासिल करू ही धमक,हिम्मत त्यांच्यात होती.
आपणही स्वतःला महाराजांचे मर्द मराठी मावळे म्हणतो ना पण महाराष्ट्राचा मावळा बनायला वाघाच काळीज पाहिजे प्रत्येकात जे खऱ्या मावळ्यांमध्ये होत.
दूसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडायला राजमाता जिजाऊंसारखी आई प्रत्येकाला मिळायला हवी. राष्ट्रमाता जिजामातांनी स्वराज्याच्या मातीचे योग्य ते बाळकडू राजांना पाजले नसते तर आज शिवाजी महाराज म्हणून, रयतेचा राजा, महाराष्ट्राचा आदर्श म्हणून उदयास आले नसते.
अहो इथे आजच्या घडीला आई वडिलांना त्यांच्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. प्रत्येक मुलाचे आई वडील काम, जॉब, बिझनेस या सर्व ठिकाणी व्यस्त असतात. त्यांच्याकडे साधा मुलांना गोष्टी संगण्याईतपत सुद्धा वेळ नसतो. तर काय आजचा शिवाजी घडणार ? बर आई वडील आपल्या मुलांसाठीच जीवाचा आटापिटा करून जीवच रान करत असतात हे मात्र खरे आहे. पण आई वडिलांकडे मुलांकडे हवे तेव्हढे लक्ष द्यायला वेळ नाही हेही तितकेच खरे.
म्हणूनच,
राजमाता जिजाऊ सारखी
लाभली महाराजांना आई
खरे सांगतो ऐसा राजा मात्र
पुन्हा कधीही होणे नाही
माफ करा मी आई वडिलांना दोष देत नाही परंतु जे खरे आहे ती वास्तव स्थिती आज आपल्यासमोर मांडत आहे. कृपया सर्व आई वडिलांनी गैरसमज करून घेऊ नये. असो.
होय. राजे आज आपल्यात असते तर खरेच किती आनंद झाला असता नाही. सर्व लोक, जनता, स्त्रिया अभिमानाने ताठ मानेने जगले असते. कोणाचीही हिम्मत झाली नसती नजर मिळवण्याची.
तेव्हा खास आपल्या राजांसाठी एक करा जनतेच्या रक्षणासाठी आपल्या राज्यातील आया बहिणींच्या रक्षणासाठी कायम त्यांच्या मागे देशाचा सैनिक म्हणून उभे रहा, आपापसातील जातीवाद थांबवा, राज्यात एक नवे सर्वधर्म समभाव पाळून एक नवे साम्राज्य उभे करा. भांडण, खून, मारामाऱ्या हे सर्व कृपया टाळण्याचा प्रयत्न करा. याउलट हे सगळे नियम पाळून सर्वांना ताकीद देऊनही विनाकारण आपल्या वाटेत आडवे आलेच तर त्याला आपली मराठ्यांची औकात दाखवून द्या. एक मराठी वार त्यावर कराच. विशेषतः आया बहिणींवर हात टाकणाऱ्यांवर ताबडतोब कठोर कायदेशीर कारवाई करा. कारण आपल्या महाराजांच्या राज्यात चुका करणाऱ्या व्यक्तीला माफी नसते त्याची पहिली चूक हाच अक्षम्य अपराध असतो हेच खरे. हीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र आदरांजली असेल.
लेखक : नयन धारणकर, नाशिक
------------------------------------------------
ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने
देखै उत्पलवनासरिसा पक्षी
फळासि झोंबे जैसा । सांगै नरू केवी
तैसा । पावे वेगा ।।
तो हळूहळू ढाळेढाळे । केउतेनि
एके वेळे । तया मार्गाचेनि। बळे ।
निश्चित ठाकी ।।
तैसे देख पां विहंग ममते ।
अधिष्ठुनि ज्ञानाते । सांख्य सद्य मोक्षाते
आकळिती ।।
जसा पक्षी एका उड्डाणाबरोबर
झाडाचे फळ प्राप्त करून घेता येईल?
सांग बरे .
तो हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या
फांदीवर जाता जाता काही वेळाने त्याच मार्गाच्या आधाराने फळाजवळ
खात्रीने पोहचेल .व तो हे फळ प्राप्त
करून घेईल .
त्याच प्रमाणे पहा सांख्य ज्ञान
मार्गाचा अवलंब करून ते ज्ञानी ,
विहंगम न्यायाने पक्षाच्या गतीने मोक्ष
प्राप्त करून घेतात.
सौ. शैलजा जाधव (पाटील)
चांदवड नासिक
--------------------------------------------
नमस्कार,
पुर्वीच्या काळी समाज पुर्णपणे सुशिक्षित नसला तरी सुशिक्षित असलेले लोकही चालीरिती, परंपरा पाळत असत. असे का, तसे का हे हुशारीने तर्कवितर्क तेव्हा केले जात नसत, आणि त्यामुळे एकमेकांच्या भावना प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या जपल्या जात असत. काही वेळा या प्रथा, परंपरा सांभाळण्याच्या ओघात काही समज गैरसमज ही उत्पन्न होत व कधीकधी या समजांचा अतिरेक ही होत असे. याचेच एक वानगीदाखल उदाहरण आज सामायिक केलेल्या लेखिका- सौ. राधिका माजगावकर पंडित यांच्या 'भाऊबीज' या कथेतून वाचावयास मिळते.
-मेघःशाम सोनवणे.
भाऊबीज-
लेखिका- सौ. राधिका माजगावकर पंडित.
नातं ओठातलं असू दे की
पोटातलं, मनाचे, मानाचे,
मानलेले असू दे की सख्खे. कुठलंही नातं मनापासून जपलं की ते हृदयापर्यंत पोचत नाही
का? अशी सत्य घटना आहे ही.
माझ्या सासू बाईना एक
मानलेला भाऊ होता. अगदी भोळा भाबडा, हळव्या मनाचा.
ह्या पाच बहिणींवर जीवा
पाड प्रेम करणारा. या
मामांच्या व सासू बाईंच्या
आयुष्यातील प्रसंग आहे
हा. खूप जुनी, १९४७ सालची घटना आहे ही.
या भावनाप्रधान पिढीवर
काही जुन्या समजुतींचा
प्रचंड पगडा होता. अर्थात
सद्य परिस्थितीत ती अंध
श्रध्दा वाटण्याची शक्यता
आहे.
असे ऐकिवात आहे की
जोडकावळा दिसणे अशुभ मानतात. अशावेळी ज्यांनी तो पाहिला ती व्यक्ती गेल्याचे पत्र जवळच्या नातेवाईकांनी आपल्या जवळच्या दुसऱ्या नातेवाईकांना पाठवायचे असते. असे केल्यास जोडकावळा
पाहीलेली व्यक्ती दीर्घायुषी होते.
आमच्या सासूबाईंनी जोडकावळा पाहिला. त्यांनी ही बाब सासरे बुवा, आप्पांच्या कानावर घातली. ते तलाठी म्हणून काम करत. निरोप मिळाला त्या वेळी पोस्टमन कचेरीत आलेला होता. सासरे बुवांनी पटकन त्यांचेकडून पोस्टकार्ड घेऊन त्यावर अर्धं
पत्र खरडून तत्काळ आपल्या मेव्हण्यास धाडले. कार्य पूर्तीचा नि:श्वास सोडून कचेरीतील
पुढील काम हाती घेतलं...
मामा तसे जवळच्या गावात काही कोसावर रहात होते. पोस्ट सेवा ही तत्पर होती. लगेच ते कार्ड मामांच्या हातात पडले.
पत्र वाचल्यावर त्यांचे अवसान गळाले. त्यांनी बसकण मारून हंबरडा फोडला, "अरे.. रे
देवा, माझी बहीण अंबी गेली रे.... भाउबिज जवळ आली आहे, आता मला कोण ओवाळेल."
त्या काळात मेव्हण्यांना भावजी म्हणत असत. अंबि गेल्याने 'त्यांचे कसे होईल. मुलांचे केवढे हाल होतील. अगदी भरल्या संसारातून तू कशी काय गेलीस.' मामा बोलत होते.
त्यांना शोक काही केल्या आवरत नव्हता.
मामी आजारी होत्या मात्र
धीटपणं त्यांनी स्वतःला व मामांना देखील सावरलं. मामांना त्या म्हणाल्या, "तुम्हाला लगेच
निघायला हवं. आंबि वन्स सवाष्णी गेल्या आहेत. बाकी सगळ्या जणी लांब आहेत. तुम्ही आता दू:ख आवरून निघा. जाताना बाजारातून वन्स साठी हिरवी साडी, बांगड्या, गळसरी, जोडवी आदी सवाष्णीची लेणी
घ्या."
जड मनाने मामांनी मामीने सांगितलेलं सर्व साहित्य घेतलं आणि हिरवीगार साडी घेऊन, त्यावर खणा नारळाची ओटी घेऊन मामा निघाले....
एरव्ही भाऊबीज व राखी
पौर्णिमासाठी अम्बीताई साठी साडी घ्यायचे मामा, पण आजची साडी वेगळ्या कारणासाठी घेतली होती. मामांचे डोळे
भरून आले. अशी अगदी
अचानक कशी गेली माझी बहिण मला सोडून.
धावपळ करत मामा बस स्थानकावर गेले, मात्र बस
चुकली होती. इतर वाहनांची सोय नव्हती. मामांनी पायी जायचं ठरवलं. बहिणीच्या गावाच्या दिशेने ते चालू लागले.
अखेर गावात पोचले. वाड्याचा दिंडी दरवाजा जवळ आला. तिथे तर कमालीची शांतता होती. पिशवी सावरत आत शिरत असता मामा थरथरत होते. सर्वांगाला घाम फुटला होता. धोतराच्या सोग्याने ते भरून येणारे डोळे पुसत होते.
'अरे, एवढी नीरव शांतता
कसली ? तिला नेलं तर नाही? दार लोटलेलं कसं?' असे अनेक प्रश्न मनात निर्माण होत असतांना त्यांनी दाराची कडी वाजवली.
दार भावजींनी उघडले अन् अचंबित होऊन म्हणाले, "अरे हे
काय मामा, तुम्ही आता इथे कसे? सर्व काही ठीक आहे ना?"
मामा चकित झाले. हा काय गोंधळ आहे ते मामांना कळेना. आपली अंबा गेल्याचे पत्र तर भावजींनी लिहिले होते. येथे तर अशुभ घटनेचा मागमूसही दिसत नाही.
खुर्चीवर बसतांना मामांनी शारिरीक तसेच मानसिक श्रमाने आपले डोळे मिटून घेतले. काय प्रकार आहे हा? त्यांना तर भोवळ आली. हातात आलेला पाण्याचा ग्लास घटाघटा पिऊन रिकामा केला.
डोळे उघडुन पाहतात तर.... तर समोर चक्क त्यांची बहीण उभी होती व विचारत होती, "बरं वाटतं ना दादा."
मामा तिच्याकडे बघतच राहिले. समोर दिसत आहे ते सत्य की स्वप्न. प्रसंग तसा घडला होता. अहो जिच्या मृत्यूची बातमी कळली होती, जिच्या वियोगाने ते कसाविस झाले होते, तिच्या अखेरच्या दर्शनासाठी चालत शिरपुरला आले होते, ती बहिण जिवंत असून त्यांना पाण्याचा पेला देत होती.
आता मात्र त्यांना भावनांचा वेग आवरेना. ते ताडकन उठले. बहिणीस जवळ घेतले व तिच्या डोक्यावर आनंदाश्रुंचा अभिषेक केला त्यांनी. 'देवा, माझी बहिण जिवंत आहे, सुरक्षित आहे.' सगळं वातावरण निमिषार्धात बदलून गेलं होतं. आकाश अगदी मोकळं झालं होतं. मनात व घरात आनंद बरसत होता.
बहिणीच्या डोक्यावर हात ठेवून मामा म्हणाले, "पोरी, एवढं सारं काही माझ्या मनासारखं केलंस, आता आणखी एक कर, ओटी बरोबर आणलेले हे लुगडे नेस. सवाष्णीची लेणी लेवून मला औक्षण कर. दिवाळी तोंडावर आली आहे, गावाकडे खूप कामे पडली आहेत म्हणून आता भाऊबिजेला नाही येऊ शकणार मी बाळा. आणि आता पूर्वीसारखी येण्याजाण्याची ताकद ही राहिली नाही. आपण आताच दिवाळी साजरी करू या. नाहीतरी तुला सुखरूप पाहिल्यावर ही तर दिवाळीच आहे आपली. चल पटकन लाग भाऊ बीजेच्या तयारीला."
सासू बाईंचे डोळे भरून आले. बहिण भावांचे मानलेले आगळेवेगळे नाते पाहून माझे सासरे गहिवरले. अशा प्रकारे मानलेल्या बहिण भावांची दिवाळी खऱ्या दिवाळी पूर्वी अनोख्या रीतीने साजरी झाली. तबकात निरांजन तेवत होते, हिरवेगार लुगडे नेसलेल्या, तसेच सवाष्णी चे लेणे ल्यालेल्या सासू बाईंचा चेहरा नीरांजनाच्या मंद प्रकाशात झळकत होता व मामांच्या डोळ्यातील आनंदाश्रू समई च्या प्रकाशात चमकत होते.
संकटाच्या ओझ्याखाली घरात आलेला मामा भाऊ बीज साजरी करून त्याच्या गावी, सुखा समाधानाने घराकडे निघाला. त्याच्या पाठमोऱ्या रुपाकड पहात असता सासूबाईंच्या मनात विचार आले, "देवा या माझ्या बंधूरायाला उदंड आयुष्य व निरामय आरोग्य लाभू दे, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे....."
तर झपाझप पावले टाकत आपल्या गावी जाणारे मामा म्हणत होते ,"देवा माझे आयुष्य अंबिला लाभू दे."
असे होते हे बहिण भावंडांचे पवित्र, सात्विक, निर्मल प्रेम आणि अशी होती ही काळजाला हात घालणारी भाऊ बीज. आज ते दोघेही हयात नाहीत. मात्र युगानयुगे चालत आलेली भाऊबीज, बहिण भावांची ओढ, प्रेम, माया अमर आहे. बहिण भावांचं हे नातं जागरूक राहावे अशी देवाजवळ प्रार्थना...
सौ. राधिका माजगावकर पंडित.
सन सॅटेलाईट, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे.
मो. 8451027554.
---------------------------------------
निसर्ग
पृथ्वीतलावावर जीवन शक्य आहे याचे मुख्य कारण म्हणजे निसर्ग. कारण पृथ्वी हा संपूर्ण विश्वातील एकमेव ग्रह आहे जिथे झाडे आणि वनस्पती आहेत. आपण झाडांना देवाचेच रूप मानले पाहिजे, त्यांच्यामुळेच येथे सर्व जीवांचे जीवन शक्य झाले आहे.झाडांना आपण हिरवे सोने देखील म्हणतात, कारण संपूर्ण पृथ्वीवरील इतर कोणत्याही गोष्टींशी झाडांची तुलना केली जाऊ शकत नाही, झाडे आपल्याला अतिशय मौल्यवान गोष्टी प्रदान करतात. झाडांपासून आपल्याला श्वास घेण्यासाठी प्राणवायू ऑक्सिजन प्राप्त होतो. याशिवाय हिरव्या भाज्या, फळे इत्यादी जीवनावश्यक गोष्टी आपल्याला झाडांपासूनच मिळतात. निसर्गाने केलेल्या या परोपकाराची आपल्याला कधीच परतफेड करता येणार नाही.
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
-------------------------------
अनुभव म्हणजे नेमके काय
रोजच येतील पणं त्याचे काय जे अनुभव घेऊनही आपण परत त्याच चुका न सुधारणे आणि सुधारणा करायचीच असेल तर ती पणं वरच्या पायरी वर पोहचविणारी हवी नाहीतर जेव्हा परीक्षेची वेळ येते तेव्हा जर आपण म्हंटले की मला अभ्यास न करता पास व्हायचं आहे किंवा अभ्यास करूनही आपण जर उत्तरे चुकीचेच लिहिले तर कुठलाच अधिकारी आपल्याला पद , प्रतिष्ठा , मान सन्मानाने पास करणार नाही पण त्यातूनही आपले अक्षर जर स्वच्छ आणि सुटसुटीत असेल तर कदाचित त्यावर ते थोडे मार्क वाढवून देवू शकतात पणं अश्या रोजचा कितीही अभ्यास केला परीक्षा दिल्या आणि उत्तर चुकीचेच लिहिले तर कसं शक्य आहे पास होणं यालाच तर म्हणतात PHD
देवयानीचे दिव्यज्ञान
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा