शब्द लहरी
------------------------------------------------------
ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने
हां गा कामधेनूचे दुभते | दैव जाहले जरी आपैते | तरी कामने ची का तेथे ।वानी की जे? ||
जरी चिंतामणी हाता चढे |तरी वांछेचे कवन साकडे | का आपुले नि सुरवाडे | इच्छा वे ना ?।।
देखा अमृत सिंधूते ठाकावे | मग ताहानाची जरी फुटावे | तरी सायासु का करावे | मागील ते ?।।
असे पहा की दैवयोगाने कामधेनु चे दुभते जर प्राप्त झाले तर तेथे इच्छित वस्तू मागण्यास कमी का करावे ||
किंवा चिंतामणी हाती आला तर मग इच्छित वस्तू मागण्याचे संकट का पडावे ? आपल्याला अपेक्षित ते का मागू नये हवे ते इच्छु नये काय ?
असे पहा कि अमृत सिंधूचे काठी येऊन अमृत न पिता जर तहानेने तडफडावे तर मग अमृत सिंधू जवळ येण्याचे मागील श्रम तरी का करावे?
सौ. शैलजा चंद्रकांत जाधव
चांदवड
-------------------------------------------
ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने
हे मार्गु तरी दोनी | परी एक वरती निदानी | जैसी सिद्ध साध्य भोजनी | तृप्ती एक ||
का पूर्वापार सरिता | भिन्न दिसती पाहता | मग सिंधू मिळणी ऐक्यता |पावती शेखी ||
तैसी दोनीही मते | सूचीति एका कारनाते | परी उपस्ति ते योग्यते | आधीन असे ||
तयार असलेल्या किंवा तयार करावयाच्या अशा दोन्ही अन्नाच्या भोजना पासून जशी सारखीच तृप्ती होते तसे हे दोन्ही मार्ग (ज्ञानयोग व कर्मयोग) दोन तर आहेत पण ते परिणामी एकच ठिकाणी आत्मस्वरूपीच मिळतात .||
किंवा जशा पूर्व पश्चिम दिशांकडे वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वहाते वेळी भिन्न दिसतात परंतु समुद्रात मिळण्याचे वेळी त्या एक समुद्ररूपच होतात. ||
तशी ही दोन्ही मते (सांख्य व बुद्धियोग) एकाच साध्याची सूचक आहेत परंतु त्यांचे उपासनानुष्ठान मात्र उपासकाच्या योग्यते वर अवलंबून आहे. ||
सौ शैलजा जाधव पाटील.
चांदवड, नाशिक
---------------------------------------
विचारधारा
आपलं मन कुणापुढे तरी मोकळं करावं. व दोन शब्द आपुलकीने बोलावं हे,सर्वांनाचं वाटत असतं पण, ते,नेमकं कुणापुढे? मोकळे मन करावे व, कुणापुढे करू नये. याचा सुद्धा, आपल्याला विचार करायला पाहिजे. कारण, काही लोक मनमोकळ्या स्वभावाचा फायदा घेतात तर...कुणी, त्या,स्वभावाशी कायमचं जूळून राहतात.
सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
------------------------------------------------
महिला सुरक्षा एक समस्या
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य संपून सुमारे साडे तीनशे वर्षाचा काळ लोटला, आणि भारताला स्वातंत्र्य मिळून आजच्या दिवशी पंचाहत्तर वर्षे उलटली तरी...तरीही आजच्या काळात स्त्री सुरक्षित नाही ही मोठी खेदाची बाब आहे.
छत्रपती शिवाजी महाराज असताना त्यांच्या कठोर निर्णायक धोरणामुळे स्त्री सुरक्षित राहिली त्यांच्या कडक कायद्यामुळे, कोणी तोंड दाखवायची हिंमत केली नाही ती त्यांच्या कार्यप्रणालीमुळे. परंतु आज तेच चित्र पुन्हा ठिकठिकाणी बघावयास मिळत आहे. महिला सुरक्षा समस्या अजूनही संपलेली नाही. दर आठवड्याला एक तरी बलात्कार, अत्याचाराची बातमी ऐकू येत असते अथवा वाचावयास मिळत असते.
किती दिवस जगावे असे या भारत देशातील आया बहिणींनी?.......
अहो, साधी एक मुलगी एकटी रस्त्याने चालताना दिसली की पार तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले जातात, कोणती मुलगी ओळखीची पाळखीची नसली तरी हे नराधम लग्नाची मागणी घालत त्यांच्या मागे लचांड लावत फिरतात. हे तर सोडाच या नराधमांनी साधं चिमुकल्या मुलींना ही नाही सोडलं. आता मागे बातमी वाचली सांगलीत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार, अहो, त्या पाच वर्षाच्या मुलीला काय कळतं हो आपण म्हणतो या अशा सर्व घटनांना मुलीही जबाबदार आहेत. त्यांची अंगवस्त्रे व्यवस्थित नसतात, म्हणून अशा मुलींवर नराधमांची वाईट नजर पडते पण या सगळ्यात पाच दहा वर्षाच्या मुलींचा काय दोष हो ज्या मुलीला आपण स्वतः मुलगी आहोत हेच माहित नसत अशा मुलींना जाळ्यात ओढायचे काम हे लोक करत असतात. किती वाईट कृत्य आहे.
मागच्या एक आठवड्यापूर्वी दोन तीन वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती कोल्हापूर शहरात घडून गेली. काय झाली असेल त्या निष्पाप मुलीची मनोवस्था. काय काय भोगले असेल तिच्या देहाने देवच जाणे. त्या केसचा निकाल ही लागला त्या नराधमाला अटक ही झाली सक्त तुरुंग कारावासाची शिक्षा ही झाली पण एवढ्याने हे सगळ थांबेल असे वाटते तुम्हाला. अहो, मागच्या वर्षी औरंगाबाद(संभाजीनगर) शहरात असाच प्रकार घडला होता खूप क्रुररीत्या त्या मुलीचे हाल हाल करून मारण्यात आले होते तेव्हा त्या संबंधित पोलिस निरीक्षकाने त्या नराधमाचा जागीच एन्काऊंटर केला होता. ते चांगले झालेही परंतु तरीही अशा घटनांना जम बसला नाही. अजूनही या हिंदू प्रांतीय महाराष्ट्रात तसेच इतिहासाने समृद्ध असलेल्या भारत देशात अशा घटना सर्रास घडत असतात. या अशा घटनांना कायमचा आळा बसेल असा मुळाशी जाऊन जबर पायबंद घालायला हवा. मुलींनी सुद्धा धाडसी वृत्ती जागृत ठेवायला हवी. अंगात मस्ती पण आपल्या बरोबर असणाऱ्या इतर मुलांना जरा शिस्तीत ठेवायलाच हवे. मला असे वाटते या अशा बाहेरच्या वातावरणात वावरताना स्वतःच स्वतःचे रक्षण करत जगायला हवे. म्हणजे कोणाची हिंमत होणार नाही कोणा मुलीच्या अंगावर हात टाकण्याची वा वाईट नजर रोखून धरण्याची.
पण सध्याच्या तरुण पिढीला सुधारण्याची गरज मुलींपेक्षा अधिक आहे. हे असे वाईट कृत्य करणारे नराधम म्हणजे जवळजवळ ९०% तरुण मुलेच असतात. लाज वाटायला हवी तरुणांना आपण कुठल्या महाराष्ट्रात जन्माला आलो, कुठल्या मातीत जगतो आहे आणि कुठल्या समाजात वावरतो याची काही जाण. अजिबात नाही. आपल्या ही घरी आई, बहिण आहेत याचे भान असू द्यावे, त्यांना जसे आपण प्रेमाने वागवतो तसेच समोरची स्त्री, किंवा मुलगी दुसरी तिसरी कोणी नसुन आपली बहीण आहे याचं आशेने तिजकडे नजर जायला हवी. आपल्याकडे तरी तुरुंगवास, सक्त कारावास असल्या शिक्षा दिल्या जातात बाहेरच्या देशात जाऊन बघा अशा तऱ्हेचे कृत्य करणाऱ्यांची अजिबात गय केली जात नाही ज्या हातांनी महिलांची छेड काढली जाते त्याच हातांवर मुळापासून घाव घातला जातो, हात पाय तोडले जातात आणि जग किती जगायचं ते असं म्हणून सोडून देतात. अशा लोकांना धड चालता ही येत नाही वा हात ही चालवता येत नाही अशी गत होते. त्या मानाने आपण खूप नशीबवान आहोत की आपल्या देशात इतके कडक कायदे अजून अमलात आले नाहीत. अथवा अमलात आणले जात नाहीत. परंतु याचा अर्थ असा नाही आपण पाहिजे तसे वागू शकतो मनास वाटेल तसे काही करू शकतो.
अहो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे गातो ते अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून दर दरवर्षी जोमाने जयंती साजरी करतो याही पलीकडे आपण साक्षात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवून घेतो त्यांच्याच राज्यात आपल्याच जनतेबाबतीत असल्या निच प्रकारचे पराक्रम गाजवतो. यापेक्षा दुर्दैव ते कोणते?
जरा विचार करा आज राजे आपल्यात असते तर काय राजांना आपल्या मावळ्यांकडून होणारे असेल प्रकार बघवले असते? त्यांनी तर जागीच या सर्व प्रकारांचा छडा लावून पाळमुळ खणून काढले असते. बरोबर ना.
मग तरीही असे का?..........
नाही ना मग तरुणांसाठी एक आवाहन यामार्फत अजूनही वेळ गेलेली नाही सुधरा, बघा जरा या सगळ्यात होरपळी गेलेली असुरक्षित स्त्री, मुलगी, आपली आई आहे असे समजा आणि नीट कान उघडे ठेवून ऐका आपल्या नावे ती आई आक्रोश करते आहे कळकळीने ओरडते आहे म्हणते आहे, "मला जगू द्या मलाही तुमच्याप्रमाणे जगण्याचा हक्क आहे अधिकार आहे." आणि काहीतरी करा या महिलांवरील होणारे अनाठायी अत्याचार थांबवा, याबाबत जनजागृती मोहीम हाती घ्या महिला सुरक्षितता वाढवा त्या साठी अजून काही करता येत असेल, तर ते बघा आणि या पीडित महिलांना, तरुणींना न्याय मिळवून द्या तरच ते आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाला मिळालेले समाधान असेल.
क्रमशः
लेखक : नयन धारणकर, नाशिक©®
-------------------------------------
"३६ आकडा आणि ६३ आकडा"
३६ आकड्याचा विचार केला तर, तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकांकडे पहात नाहीत. दोघेही टाईट पणाने पाठीला पाठ लावून उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पहात नाहीत.
त्याप्रमाणे माणसांच असतं. छत्तीसचा आकडा हा चाळिशीच्या आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा अहंकाराने, ताकदीने, पैशाने, परिपक्व असल्या मुळे तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सख्ये भाऊ पक्के वैरी होतात. आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात.
आता ६३ आकडा पहा.
या आकड्याने साठी ओलांडल्या मुळे आता हे दोघेही नम्र झालेत. दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात. हातात हात घेतात. एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचं असंच असतं, एकदा साठी ओलांडली की, नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो, लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो, मुलं झाल्यावर भावांना विसरतो, पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो, आणि म्हातारपणी, जेवढ्यांना विसरला होता त्यांची आठवण काढत बसतो.
६३ च्या या आकड्या प्रमाणेच संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
वयाने कोणी कितीही लहान मोठा असु देत. वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह व आदर असतो. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर,, तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा...!!
------------------------------------
निसर्ग
आज आपण निसर्गाचे महत्त्व विसरलो आहोत.आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत.यामुळे वने आणि जंगले नष्ट होत आहेत.झाडे तोडल्यामुळे पाऊस कमी होऊ लागला आहे.पाण्याअभावी बर्याचदा आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.पाणीटंचाईच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावे लागत आहे,त्यात असंख्य लोकांचे प्राण जात आहेत.तर प्रदूषणामुळे वातावरण दुषित होत आहे, लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
दिनांक :- ५/१०/२०२१
------------------------------------------------
समर्पक दृष्टिकोनातून महात्मा गांधी
आज 2 ऑक्टोबर मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच हुतात्मा महात्मा गांधी यांची जयंती.
पण खरे गांधी कोण होते हे नक्की किती जणांना माहित आहे मोठी शंकाच आहे. कधी जाणून तरी घेण्याचा प्रयत्न केला असेल की नाही देवास ठाऊक. फक्त चलनी नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आहे म्हणून राष्ट्रपिता म्हणवत खिशात घेऊन हिंडत असतो हे कितपत योग्य आहे?. गांधींनी त्यांच्या तत्वांनुसार आज संपूर्ण भारत उभा केला आणि आज ते होते म्हणून आपण आहोत हे कधी कळणार आपल्याला? गांधींनी जाता जाता सत्य, अहिंसा जीवनाची दोन तत्वे समस्त जनतेला देऊ केली, तसेच ती तत्वे अनुसरून ते स्वतः ही जगत आले. ती तत्वे सुद्धा आपण धड पाळत नाही. अधर्माच्या पलीकडे जाऊन आयुष्यात अधिक चुका समाजात वैमनस्य निर्माण करण्यासाठी करत असतो. परंतु कधी गांधी विचार, त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा आणि त्यातून प्रेरणा घेण्याचा विचार साधा आपल्या मनाला शिवत ही नाही.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले हे खरे, परंतु तत्पूर्वी आपल्याकडे ब्रिटिशांचे राज्य होते हे सर्वांना ठाऊक आहेच. पण त्या ब्रिटीश राजवटीखाली आपला अवघा समाज होरपळला जात होता संपूर्ण राज्यात त्यांचे राज्य, लोकांसाठी त्यांच्या मनमर्जीने जगण्याची तर काही भ्रांतच नव्हती. आपल्याच भारतात येऊन आपल्यावरच हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न या ब्रिटिश राजवटीत सुरू होते. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपल्या देशातील जनता जीवन जगत होती. शाळा, शैक्षणिक संस्था सर्व त्यांनी इथे सुरू केल्या, तसेच परदेशातून विविध मालाची आयात निर्यात सुरू झाली. एक प्रकारे या ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केली होती. पण या सगळ्याला पायबंद घालायला कोणी पुढे सरसावत नव्हते. तेव्हा महात्मा गांधी यांनी इंग्रजांविरुद्ध पहिले पाऊल उचलले ते असहकार चळवळीतून. या चळवळीला भारतभर नागरिकांचा प्रतिसाद लाभला आणि ही चळवळ यशविरीत्या पार पडली. या चळवळीचे उद्देश्य एकच होते या भारत देशात आपले राज्य प्रस्थापित करायचे. त्या हेतूच्या जोरावर महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या शाळा, शैक्षणिक संस्था बंद पाडल्या, तसेच ब्रिटीश वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला. आणि उदय झाला तो स्वदेशाचा. सुरुवात झाली मेड इन इंडिया संकल्पनेची.
हे सर्व शक्य झाले फक्त आणि फक्त सत्य अहिंसेच्या मार्गामुळे. सरतेशेवटी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारून राष्ट्रवादी काँग्रेसची पुनर्बांधणी करून नवा पक्ष स्थापन केला ज्याचे अधिकार सर्व जनतेने महात्मा गांधी यांच्या स्वाधीन केले. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस जनसामण्यांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष ठरला.
या ऐतिहासिक घटनेकडे बारकाईने पाहिले असता गांधीजींची सकारात्मकता आणि देशविषयीची एकनिष्ठता दिसून येते. सत्य अहिंसा या संप्रेरक वृत्तीने अथवा मार्गदर्शनाने सफल झालेल्या ऐतिहासिक घटना चले जाव आंदोलन, मिठाचा सत्याग्रह अशा अनेक घटनांचा आढावा आपण गांधीजींचे चरित्र वाचून तसेच कथन करून घेऊ शकतो.
आजकाल प्रत्येक माणूस पैशांच्या मागे धावताना दिसतो आहे. यामागे माणसाची मती भ्रष्ट झाली आहे. केवळ पैसा कमावण्यासाठी तो मनाला वाटेल त्या विविध मार्गांचा अवलंब करताना दिसत आहे. हे सर्व करत असताना आपणही समाजाचे काहीना काहीतरी देणे लागतो हे विसरून गेला आहे. अशा सर्व गुंतागुंतीच्या समस्येत तो गांधीजींनी शिकवलेल्या तत्वांकडे पाठ फिरवत आहे. परंतु गांधीजींकडे प्रेरणादायक दृष्टिकोनातून पाहिले असता त्यांच्या चरित्रातून त्यांच्या प्रबोधनात्मक विचारांचे सहिष्णुता, बुद्धीचातूर्य, जिज्ञासू आणि समतेचे विचारप्रवर्तक असे अनेक पैलू समोर येतात.
माझ्या मते, आजच्या युगात जो गांधी वाचेल, गांधी अनुसरेल त्यालाच गांधी कळतील. गांधींचे विचार जाणून घेण्यासाठी मार्केटमध्ये एक ना बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. या गांधींच्या विचारांची गरज आज या समाजाला जास्त आहे. समतेच्या आधारावर अजूनही गांधींचे विचार जिवंत आहेत आणि यापुढेही राहतील. जर आपण ते वाचले, श्रवण केले तर प्रत्येकाच्या दूरदृष्टीकडून वेगवेगळ्या रूपात गांधी बघावयास, अनुभवयास मिळतील.
लेखक/कवी : नयन धारणकर
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा