"ऋषीतुल्य माणसं आपल्यापर्यंत येत नाहीत खरं तर आपण त्यांच्यापर्यंत पोहचायला हवं. कारण हि माणसं आपल्या ध्येयात्मक वाटचालीत कार्यमग्न असतात,असेच साहित्य क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व.बाळ ठाकूर होय" असे मत माजी प्राचार्य दत्ता पवार यांनी व्यक्त केले.
सुप्रसिद्ध मुखपृष्ठकार बाळ ठाकुर यांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबईच्या व ग्रामपंचायत भांबेड यांच्या वतीने शनिवार दि.२२ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी प्राचार्य दत्ता पवार सर यांसह अनेक मान्यवरांनी बाळ ठाकूर
यांच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी रत्नागिरी, राजापूर, देवरुख, लांजा येथील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठी साहित्य व चित्रजगतातील सुप्रसिद्ध चित्रकार मुखपृष्ठकार लांजा तालुक्यातील भांबेड गावचे सपूत्र बाळ ठाकुर यांचे नुकतेच ८ जानेवारी २०२२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी ते ९२ वर्षाचे होते.त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील साहित्य व चित्रजगत खरोखरच हळहळलेले पाहायला मिळाले.मराठी साहित्यातील भल्या भल्या प्रस्थापित लेखकांची पुस्तके, दर्जेदार मासिकांचे मुखपृष्ठ चितारुन मराठी साहित्य जगतात आपल्या अभिजात कलेची मुद्रा उमटविणा-या आपल्या मायभूमीतील स्व.बाळ ठाकूर या दिग्गज सूपुत्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या व ग्रामपंचायत भांबेड यांच्या संयुक्त विद्यमाने भांबेड ग्रामपंचायतीच्या कै.शिवरामभाऊ ठकुरदेसाई सभागृहात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी प्राचार्य दत्ता पवार, साहित्यिक अशोक लोटणकर,सुभाष लाड, साहित्यिक दिपक नागवेकर, शिल्पकार संदीप सावंत, आंतरराष्ट्रीय चित्रकार महेश करंबेळे, पाचल ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, अॅड.गांगण, गणपत शिर्के सर, अभिनेते - नाटककार अमोल रेडिज , भांबेडच्या सरपंच उज्वला मढवी , जयराज मांडवकर , दिगंबर शिंदे ,महेंद्र साळवी ,विजय हटकर ,पोवार गुरुजी, श्रीकांत ठाकुरदेसाई,गणेश इंदुलकर आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रार्थना सभेच्या सुरवातीला सोहम संगीत विद्यालय ,बदलापूरच्या वतीने सुनिल जाधव यांनी सांगितिक कार्यक्रम सादर करुन शब्दसुमनांजली वाहिली. यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते स्वर्गीय बाळ ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.श्री सुभाष लाड यांनी संपादित केलेल्या "रंग रेषांचा किमयागार - बाळ ठाकूर" या अर्पणपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य दत्ता पवार सर म्हणाले की ,"मुंबई मध्ये बाळ ठाकूरांचे महात्म्य अनेकांना माहित आहे.देवरुख मधील प्राध्यापक शे.पु.भागवत यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.यांच्या भेटीमुळेच बाळ ठाकुरांच्या जीवनाला दिशा मिळाली. गिरगांव मध्ये मौज कार्यालयातून सत्यकथा व मौज ही मराठी साहित्यातील दर्जेदार मासिके प्रकाशित होत. ख-या अर्थाने हि दोन्ही मासिके मराठी साहित्याची गंगोत्री आहेत. या दोन्ही मासिकांना सजविण्याचे काम बाळ ठाकूर यांनी केले.आपल्या पुस्तकावर बाळ ठाकूरांचे मुखपृष्ठ असावे असे प्रत्येक साहित्यकाराप्रमाणे मलाही वाटायचे. माझीही आजवर सात पुस्तके निघाली. मात्र ती संधी मला मिळाली नाही.बाळ ठाकूरांसारख्या कोकणच्या सुपुत्राचा ठेवा आपण जपातला हवा" असे सांगताना "मुंबईच्या साहित्यविश्र्वात बाळ ठाकुरांची आदरयुक्त दहशत होती. मुंबईतील प्रख्यात चित्रकार त्याच्याजवळ जाण्याचे प्रयत्न करायचे मात्र हा कलोपासक आपल्या रंग रेषांच्या दुनियेत निष्ठेने काम करित आत्मानंद मिळवित राहिला" असेही नमूद केले.
सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक लोटणकर यांनी
"कलाकार हा तपस्वी असतो, कलाकाराचे हात कलेने भरलेले होते. भारलेले असतात. बाळ ठाकूरांना
प्रसिद्धीचा हव्यास नव्हता. कारण -"तुका म्हणे झरा, आहे प्रवाही खरा." - या उक्तिप्रमाणे ते चित्रकला क्षेत्रातील अस्सल सोनं होतं. खरेखुरे राजे होते. त्यामुळे त्यांना प्रसिध्दि मिळविण्याची गरज नव्हती" असे सांगत "गिरगावात लेखक म्हणून मी अनेकांना भेटलो, पण बाळ ठाकूरांना मी भेटलो नाही.अशी मोठं रत्न बाहेरची मंडळी शोधून काढतात, आपल्याला ते कळत नसतं"ही खंत व्यक्त करित लोटणकर यांनी बाळ ठाकूर यांच्या जीवनाचा परामर्श आपल्या मनोगतातुन मांडला.
लांजा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गणपत शिर्के यांनी "गेल्या वर्षी बाळ ठाकूरांना भेट देण्याच्या आठवणीला उजाळा देत या हृदयस्थ भेटीत राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला मायेची शाल पांघरण्याचे सौभाग्य मला मिळाल्याने मि भाग्यवान ठरल्याचे" मत व्यक्त केले.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई चे अध्यक्ष सुभाष लाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात "बालपणापासूनच मला वाचनाची आवड होती. 'बनगरवाडी' हे माझं बालपणीतलं आवडतं पुस्तक होतं. या पुस्तकाचे बाळ ठाकुरांनी चितारलेले मुखपृष्ठ व आतील चित्रं मला खुप भावायची,यातूनच मी बाळ ठाकूरांचा शोध घेण्याचे प्रयत्न केले, त्यावेळी इतक्या मोठा उंचीचा चित्रकार भांबेडमधील माझ्या मायभूमीतील आहे याची कल्पना मला नव्हती. यामागे कोकणीस्वभाव कारणीभूत ठरल्याचे" मत मांडत "बाळ ठाकूरांसारख्या माझ्या मायभूमीतील कलोपासकाची मला फार उशीरा माहिती मिळाली" असे सांगत यंदाच्या प्रभानवल्ली येथे होणा-या नियोजीत सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याविषयीची कल्पना देण्यासाठी मी त्यांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस भांबेड येथील निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मंद स्मित हास्य करित 'मी फार काही केले नाही ' असे सांगत आपल्या विचारांची उंची आपल्या आचारातून आमच्यासमोर ठेवत एका जीवनमूल्याची शिकवण आम्हाला दिली असल्याचे" सांगितले. या पुढेही बाळ ठाकूरांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे कलादालन ठाकूरदेसाई कुटुंबाच्या सहकार्याने लांजा तालुक्यात उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त करित आपल्या मायभूमीतील या अद्वितीय कलोपासकाला शब्दसुमनांजली अर्पण केली.
याचबरोबर भांबेड गावचे सुपुत्र सिने नाट्य अभिनेते श्री अमोल रेडीज यांनी "स्वर्गीय बाळ ठाकुर या कीर्तिवंत माणसाला आपण मुकलोय" अशी भावना व्यक्त केली. अॅड.सदानंद गांगण यांनी "एवढा प्रसिद्ध रेषांचा किमयागार, पण आम्ही इथल्या गावचे असूनही त्यांना ओळखू शकलो नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पण त्यांच्या कला दालनासाठी सगळे मिळून जे ठरवतील त्यासाठी आम्ही झटून त्यांना पाठिंबा देऊ" असे सांगितले. पाचलचे उपसरपंच किशोर नारकर यांनी "ठाकुर सरांचा अभिमान सर्वांनाच आहे, तो पुढे कसा तेजत राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया" असे सांगितले. त्याचबरोबर अजय देसाई, महेंद्र कांबळे, भांबेडचे उपसरपंच राजेंद्र गांधी, आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून "आपण एका कीर्तिवंत माणसाला मुकलो असल्याची" भावना व्यक्त करित "भांबेड पंचक्रोशीला बाळ ठाकूरांसारख्या सुपुत्राचा यथायोग्य गौरव करता आला नसल्या"ची खंत व्यक्त करित "महाराष्ट्रात मोठेपणाचं श्रेष्ठत्व मिळवायला मरायला लागतं, हे ठाकूरांना ही लागू होतं" असे मत व्यक्त केले.
या प्रार्थना सभेला उपस्थित बाळ ठाकूर यांचे सुपुत्र श्रीकांत ठाकूरदेसाई यांनी "आमच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई व ग्रामपंचायत भांबेड यांनी पुढाकार घेत प्रार्थना सभा आयोजित करण्यासोबतच अर्पणपुस्तिकेच्या माध्यमातून बाबांचे कार्य भावी पिढीला कळावे यासाठी केलेल्या प्रयत्न स्तुत्य असल्या"चे सांगत दोन्ही संस्थाचे आभार मानले.
या प्रार्थना सभेचे प्रास्ताविक जयराज मांडवकर सर यांनी तर निवदन विजय हटकर यांनी केले.या प्रार्थना सभेसाठी महेंद्र साळवी ,विनोद बेनकर, अभिजित वाघदरे, दीपक नागवेकर, सौरभ साळवी, राजेंद्र गांधी यांनी मेहनत घेतली.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा