रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे झाशीची राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन; गोळप शिरंबाड शाळेत कार्यक्रम
रत्नागिरी, ता. १९ : १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील विरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाईंना आज रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरवर्षीप्रमाणे ग्रामीण भागातील शाळेत हा कार्यक्रम करण्यात येतो. आज रत्नागिरी तालुक्यातील गोळप शिरंबाड येथील शाळेत कार्यक्रम करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख वक्ते, सामाजिक कार्यकर्ते तथा गोळप ग्रामपंचायत सदस्य अविनाश काळे म्हणाले, की माझ्या गोळप गावात कधीही कार्यक्रम करण्यासाठी उत्सुक असतो. गावात सात शाळा असून विद्यार्थ्यांनी व्यक्त होण्याकरिता दरवर्षी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करतो. यातून विद्यार्थ्यांना स्टेज डेअरिंग येत आहे.विद्यार्थ्यांनी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचे कार्यही अतुलनीय आहे. तिची वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची इच्छाशक्ती, आत्मविश्वास, धाडस या गुणांचा आदर्श लहान वयापासूनच विद्यार्थ्यांनी घ्यावा. भरपूर वाचन असेल तर अनेक गोष्टी कळतात. धाडस असेल तर अनेक गोष्टी करता येतात, संधीचा फायदा समाजासाठी कसा करता येईल. गावाला, देशाला योगदान देता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा.रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे गोळप शिरंबाड येथील शाळेत आयोजित राणी लक्ष्मीबाई जयंती कार्यक्रमात कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर म्हणाले, संघातर्फे राणी लक्ष्माबाईंच्या नावाने क्रीडा क्षेत्रातील युवतींना पुरस्कार दिला जातो. ग्रामीण भागातील शाळेत जाऊन कार्यक्रम, शाळेला पुस्तकांची मदत, राणीच्या चरित्रपुस्तकाचे वितरण केले जाते.जयंती कार्यक्रमाला कऱ्हाडे ब्राह्मण महासंघाचेही सहकार्य लाभते. कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. गावातील शाळांमध्ये आदरातिथ्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्साह भरपूर असतो. गोळप शिरंबाड शाळेची माहिती घेतली असता शाळेने चौफेर प्रगती केली आहे.यानंतर कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे यांनी विद्यार्थ्यांना राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाची गोष्ट अतिशय ओघवत्या शैलीत सांगितली. मुख्याध्यापक वृषाली हेळेकर यांनी राणी लक्ष्मीबाईंच्या कार्याविषयी माहिती सांगितली. सुट्टी असूनही आज राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीदिनी विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळण्याकरिता शाळेत कार्यक्रमाला उत्साहाने आल्याचे सांगितले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाने या वेळी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. एका विद्यार्थिनीने झाशीच्या राणीची वेशभूषा केली होती.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा