रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे दरमहाचे पगार व आर्थिक देयकाना विलंब होत असल्याने सोमवारी २५ एप्रिल २०२२ रोजी रत्नागिरी जिल्हा परिषद समोर दुपारी ३ ते ५ या वेळेत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे पगार निधी उपलब्ध असताना देखील वेळोवेळी विविध कारणाने विलंबाने होत आहेत. तसेच वरिष्ठ वेतन श्रेणी फरक, नियमित वेतनश्रेणी शिक्षण सेवक फरक, मेडिकल बिल, भविष्य निर्वाह निधी ना परतावा उचल, इतर अर्थिक बिले, सेवानिवृत्त शिक्षकांच्या रक्कमा अंतिम धन, गटविमा इत्यादी देयके वेळेवर मिळत नाही सबब याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प रत्नागिरी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक ), मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि प रत्नागिरी यांना दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी निवेदन सादर केले आहे. तसेच यापूर्वी देखील वेळोवेळी पत्रव्यवहार व भेटीचे वेळी तोंडी चर्चा देखील झाली आहे. मात्र प्रत्यक्षात ठोस उपाययोजना झाल्याचे दिसून येत नसल्याने प्राथमिक शिक्षकांत नाराजीचा सूर उमटला आहे.
वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे विलंबाने होणाऱ्या पगार व आर्थिक देयके यामुळे गृह कर्ज, बँक हप्ते भरणा होताना शिक्षकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यासाठी वेळीच ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. म्हणून न्याय्य मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सनदशीर मार्गाने २५ एप्रिल २०२२ रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सदर आंदोलनासाठी जिल्ह्यातील सुमारे ४५० ते ५०० हुन अधिक शिक्षक सहभागी होणार आहेत.
याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, पोलीस उपनिरीक्षक शहर पोलीस ठाणे रत्नागिरी यांना देखील देण्यात आले आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा