मासिक पाळी शिक्षणाच्या परिवर्तनाची सुरवात आपल्या घरातूनच सुरवात करुन आपल्या घरातील मुलगी एक सक्षम महिला बनली पाहीजे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.इंदूराणी जाखड यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेवतीने जिल्हास्तरीय मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित प्रशिक्षणात त्या बोलत होत्या.
व्यासपिठावर मा.श्रीम.नंदिनी घाणेकर, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जि.प.रत्नागिरी, श्रीम.सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प.रत्नागिरी, श्री.वामन जगदाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प.रत्नागिरी, श्री.सुधाकर मुरकुटे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प.रत्नागिरी हे उपस्थित होते.
पुढे बोलताना मा.डॉ.इंदूराणी जाखड म्हणाल्या, सदर प्रशिक्षणाचा उद्देश हा मासिक पाळीबाबत मानसिक दृष्टीकोन बदलणे, मासिकपाळी व त्या अनुषंगाने किशोरवयीन मुलीला अनुभवास येणाऱ्या शारीरीक, मानसिक बदलांची व त्यांच्या परिणामांची योग्य शास्त्रीय माहिती पुरवणे. पोंगडाअवस्थेत पदार्पण करतांना जी आव्हाने समोर येत असतात त्यांना अडथळा होणाऱ्या ज्या सांस्कृतीक, सामाजिक रुढी परंपरा, गैरसमज आहेत त्यांचे आव्हान पेलण्यासाठी चागल्या सवयी विकसीत करुन त्यांचे बळकटीकरण करणे महत्वाचे आहे. मासिक पाळीमुळे लज्जा व किळस वाटू नये यासाठी अनूकूल वातावरण निर्मिती करणे, तसेच मासिक पाळी व्यवस्थापनासाठी योग्य वर्तनबदल घडवून आणणे आवश्यक आहे.
सदर प्रशिक्षणासाठी आरोग्य पर्यवेक्षिका व सेविका, एकात्मिक बालविकास पर्यवेक्षिका व शिक्षिका या प्रविण प्रशिक्षक यांची निवड करण्यात आली. मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणामध्ये आरोग्य पर्यवेक्षिका व सेविका, एकात्मिक बालविकास पर्यवेक्षिका व शिक्षिका यांना मुंबई युनिसेफ सल्लागार श्रीम.अपर्णा कुलकर्णी, श्रीम.परवीन शौकत अली जहागिरदार, जिल्हा समन्वयक मुलींचे शिक्षण, समग्र शिक्षा, शिक्षण विभाग (प्राथ.) जि.प.रत्नागिरी, श्रीम.अश्विनी जितेंद्र काणे, विषय साधन व्यक्ती, पं.स.रत्नागिरी, श्रीम.स्नेहा तुषार कीर, उच्च प्राथमिक शिक्षिका, जि.प.केंद्रशाळा पोमेंडी, रत्नागिरी. श्रीम.सुजाता सुरेश जांबोटकर, उच्च प्राथमिक शिक्षिका, जि.प.शाळा कोंढरताम्हाणे, चिपळुण. श्रीम.सुधाश्री नरेंद्र पाटील, माध्यमिक शिक्षिका, रा.भा.शिर्के प्रशाला, रत्नागिरी. श्रीम.अर्चना अशोक पेणकर, उच्च प्राथमिक शिक्षिका, जि.प.शाळा असोंडे कोंड, लांजा यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळी आव्हाने व उपाय, मासिक पाळी दरम्यान पाळावयाची स्वच्छता, मासिक पाळी व्यवस्थापनाच्या विविध पध्दती, किशोर अवस्था व बदल इ. विषयी प्रशिक्षणार्थींना सखोल मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण हे जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेले प्रविण प्रशिक्षक हे तालुकासतरावर जाऊन प्रत्येक शाळेतील एक महिला शिक्षीका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देतील. तालुकास्तरावर तयार झालेले प्रशिक्षणार्थी हे आपल्या शाळेतील वर्ग 6 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या किशोरवयीन मुलीना तसेच शाळाबाहय 13 वर्षावरील मुलीना प्रशिक्षण देतील. सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या मातांनाही प्रशिक्षणाला पाचारण करून, त्यांच्या मानसिकतेत बदल करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
सदर प्रशिक्षणाला आरोग्य पर्यवेक्षिका व सेविका, एकात्मिक बालविकास पर्यवेक्षिका व शिक्षिका तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व समारोप श्रीम.श्रध्दा धनावडे, मुल्यमापन व संनियंत्रण तज्ञ यांनी केले.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा