संतोष परब हल्लाप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. हा नितेश राणे आणि नारायण राणे यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी खोचक ट्विट करुन राणे कुटुंबीयांना डिवचले आहे. लघु सुक्ष्म दिलासा!, असा मजकूर त्यांनी ट्विटमध्ये लिहला आहे. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सर्वात मर्जीतील सहकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांची ही खोचक टिप्पणी राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. आता राणे कुटुंबीयांकडून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.
सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला असला तरी नितेश राणेंना अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण दिले आहे. तसेच १० दिवसांत नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर व्हावे आणि न्यायालयाकडे रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करावा, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. तर राज्य सरकारच्या बाजूने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. या दोन्ही वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने नितेश राणे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
⏹️महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य असल्याचे सिद्ध झाले: वैभव नाईक
शिवसेना आमदार वैभव नाईक हा न्यायाचा विजय असल्याचे म्हटले आहे. कायदा हा सर्वांना समान असतो मग तो केंद्रीय मंत्र्याचा मुलगाही असो, हे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सिद्ध झाले आहे. केंद्रीय मंत्र्याचा मुलगा असला म्हणून कोणालाही धमकावण्याचा हक्क तुम्हाला मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयानेही संतोष परब यांच्यावरील हल्ला जीवघेणा असल्याचे मान्य केले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य असल्याचेही सिद्ध झाले आहे. आता याप्रकरणात आरोपींना नक्की अटक होईल, असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला. नारायण राणे यांनी संतोष परब यांच्यावरील हल्ला लहानसा असल्याचे म्हणत त्याचे समर्थन केले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर आता केंद्र सरकार आणि नारायण राणे यांनी याप्रकरणात समोर येऊन भूमिका मांडावी, असे आव्हानही वैभव नाईक यांनी दिले.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा