शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९६वी जयंती आहे. ३१ डिसेंबर २०२१ रोजी राज्य सरकारकडून २३ जानेवारी हा दिवस बाळ ठाकरे जयंती म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून २३ जानेवारीला बाळ ठाकरे जयंती साजरी केली जाते. आज बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संबोधित करणार आहेत. बऱ्याच दिवसांनंतर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्यामुळे शिवसैनिकांना पक्षप्रमुख काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुण्यात झाला. बाळासाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाखो शिवसैनिकांसाठी प्रेरणास्थान आहे. बाळासाहेब ठाकरेंची जयंती दरवर्षी मोठ्या थाटामाटात, उत्साहाने साजरी केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंची जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे. राज्यसभरात बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यात रक्तदान शिबिरापासून इतर सार्वजनिक कार्यक्रम या दिवशी असतात.
दरम्यान या निमित्ताने आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा आकर्षक अश्वारूढ पुतळ्याचे अनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगमाध्यमातून होणार आहे. या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेसह मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत आदी शिवसेनेचे नेते उपस्थितीत राहणार आहेत. सध्या काही दिवसांत मुंबई महापालिकेच्या निवडणूका जाहीर होण्याचे चिन्हे आहेत. यादरम्यान महापालिकेत भाजप विरुद्ध सत्ताधारी शिवसेना यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे विरोधकांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. मोदी म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहणारे उत्कृष्ट नेते म्हणून ते कायम स्मरणात राहतील.’
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा