नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर हे प्रचंड मतांनी विजयी झाले. या यशाबद्दल राजापूर तालुक्यातील कॉंग्रेस नेत्या व माजी विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले.
त्याचप्रमाणे राजापूर तालुक्यातील पाचल-अणुस्कुरा या मार्गाच्या डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.अशोक चव्हाण यांनी सुमारे ७ कोटी ४३ लाख ६५ हजार एवढा निधी मंजूर करुन दिला. याबद्दलही हुस्नबानू खलिफे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. पाचल-अणुस्कुरा रस्त्यावर प्रचंड खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे या मार्गावरुन प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे. यामुळे हुस्नबानू खलिफे यांनी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधीची मागणी केली होती. या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण यांनी तातडीने रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर केला. याबद्दल हुस्नबानू खलिफे यांनी मंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा