Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

नारळ व्यवस्थापनातून युवक, महिलांना रोजगार देण्याची स्वराज्य अॅग्रोची योजना

रत्नागिरी : नारळाच्या झाडाच्या व्यवस्थापनप्रणालीच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील हजारो युवकांना व महिलांना रोजगार देण्याची योजना स्वराज अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने आखल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष तुषार आग्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. आग्रे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात नारळाच्या झाडाच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून विखुरलेल्या नारळ झाडांचे एकत्रीकरण करून नारळापासून मूल्यवर्धित उत्पादनांचे जागतिक दर्जाचा महाराष्ट्रातील पहिला प्रक्रिया उद्योग रत्नागिरी तालुक्यात उभारला जाणार आहे. त्यातून ३२३३ रोजगारांची निर्मिती होऊ शकते. यासाठी ना कोणाची जमीन संपादित करायची गरज नाही. शिवाय मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लागवडीमुळे या प्रकल्पाद्वारे कोकणाच्या आकर्षकतेत भर पडेल. हा प्रकल्प हरित प्रकल्पांपैकी एक असेल.

श्री. आग्रे म्हणाले, नारळ हे एक बहुवर्षीय बागायती फळपीक आहे. त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो. म्हणूनच भारतामध्ये नारळाच्या झाडाला "कल्पवृक्ष" म्हणतात. धार्मिक समारंभ, परंपरांचा नारळ हा एक अविभाज्य भाग आहे. नारळाचे अनेक उपयोग व फायद्यांमुळे नारळ हा भारतीयांच्या जीवनातील आवश्यक घटक आहे. नारळाचे दूध, तेल, खोबरे, नारळ साखर इत्यादी वेगवेगळ्या रूपात अन्न म्हणून नारळाचा वापर केला जातो. गेल्या १० वर्षांत नारळाच्या झाडापासून शेतकऱ्यांना दरवर्षी सुमारे १० हजार ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. पण कंपनीच्या व्यवस्थापनाच्या प्रणालीत आल्यावर शेतकऱ्यांना पुढील १० वर्षांत साधारणत: सरासरी ७७,५०० रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळेल. जागतिक मानांकनामध्ये भारत नारळ उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर, उत्पादनक्षमतेमध्ये पहिल्या क्रमांकावर आणि नारळ लागवडीखालील एकूण क्षेत्रफळामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

असे असूनही आपल्या देशातील नारळ बागायतदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. झाडावर चढणाऱ्या कुशल कामगारांचा अभाव, नारळ लागवडीबददल तांत्रिकदृष्ट्या अज्ञान, खत आणि पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव, कीड आणि रोग व्यवस्थापनाचा अभाव, इरिओफाइड कोळी, रुगोज चक्राकार पांढरी माशी तसेच गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव, कोंबकुजवा रोग, नारळ फळाचा लहान झालेला आकार, परिणामी कमी झालेली उत्पादन क्षमता, नारळ उत्पादनाची अनिश्चितता, योग्य दर न मिळणे अशा या समस्या आहेत.

या सर्वांवर उपाय म्हणून कल्पवृक्ष सुरक्षा मित्र ही देशातील पहिली संकल्पना स्वराज्य एंटरप्रायझेसच्या माध्यमातून १ जानेवारी २०१५ पासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू केली. आता त्याचा विस्तार करण्यात आला आहे. जुलै २०१७ मध्ये "स्वराज्य एंटरप्रायझेस"चे रूपांतर स्वराज्य अॅग्रो अँड अलाइड सर्विसेस प्रा. लि. या कंपनीमध्ये झाले. ही कंपनी २०१५ पासून रत्नागिरी शहरातील नारळ झाडांच्या व्यवस्थापनाचे आणि नारळ वृक्षाच्या सर्व भागांवरील मूल्यवर्धनाचे कार्य करते. रत्नागिरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नारळधारक आहेत. त्यांच्या वृक्षांची नोंदणी करून पुढे मूल्यवर्धनाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया उपक्रमात कंपनी मोठ्या प्रमाणात कार्य करू इच्छिते. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. केरळच्या धर्तीवर नारळ आणि नारळ झाडापासुन विविध वस्तू निर्मिती प्रकल्प उभे राहू शकतील, असे श्री. आग्रे यांनी सांगितले.

कोकणातील विखुरलेल्या नारळ झाडांचे एकत्रीकरण करून नारळ आणि नारळाच्या झाडापासून मूल्यवर्धित उत्पादनांचा जागतिक दर्जाचा महाराष्ट्रातील पहिला प्रक्रिया उद्योग रत्नागिरीमध्ये उभारून मोठ्या प्रमाणात स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती करणे हा कंपनीचा उद्देश आहे. या अभियानाकरिता कंपनी रत्नागिरी शहरापासून २५ किमी परिघातील दोन लाख नारळ झाडांची नोंदणी करण्याचे काम सुरू करत आहे. त्यामुळे मूल्यवर्धित उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध होणार आहे. नारळ बागायतदारांकरिता नारळाच्या एका झाडाचा सध्याचा वार्षिक व्यवस्थापनाचा खर्च २ हजार रुपये आहे. जास्तीत जास्त नारळ झाडमालकांना लाभ मिळावा, यासाठी कंपनीने वार्षिक व्यवस्थापनाचा दर दरवर्षी एक हजार ३०० रुपये केला आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत सवलत म्हणून हाच दर प्रतिझाड प्रतिवर्षी ७७५ रुपये एवढा करण्यात आला आहे. त्यामध्ये वर्षभरात एकूण ६ शाकार सेवा (दर दोन महिन्यांच्या अंतराने) देण्यात येतील.

नारळ झाडांच्या नोंदणीसाठी रत्नागिरी तालुक्यातील तरुण, महिला आणि बचत गटांचे सहकार्य अपेक्षित असून त्यातून त्यांना रोजगार मिळणार आहे. जास्तीत जास्त नारळ झाडमालकांनी स्वतःची झाडे व्यवस्थापनाच्या प्रणालीमध्ये देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही कंपनीने केले आहे.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा