रत्नागिरी प्रतिनिधी:-
जयगड मध्ये नावेद मासेमारी नौका बेपत्ता होण्यामागे घातपाताचीच शक्यता आहे. यामागे दहशतवादी कृत्याची शक्यता असून दहशतवादयांनी खलाशांसहीत बोटीचे अपहरण केले असावे, असा संशय आहे. त्यामुळे विशेष यंत्रणेद्वारे या घटनेचा सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री, चिपळूण-गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. जयगड (ता.रत्नागिरी) येथील समुद्रात दि.२६ ऑक्टोबर २०२१ रोजी मासेमारीसाठी गेलेली 'नावेद २' ही जयगड बंदरातील नौका खलाशांसह बेपत्ता झाली. या बोटीवर ७ खलाशी होते. त्यातील ६ जण हे चिपळूण-गुहागर मतदारसंघातील गुहागर तालुक्यातील साखरीआगर, अडूर, धोपावे येथील आहेत. यापैकी केवळ एका खलाशाचा मृतदेह सापडला असून तो साखरीआगर येथील होता. परंतु या घटनेला जवळपास १५ दिवस होत आले तरी बोटीसह अन्य खलाशांचा अदयाप थांगपत्ता लागलेला नाही. बोट बेपत्ता झाल्याचे दि.२९ -३० ऑक्टोबर रोजी निदर्शनास आले. त्यानंतर त्यांच्या शोधासाठी कोस्टगार्ड, बंदर विभाग व स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून या सर्व यंत्रणा कार्यरत केल्या. परंतु या यंत्रणांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे साखरीआगर येथे जावून मच्छीमार बांधवांशी संवाद साधला आणि अनेक प्रश्न विचारून बारकाईने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित केले गेले. स्थानिक मच्छीमार बांधवांच्या म्हणण्यानुसार १. जर बोट बुडाली असेल तर बोटीवरील मासेमारीसाठी असणारी जाळी व अन्य साहित्य, मासे साठविण्यासाठीचे टब, खलाशांचे कपडे, बोटीवर जेवण बनविण्यासाठीची भांडीकुंडी आदी साहित्य कुठल्यातरी किना-यावर आढळून यायला हवे होते. २. बोटीचा अपघात झाला असेल तर तिचे अवशेष किनाऱ्यावर सापडायला हवे होते आणि बोटीतील इंधनाचा तवंग समुद्रात दिसून यायला हवा होता. ३. जयगड येथील जिंदाल कंपनीच्या मोठया बार्ज किंवा मालवाहू बोटीची धडक बोटीला बसल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा आहे. बोटीला धडक दिल्यानंतर मृतदेह, बोटीवरील सामान व बोटीचे अवशेष यांची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करण्याचे काम कंपनीकडून झाले असावे अशी शंका आहे. त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. ४. बोट बेपत्ता झाल्याच्या दोन - चार दिवसात समुद्र शांत होता. वादळ वारे अथवा उधाणाची परिस्थिती नव्हती. त्यामुळे बोट उलटून बुडण्याची कोणतीही शक्यता नाही. ५. मासेमारीसाठी बोट समुद्रात गेली असताना कोणतेही संकट आले किंवा अपघात झाला तर बोटीवरील वायरलेसद्वारे कळविण्याची व्यवस्था असते. अपघातग्रस्त बोटीवरील यंत्रणा बिघडली तरी दुर्घटना झाल्याचे अन्य कोणत्या बोटीवरील खलाशांच्या निदर्शनास आले तरीदेखील अवघ्या पाच मिनिटांत वायरलेसद्वारे त्याची माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचू शकते. मात्र, बेपत्ता असलेल्या या बोटीच्या बाबतीत अशी काहीच माहिती प्राप्त झालेली नाही. ६. बोट बुडाली असेल तर त्याचा कोणतातरी पुरावा मिळायला पाहिजे होता. बोड बुडाली तरी त्यावरील खलाशी हे समुद्राच्या पाण्यात १२-१५ तास ते दोन - दोन दिवससुध्दा जिवंत राहू शकतात आणि तशी उदाहरणे आहेत. २००९ मध्ये आलेल्या फयानच्या वादळात १५ तासांपेक्षा जास्त वेळ पाण्यात राहूनही काही जण वाचलेले आहेत. त्यामुळे या बोटीवरील सर्वच खलाशी बेपत्ता होणे हे आश्चर्यकारक आहे. ७. ही बोट बेपत्ता होण्यामागे घातपाताचीच शक्यता आम्हाला जास्त वाटते. यामागे दहशतवादी कृत्याची शक्यता असून दहशतवादयांनी खलाशांसहीत बोटीचे अपहरण केले असावे, असा संशय आमच्या मनामध्ये आहे. गुहागरमधील मच्छीमारांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून समोर आलेल्या या शंका आणि व्यक्त करण्यात आलेला संशय अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. दहशतवादी कृत्याची शक्यता हा केवळ गुहागर, रत्नागिरी परिसर किंवा राज्याच्या नव्हे तर देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेवून विशेष यंत्रणेद्वारे या घटनेचा सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री, आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Free Reporter Training

Certified & full Corse Residential & Onlin e
Home
/
रत्नागिरी
/
जयगड मध्ये नावेद मासेमारी नौका बेपत्ता होण्यामागे घातपाताचीच शक्यता; विशेष यंत्रणेद्वारे या घटनेचा सखोल तपास करण्यात यावा: माजी मंत्री, आमदार भास्कर जाधव यांची मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
-
Blogger Comment
-
Facebook Comment
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा