देवरुख प्रतिनिधी:- भाजप प्रदेश सचिव व रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी नुकतेच देवरुख येथे घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन केले. कचर्याच्या समस्येपासून देवरुखवासियांना मुक्त करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून देवरुख नगर पंचायत प्रयत्नशील आहे. आज खर्या अर्थाने स्वप्नपूर्तीचा दिवस असल्याची भावना यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये यांनी व्यक्त केली. तसेच या प्रकल्पाची थोडक्यात माहिती उपस्थितांना सांगितली. या ठिकाणी घन कचरा व्यवस्थापन केले जाणार असून याच ठिकाणी त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. येत्या जून महिन्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण शक्तिनिशी जनतेच्या सेवेत रुजू होईल असेही ते म्हणाले. तत्कालीन उपनगराध्यक्ष आणि आरोग्य सभापती सुशांत मुळ्ये यांनी प्रकल्प उभारणीसाठी स्वतःचे कार्यकाळात उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. या प्रसंगी देवरुख नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्षा सौ. सान्वी संसारे, सर्व नगरसेवक, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सद्गुरु लोकमान्य वाचनालय येथे निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन शहरातील युवा नेते तथा भाजपा बेटी बचाव, बेटी पढाव प्रकोष्ठचे कोकण प्रांत संयोजक भगवंतसिंह चुंडावत यांनी केले. निलेश राणेंनी या ठिकाणी उपस्थित राहून नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन केले. पुढे सद्गुरु लोकमान्य वाचनालयात त्यांचा छोटेखानी सत्कार समारंभ संपन्न झाला.
राजवाडे यांच्या चिंतामणी हॉलमध्ये देवरुख व्यापारी आघाडी पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहून त्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच व्यापारी आघाडीच्या सर्व सदस्यांना एक लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण देण्यात आले. यावेळी व्यापारी आघाडीचे संयोजक पंढरीनाथ मोहिरे यांनी आश्वासक कामगिरी करण्याचे अभिवचन दिले. सौ. उल्का विश्वासराव यांनी आपल्या भाषणात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात केंद्रीय मंत्री राणे साहेबांच्या माध्यमातून आपल्या भागात भरघोस काम उभारण्यात येईल असे म्हटले. तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर तालुका भाजपाला उभारी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जिवाचे रान करावे असे भावनिक आवाहन केले. मार्गदर्शनपर भाषणात निलेश राणे म्हणाले, "नुसत्या आघाड्या किंवा पहिली सभा जोशपूर्ण वातावरणात संपन्न करून चालणार नाहीत, तर या माध्यमातून लोकोत्तर कार्ये करण्यात यावीत. निवडणुका फक्त पैशांच्या बळावर जिंकता येत नाहीत त्यांना प्रयत्नांची जोड तळमळीने द्यावी लागते. देवेंद्र फडणवीस 2024 साली पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने मुख्यमंत्री होतील हे निर्विवाद सत्य आहे पण यात रत्नागिरी जिल्हा आणि विशेषकरून संगमेश्वर तालुका बहुमुल्य योगदान देणे जास्त आवश्यक आहे." यावेळी भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व्यापारी आघाडीचे सदस्य उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये यांनी केले.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा