*जि. प. ने इलेक्ट्रिकऐवजी पेट्रोलच्या खरेदी केलेल्या गाड्यांची चौकशीची व्हावी*
*अनिकेत पटवर्धन यांनी केली मागणी*
*रत्नागिरी* : पर्यावरण व वातावरणातील बदलांमुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आता पेट्रोल, डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचा शासन आदेशही आला. परंतु या आदेशाला रत्नागिरी जिल्हा परिषदेने केराची टोपली दाखवली आहे. नव्याने खरेदी केलेली वाहने पेट्रोलवरच चालणारी आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी कोकण विभागीय आयुक्त, सामान्य प्रशासन विभागाने करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत सखोल चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती पटवर्धन यांनी दिली.
दि. १ जानेवारी २०२२ पासून शासकीय व निम शासकीय यंत्रणा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरी व इलेक्ट्रिक वाहने असावीत, असा शासन आदेश क्रमांक मइवघो २०२१ प्र.क्. २४ तां. क. ४, दिनांक २३ जुलै २०२१ यानुसार २९ डिसेंबर २०२१ रोजी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने काढला आहे. तसेच १ एप्रिलपासून शासकीय वापरासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणारी सर्व वाहने ही बॅटरी, इलेक्ट्रिक असतील, असेही आदेशात स्पष्ट म्हटले आहे. मग असे आदेश असताना रत्नागिरी जि. प. ने ही वाहने खरेदी करून सोशल मीडियावर त्याचे फोटो प्रदर्शित केले. ही वाहने इलेक्ट्रिक नाहीत. त्यामुळे जि. प. च्या या गैरकारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेने नुकतीच काही वाहने खरेदी केली आहे. या गाड्यांच्या चाव्या जि. प. अध्यक्षांनी सभापतींकडे सुपुर्द केल्या होत्या. या गाड्यांवर नंबरप्लेटही न लावता त्या फिरवल्या जात आहेत. आरटीओंच्या नव्या नियमानुसार १ जानेवारीपासून नंबरप्लेटशिवाय कोणतेही वाहन रस्त्यावर येता कामा नये, परंतु या गाड्या नंबरप्लेटशिवाय फिरवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे शासनकर्त्यांना एक नियम व सर्वसामान्य रत्नागिरीकरांना एक नियम असे का. कायदा सर्वांना समान असतो, त्यामुळे अशा नंबरप्लेटशिवाय गाड्या फिरवल्याने नियमानुसार दंडात्मक कारवाईसुद्धा झाली पाहिजे, अशी मागणी पटवर्धन यांनी केली आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा