Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

सप्तशृंगी गड : वणी - नयन धारणकर,


 सप्तशृंगी गड : वणी 

लेखक : नयन धारणकर, नाशिक

          नाशिकपासून केवळ 60 किमी अंतरावर असलेले, हिंदू पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक आणि साडे तीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ म्हणून गणले जाणारे तसेच हिंदू कुळाची कुलस्वामिनी म्हणजे वणीच्या सप्तशृंगी गडावरी स्थित माता सप्तशृंगी. सप्तशृंग याचा अर्थ सात शिखरे. देवीचे मंदिर सात शिखरांनी वेढलेले आहे. म्हणून तेथील देवीला सप्तशृंगी नावाने संबोधले जाते. हा सप्तशृंगी गड नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वणी गावी वसलेले महत्वाचे ठिकाण. गडावर जाण्यासाठी ट्रेन, बस तसेच नाशिकपासून विमानाचे सुद्धा वाहतूक साधन उपलब्ध आहे. वर चढून जाण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून ते थेट मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत ४७२ एका बाजूने पायऱ्यांची आखणी केलेली दिसून येते. वयोरुद्धांसाठी छोट्या पालखीची व्यवस्था आहे. याही पलीकडे गेल्या दोन वर्षांपूर्वी भाविकांसाठी रोपवे मार्ग देखील सुरू करण्यात आला आहे. 

          गडाच्या पूर्वेस दोन शिखरांनी विभागलेला मार्कंडेय डोंगर आहे. त्यात पूर्वी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते असे पुराणात सांगण्यात येते. गडावर कालीकुंड, दत्तात्रय कुंड, सूर्यकुंड अशी कुंडे आहेत. रामायणानुसार रावणाच्या सेनेशी युद्ध करताना लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडल्यानंतर हनुमान संजीवनी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वत आणताना त्याचा एक भाग इथे पडला तो सप्तश्रृंगी गड. दुसरे म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटून येताना या गडावर माता सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आल्याचा संदर्भ इतिहासात आढळतो.  राम सीता लक्ष्मण दंडकारण्यात असताना देवीच्या दर्शनासाठी आल्याचा उल्लेख ही पुराणात आढळतो. 

          महिषासुराचा संहार केल्यानंतर, युद्धाच्या विजय प्राप्तीनंतर विश्रांतीसाठी या गडावर येऊन देवीने वास्तव्य केल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे आज तिथे देवीचे अग्रगण्य स्थान विस्तारलेले दिसून येते.

महापूजे दरम्यान देवीला अकरा वार साडी, आणि चोळीला तीन खण लागतात. महापुजेदरम्यान देवीला पंचामृताने स्नान घालून पैठणी व शालू नेसवून साज शृंगार केला जातो. सकाळी बारा वाजता देवीची महानैवेद्य आरती होते. या नैवेद्यात पुरण पोळी, वरण भात, चटणी, भाजी पोळी या सर्व पदार्थांचा समावेश असतो.

          गडावर गेल्यावर मंदिरात प्रवेश करताना शक्तिद्वार, सूर्यद्वार, व चंद्रद्वार असे तीन प्रमुख प्रवेशद्वार उभारलेले दिसते. मंदिरात प्रवेश करताच दोन्ही बाजूंनी नऊ हात म्हणजेच अठरा भुजा असलेल्या, हातात विविध प्रकारचे आयुध असलेल्या आणि शेंदुराने परिपूर्ण असलेल्या माता सप्तशृंगी देवीच्या मूर्तीचे प्रसन्न दर्शन होते. देवीच्या नाकात नथ, डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले तसेच परिधान केलेली आभूषणे बघावयास मिळतात. तसेच कमरपट्टा, पायाचे तोडवे असे अलंकार देवीला घातले जातात. गडाचे सर्व दरवाजे सकाळी पाच वाजता दर्शनासाठी खुले होतात, देवीची पहिली काकड आरती सकाळी सहा वाजता नगारा वाजवत आईच्या नावाने उद्घोष करत संपन्न होते, आणि त्यानंतर आठ वाजता देवीच्या महापुजेला प्रारंभ होतो. तर शेवटची आरती सायंकाळी साडे सात वाजता संपन्न होते. देवीची आरती झाल्यानंतर गडाचे दरवाजे आणि देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद होते.

          सप्तशृंगी मातेच्या मंदिरात जात असताना तिथे बऱ्याच माकडांचा वावर आपल्याला दिसून येतो. गडावर दर्शनासाठी कधी ही गेल्यास तिथे माकडांची येरझारा सुरूच असते. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा देखील घालता येते. जवळच असलेल्या नांदूर गावातून बरेचसे भाविक या मंदिरात दर्शनासाठी पायी येत असतात. देवीचे दर्शन घेऊन गडावरून खाली उतरल्यानंतर तिथून काही अंतरावर असलेल्या नाशिक गुजरात सीमेलगत असलेल्या सापुतारा येथे पर्यटन स्थळी देखील भेट देऊ शकतात. आणि पर्यावरणाचा आस्वाद घेऊ शकतात. वणीचे सप्तशृंगी माता मंदिर नाशिक मधील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून आजही प्रसिद्ध आहे. 


लेखक : नयन धारणकर, नाशिक

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment