Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

बाप माणूस.......


 बाप माणूस.......

श्री. अमेय कानडे.


साधारणपणे ५-१० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग! दिवाळीची सुट्टी लागली म्हणून गावाकडे निघालो होतो. 

दिवाळीमुळे प्रचंड गर्दी होती. 

माझ्या शेजारी जागा रिकामी होती. 

एक पन्नाशीला टेकलेला मनुष्य घाम पुसत माझ्या जवळ आला. 

जागा रिकामी आहे का चौकशी केली. 

मी अगदी मनमोकळेपणाने बॅग वर टाकून जागा करून दिली.

गाडी नगरहून निघाली आणि 

गावाच्या दिशेने निघाली. 

माझं तरुण वय आणि हातात अग्निपंख पुस्तक पाहून न राहवून त्या सद्गृहस्थाने माझी चौकशी केली.

मी सांगितलं की, कॉलेजमध्ये आहे. सुटीला घरी जातोय.

गप्पांच्या ओघात ती व्यक्ती शिक्षक असल्याचं कळलं! मी पण उत्सुकतेने शाळेतल्या गमतीजमती विचारायला सुरुवात केली

 आणि

 त्यांनी पण त्या मोठ्या आवडीने सांगायला सुरुवात केली.

बोलता बोलता त्यांनी मला विचारलं,  तू कोणता व्यवसाय करणार?

मी म्हटलं - मला व्यवसाय करायला आवडेल पण मला शिकवायला आवडतं!

*माझ्या उत्तरावर त्यांनी कुतूहलाने माझ्याकडे पाहिलं. 

आणि

 म्हणाले - "शिक्षक होणं ही साधी गोष्ट नाही.

 त्यासाठी पाठ हे स्वतः जगावे लागतात 

आणि 

विद्यार्थ्यांना जगायला शिकवावे लागतात."

कोणत्या तरी धड्याचा संदर्भ देऊन हे त्यांनी सांगितलं. 

वाक्य आवडलं म्हणून लक्षात राहिलं.

 पण पुढे त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल याची अजिबात कल्पना नव्हती.

आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. 

नगरपासून ४०-५० किलोमीटर वर गाव होतं त्यांचं! 

गेली २० ते २५ वर्षे एसटी ने अप डाऊन करुन नोकरी केली होती.

 माणूस प्रचंड मेहनती आणि प्रामाणिक होता. 

पोरगा नुकताच १२ वी झाला. 

मार्क पण चांगले पडले होते. 

नगरला यायला त्रास होऊ नये, म्हणून सरांनी मुलाला दुचाकी गाडी घेऊन दिली होती. 

साहजिकच पोराच्या हुशारीचं कौतुक बापाच्या डोळ्यातून पाझरत होतं.

गाव १० किमीवर आलं, तसा सरांनी मुलाला एसटी स्टॅन्डवर घ्यायला ये असा फोन केला. 

पोराने पण लगेच तत्परता दाखवून येतो असं उत्तर दिलं 

आणि 

एसटी स्टॅण्डकडे निघाला. गाव आलं..

एसटी थांबली. 

तसा पोरगा 

आणि 

त्याचे मित्र सरांना घेण्यासाठी गाडीवर आले होते.

सर खाली उतरले. 

नवीन कोऱ्या गाडीवर एका राजकीय पक्षाचे चिह्न आणि 

त्याचा फोटो चिकटवलेला दिसला. 

पुढच्या क्षणी एसटी स्टॅन्ड मुस्काडात मारल्याचा आवाजाने चपापले!

सरांनी पोराच्या जोरदार कानाखाली वाजवलीं होती. सरांचा आवाज 

आणि 

राग दोन्ही चढत होते.

 " तुझा बाप गेली वीस वर्षे तुझ्या बुडाखाली गाडी असावी, या करिता झिजतोय आणि तू मात्र नव्या कोऱ्या गाडीवर अनोळखी नेत्याचा फोटो लावून हिंडतोय?

 तुझ्या बापापेक्षा भारीय का रे .... तो?

तो पण जिवंत आहे 

आणि 

तुझी आई 

आणि 

बाप पण! 

मग आईबाप विसरुन तुला त्याचा फोटो का लावावा वाटला?

राजकारण करायचंय जरुर कर! 

मास्तरांचा पोरगा मास्तर व्हावा असा काही नियम नाही. 

पण कर्तृत्व असं घडवं की नेता तुझ्या दारात येऊन म्हंटला पाहिजे - "साहेब माझ्या पक्षातून तुम्ही निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे. ह्या वेळी तिकीट तुम्हाला द्यायचं ठरलं आहे."

सरांच्या डोळ्यातून आग

 आणि

 मुखातून शिशाचा रस कानात ओतला जात होता.

" जो पोरगा त्याच्या आईबापाच्या रक्ताच्या कमाईला कुणा नेत्याच्या प्रचाराचं लेबल लावत असेल, तर ती औलाद हरामखोर म्हणावी लागेल.

 अशी औलाद असण्यापेक्षा नसलेली परवडली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी पण स्वराज्याचं तोरण बांधलं, पण माता आणि 

मातृभूमीला वंदन करून, शिवशंकराला साक्षी ठेवून!

 आणि 

पित्याला विश्वासात घेवून! लाचारी 

आणि

 लाळघोटेपणा करून नाही.

 घरी येईपर्यंत जर गाडीवरची ठिगळ जर निघाली नाहीत तर गाडी जाळून टाकेन.

 " असं म्हणून सर पायीचं घराकडे निघाले.

मी म्हटलं, साधी गोष्ट होती. जी घरी पण समजावून सांगणे शक्य होते. इतकं आक्रमक होण्याची गरज नव्हती. 

सर

 पायीच घरी निघाले. 

तसं पोराने आधी भराभर स्टिकर फाडले. 

पुढचं दृश्य फार पाहण्या सारखं होतं.

सर 

फक्त त्यांच्या मुलाला बोलले, पण त्याच्या मित्रांना पण ते लागलं होतं. पोरांनी भराभर स्टिकर फाडली. सरांच्या शब्दांत दम होता.

 उद्या हा प्रसंग आपल्या कुणाच्या वाट्याला येणार नाही असं नाही.

 आणि 

त्यात चूक काहीच नाही. पोरांनी नीट घरचा रस्ता धरला.

 पोरगा मात्र घरी जायला धैर्य एकवटत होता.

सरांनी स्वतःच्या मुलाच्या थोबाडात वाजवून वेदना मात्र सगळ्यांच्या हृदयात जागवल्या होत्या. 

पाठ जगणे कशाला म्हणतात हे सरांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं होतं.

गप्पा आणि अचानक घडलेला पुढचा प्रसंग यात सरांचं नाव विचारायचं राहून गेलं. 

इतक्यात कंडक्टरने डबल बेल मारली आणि गाडीतल्या अनेक बापांच्या मनात एक नवीन विचार

 आणि

 पोरांच्या मनात कृतज्ञतेच्या जाणिवा जाग्या करून गाडी गावाच्या दिशेने निघाली.

वेळीच घातलेला एक टाका पुढचे शंभर टाके वाचवतो ते असं! 

नातं वृद्धाश्रमात पोहोचण्या इतकं फाटल्यानंतर त्याला सहानुभूतीचे टाके घालण्यापेक्षा वेळीच जबाबदारीच्या जाणिवा थोडं कठोर होऊन जाग्या केलेल्या उत्तम नाही का?

श्री. अमेय कानडे.

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा